Monday, February 9, 2009

दहशतवादाची पाळेमुळे देवबंद मदरशांमध्ये


पाकिस्तान म्हणतो,
दहशतवादाची पाळेमुळे देवबंद मदरशांमध्ये


26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची चर्चा सुरक्षा परिषदेत चालू होती तेव्हा पाकिस्तानचे प्रतिनिधी अब्दुल्ला हारूण यांनी म्हटले की, या दहशतवादाची पाळेमुळे देवबंद मदरशांमध्ये आहेत। तिथे दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते। नंतर तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात निर्यात करण्यात येतो. भारत सरकारनेच देवबंद मदरशांवर नजर ठेवली पाहिजे. यात तथ्य आहे. अन्यथा सरकारने याची चौकशी करून खरी स्थिती जगासमोर आणली पाहिजे. देवबंद मदरसा अल्पसंख्य समाजाशी निगडित आहे, परंतु इतका मोठा आरोप सहन केला जाऊ शकत नाही.


26 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. जगभरातून आक्रोश उमटला. दहशतवादाच्या शापातून आपल्या देशाची मुक्तता कधी होणार? असा प्रश्न जो तो विचारू लागला. रात्री साडेनऊ वाजता हल्ला झाला. ही माहिती मिळाल्याबरोबर जर आमच्या विमानांनी उड्डाण घेऊन पाकिस्तानात जेथे जेथे अतिरेकी अड्डे आहेत त्यावर हल्ले करून भस्मीभूत केले असते आणि मग प्रश्न विचारला असता की, दहशतवादाची पाळेमुळे कोठे आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले असते. कारण पाळेमुळे पाकिस्तानात नसती तर भारताने हल्लाच कशाला केला असता? परंतु असे झाले नाही.
भारताने नेहमीप्रमाणे विधवाविलाप सुरू केला. धीरगंभीर चेहरा करून पुन्हा एकदा सांगण्यात येऊ लागले की, अतिरेकी का तयार होतात आणि जगात दहशतवाद का वाढतोय याचा आपण मुळाशी जाऊन विचार केला पाहिजे. जी गोष्ट साऱ्या जगाला माहीत आहे त्याबद्दल पुन्हा पुन्हा अज्ञान दर्शविण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आम्हाला केवळ शब्दांचे बुडबुडे सोडायची आहेत. दहशतवादची पाळेमुळे अमूक येथे आहेत आणि दहशतवाद हा अशा प्रकारे संपवावा लागतो, हे साऱ्या जगाला कळेल, या भाषेत सांगण्याची आमची मानसिकता नाही.
11/9च्या घटनेनंतर अमेरिकेने शब्दांचे बुडबुडे सोडले नाहीत की विधवाविलापही केला नाही. नरराक्षसांशी लढण्यासाठी देशवासीयांना आवाहन केले आणि अत्यंत मुत्सद्दीपणाने धोरणे आखली. अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या. ब्रिटननेही अतिरेक्यांना असा धडा शिकवला की, ते आजपर्यंत ब्रिटनकडे मान वर करून पाहण्याची हिंमत करीत नाहीत. इस्राईल हा तर खूपच चिमुकला देश आहे. आपल्या जन्मापासूनच त्या देशाला 57 मुस्लिम देशांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आजवर इस्राईलवर तीन लढाया लादण्यात आल्या. दरवेळी त्या देशाने सडेतोड प्रत्त्युत्तर दिले. दृढ संकल्प आणि कृती यातून इस्राईलने आपल्या जनतेला दाखवून दिले की, दहशतवादाची पाळेमुळे कोठे आहेत आणि ती कशी उखडली पाहिजेत. म्हणूनच या देशांपुढे अतिरेक्यांची डाळ शिजली नाही. आम्ही तर निव्वळ शब्दांचे बादशहा आहोत. साप निघून गेल्यावर काठी आपटणारे आहोत. म्हणूनच आपल्या येथील दहशतवादाचे मूळ आपल्या निष्क्रियतेत आणि भित्रेपणात लपले आहे.
आपला हