Thursday, June 18, 2009

काबूलमध्ये 50 हजार विधवा



अरब-इस्राईल युद्ध, इराण-इराक संघर्ष किंवा स्वात खोऱ्यातून जीव मुठीत घेऊन परागंदा झालेले 13 लाख पाकिस्तानी, अशा घटनांमुळे अनेकांचे जीवन नरक बनले आहे. जगभरात शरणार्थी बनलेल्यांमध्ये मुसलमानांचीच संख्या अधिक आहे. राष्ट्रसंघाचे आकडे बोलतात की, जगभरात एकूण 4 कोटी मुसलमान शरणार्थी बनून इकडून तिकडे भटकत आहेत. इस्लामी जगतामध्ये अनाथ बालकांची संख्या अडीच कोटी आहे. मुस्लिम देशांमध्ये कोलाहल, अनागोंदी आणि अनिश्चितता सर्वाधिक आहे, अन्य देशांमध्ये असे वातावरण नाही.
मुस्लिम देश आपसात लढतात, तसेच बाहेरील देशांशीदेखील लढतात. या लढायांमुळे सर्वात वाईट हाल होतात महिला आणि लहान मुलांचे. पुनर्वसन कार्यात सहयोग देणारी राष्ट्रसंघाची संस्था आणि मानवाधिकार आयोग दरवर्षी काही आकडेवारी प्रसिद्ध करतात. या आकडेवारीत सतत वृद्धी होत असते. या पीडितांच्या शिक्षणाची सोय होत नाही. ते स्वत:च्या पायावर उभे राहतील यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाहीत. गरिबी आणि आजारपण त्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते. वेळेआधीच ते या जगाचा निरोप घेतात.
विसाव्या शतकातील सातव्या दशकापासून सदैव अस्थिर असलेला आशिया खंडातील देश म्हणजे अफगाणिस्तान. पहिल्यांदा रशियाने तिथे घुसखोरी केली. आपल्या स्वभावानुसार पख्तू, ताजिक आणि उजबिकसारख्या समूहांनी रशियाला जोरादार विरोध केला. या संघर्षाचा लाभ अमेरिकेने घेतला. अफगाणी टोळ्यांना शस्त्रास्त्र आणि धन पुरवण्यासाठी कोट्यवधी डॉलर ओतण्याचे काम अमेरिकेने केले. त्यामुळे युद्धखोरांना आणखीनच खुमखुमी आली. अफगाणिस्तानला रशियाच्या तावडीतून सोडविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करण्याला अफगाणी सिद्ध झाले.
रशियासोबत युद्ध झाले तेव्हा 4 लाख अफगाणी जनता शरणार्थी बनून पाकिस्तानात आश्रयाला आली. त्यांच्या भरणपोषणासाठी पाकिस्तानने अमेरिकेकडून मदत घेतली. अमेरिकेने पाकिस्तानला अनेक वर्षांपर्यंत करोडो डॉलरचे अनुदान दिले. ही मदत पाकिस्तानसाठी वरदान सिद्ध झाली. तत्कालीन राष्ट्रपती झिया यांनी मिळालेल्या शस्त्रास्त्र आणि पैशांतून आपली सेना सुसज्ज बनवली. अफगाण शरणार्थी संपूर्ण पाकिस्तानात पसरले. विशेषत: ते जेव्हा कराचीत पोचले तेव्हा स्थानिक रहिवाशांशी भीषण संघर्षदेखील झाला.
अफगाणिस्तानातील करजाई सरकारचे म्हणणे आहे की, सरकारने या शरणार्थींना परत बोलावले आहे, परंतु पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की आजही दीड लाखाहून अधिक पठाण शरणार्थी पाकिस्तानातच आहेत.
रशियाने काढता पाय घेतला, परंतु अफगाणिस्तानात अमेरिकेने हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली. अफगाणी जनतेने अमेरिकाविरोधात कडवा विरोध सुरू केला. अमेरिकेला अफगाणिस्तानातून खदेडून बाहेर काढण्यासाठी सर्व वंश आणि गटांचे लोक एक झाले. यातूनच मुल्ला उमरचा उदय झाला. नंतरच्या काळात मुल्ला उमर आणि अल्‌-कायदाचा म्होरक्या ओसामा- बिन-लादेन संघटित झाले. त्यांचा उद्देश केवळ अमेरिकेला पळवून लावणे इतकाच राहिला नाही. केवळ अफगाणिस्तानच नाही तर ज्या ज्या इस्लामी प्रदेशांत अमेरिकेने ठाण मांडले आहे, तेथून अमेरिकेला पळवून लावणे त्यांचे ध्येय बनले. यातूनच 11/9 चा प्रताप घडला. हे सारे इस्लामचे नाव घेऊन सुरू राहिले.
तालिबान आणि अल्‌-कायदाला संपविण्यासाठी अमेरिकेने योजना बनवली. इस्लामी कट्टरवादी आणि अमेरिका समोरासमोर उभे ठाकले. मुल्ला उमर याच्या राज्यात शरियतच्या नावाने मानवी मूल्ये पायदळी तुडवली गेली आणि तेथील जनतेला भिकेला लावले गेले.
अफगाणिस्तानात जे अतिरेकी होते, त्यांचे नामकरण तालिबान असे करण्यात आले. मदरशातील मुलांना लढाईचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. विद्यार्थ्यांना अरबी भाषेत तालिब इल्म म्हटले जाते. या तालिबचे अनेकवचन "तालिबान' हा शब्द जगभरात प्रचलित झाला.
तालिबानी हातात बंदूक घेऊन इस्लामचे जिहादी बनले. पुरुष तालिबानी बनून इस्लामी फौजेचे अंग बनले. आता केवळ युद्ध करणे हेच त्यांचे काम. वेळ येताच आत्मघाती बॉंबही बनायचे होते. यामुळे महिला मोठ्या प्रमाणात विधवा बनू लागल्या. इस्लामच्या नावाखाली या विधवांंचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण होऊ लागले. मार्क हेरॉल्ड या पत्रकाराचे म्हणणे आहे की, आजघडीला केवळ एका काबूलमध्ये 50 हजार विधवा आहेत. त्यांना अत्यंत वाईट अवस्थेत आपले जीवन व्यतित करावे लागत आहे.
काबूलपासून केवळ 40 किमीच्या घेऱ्यामध्ये करजाई सरकारची हुकूमत चालते. उर्वरित अफगाणिस्तानात आजही तालिबानचीच सत्ता आहे. आपण विचार करू शकतो की, काबूलच्या बाहेर कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती असेल? अमेरिकेने अफगाणिस्तानात केवळ आपली स्वत:ची फौज तैनात केलेली नाही. या युद्धात नेटो करारातील देशही सामील झाले आहेत. अमेरिकेने जगभरामध्ये अनेक देशांत आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. या देशांच्या रक्षणाचे काम अमेरिका करते, परंतु या बदल्यात त्यांना अमेरिका आदेश देईल त्या स्थानांवर आपली सेना पाठवावी लागते.
त्यामुळे अमेरिका जिथे कोठे लढाई करते, त्याला क्षेत्रीय युद्धाचे स्वरूप देते. यावेळी अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानात सैन्य पाठवावे असे कोणत्याही देशाला वाटत नाही, परंतु कराराला बांधील असल्यामुळे नाईलाजाने त्यांना अमेरिकेला साथ द्यावी लागते. अमेरिकेने नुकतेच काही दिवसांपूर्वी नेटो राष्ट्रांचे 30 हजार सैनिक अफगाणिस्तानात धाडले आहेत.
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नेटो सेना आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धात 2005 साली मृत्युमुखी पडलेल्या अफगाणी नागरिकांची संख्या 478 होती. नेटो सेनेतील 130 सैनिक मारले गेले. 2006 मध्ये ही संख्या 769 आणि 191 होती. 2007 मध्ये ही संख्या क्रमश: 1297 आणि 232 होती. 2008 च्या जानेवारी आणि सप्टेंबरदरम्यान मरणाऱ्यांची संख्या 729 आणि 236 होती. 2009 जानेवारीत ही संख्या 86 आणि 24 तर फेब्रुवारीत 10 आणि 04 होती. ही तर सरकारी आकडेवारी आहे. गैरसरकारी आकडेवारी पाहिली तर संख्या खूप मोठी आहे. म्हणजेच मरणाऱ्या अफगाण नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. विधवांची संख्या अधिक असणे तर स्वाभाविकच आहे.
अफगाणिस्तानातील लोकांचे म्हणणे आहे की, पाश्चात्य मीडिया तालिबानच्या हातून मरणाऱ्यांची संख्या जाहीर करते, परंतु नेटो फौजेने किती लोकांना मृत्यूच्या खाईत लोटले आहे, यावर मात्र काहीच चर्चा होत नाही. नेटो सैनिक हे अफगाण सैनिक आणि नागरिकांना मारल्यानंतर मृतदेहांचे दफन न करता जाळून टाकतात. त्यामुळे मरणाऱ्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही.
तालिबान आपल्याला मिळणाऱ्या यशाचा कितीही टेंभा मिरवीत असला तरी नेटो सेनेचा संकल्प आहे की, एक नेटो सैनिक मारला गेला की त्याचा बदला किमान 6 अफगाणींना मारून घ्यायचा. नेटो सैनिकांना तालिबानी सापडले नाहीत तर निशस्त्र नागरिकांवर वार करायलाही ते कचरत नाहीत. परिणामी अशा स्थितीत अफगाण नागरिकदेखील शस्त्र हाती धरतो. कधी कधी तर तो आत्मघाती बॉंब बनून नेटो सैनिकांना धडा शिकवतो.
मरणारा अमेरिकी सैनिक असू दे अथवा तालिबानी किंवा अफगाणी नागरिक, कोणत्याही स्थितीत याचे परिणाम तर महिलांनाच भोगावे लागतात, महिलांना वैधव्य येते. त्यांचे कौटुंबिक जीवन उद्‌ध्वस्त होते. घरातील पुरुष गेल्याने घराचे दायित्व महिलेच्या खांद्यावर येते.
एक कबाईली नेता रजा नवाज काजी याचे म्हणणे आहे की, 2001 मध्ये याच अफगाणी जनतेने अमेरिकेचे स्वागत केले होते, परंतु आज याच जनतेला अमेरिकेची घृणा करावी लागत आहे. अफगाण नागरिकांचे म्हणणे आहे की, अमेरिकेची लढाई तर तालिबानशी आहे, मात्र त्यांच्या हल्ल्यात निर्दोष नागरिकांचा बळी जात आहे.
2008 साली मे महिन्यात नंगहार नामक शहरातील एका विवाह समारंभावर अमेरिकी सेनेने हल्ला चढविला. तालिबानचा बदला अशारीतीने गरीब नागरिकांवर हल्ले करून घेतला जात आहे.
गेल्या तीस वर्षांपासून चाललेल्या युद्धात 15 लाख विधवांना शापित जीवन जगणे नशिबी आले आहे. काबूल विद्यापीठातील प्राध्यापक डेबो डेजलिंग यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार या विधवा महिलांचे वय सरासरी 30 ते 35 आहे. 90 टक्के महिलांना साधारणपणे किमान 4 मुलं आहेत. या विधवांना कालीन बनविणे किंवा वेशाव्यवसाय करणे याशिवाय गत्यंतरच राहिलेले नाही. या महिलांचे दरमहा उत्पन्न सरासरी 17 डॉलर आहे.
काबूलच्या गल्ली-बोळात भीक मागणाऱ्या महिलांची संख्या हृदय पिळवटून टाकणारी आहे. निराश महिला आपल्या हातात पती आणि बाळांचे छायाचित्र घेऊन त्यांना शोधताना आढळतात. त्या विचारतात की, जर तालिबान इस्लामसाठी आणि अमेरिका आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी युद्ध करीत आहे, तर त्यांनी सांगावे की, त्यांचा उद्देश कधी पूर्ण होणार आहे आणि उद्देश पूर्ण झाला तरी ते अफगाणिस्तानातील दगड-विटांवर राज्य करणार आहेत काय?

1 comment:

  1. प्रिय बंधू
    आपण एक वेगळ्या विषयावर लिहित आहात. या विषयावर सहसा कोणी लिहित नाही. आपले प्रयत्न कौतुकास्पद आहे. इस्लामी मूलतत्ववाद नावाने आतंकवाद करून निष्पाप जीव घेण्याचा हिडीस प्रकार करणारे अगदी मोजक्या लोकांनी इस्लाम ला बदनाम केले आहे. आपल्या सारख्या पत्रकाराने ह्या नाजूक विषयावर लिहिताना अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण आपले लेख वाचून माझ्या लक्षात आले कि आपल्याकडील माहितीत हि उथळ, भडक, त्रोटक, विषयच्या सखोल द्यानाचा अभाव टिपिकल इस्लामोफोबिक मुद्याचा संग्रह या पठडीतील आहे. आपण ह्याविषयावर अधिक चांगला लिहु शाकता. परंतु त्या साठी विषयाचे सखोल ज्ञान आणि अनेक वेगवेगळ्या श्रोता कडून आलेली माहिती चा अभ्यास आणि analysis करण्याची शक्ती असावी लागते. उदा आपल्या लेखात आपण सांगितले कि अफगाणिस्तानातील तालेबन आणि अल कायदा एकाच कार्यासाठी लढत आहेत. याचे कारण आपली हि ऐकीव माहिती. मी तुम्हाला थोडी मदत करतो आज पासून तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करा कि
    १. अफगाणिस्तानातील तालेबन : याचे उद्देश, कार्यक्षेत्र आणि कार्य शैली
    २.अल कायदा: याचे उद्देश, कार्यक्षेत्र आणि कार्य शैली
    आणि हळू हळू तुम्हाला लक्षात येईल कि तुमच्या लेखात तुमी काय लिहले आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे. काही शंका मदत हवी असल्यास निसंकोच लिहा. compucad_zab@yahoo.com

    आपला मित्र
    जहीर

    ReplyDelete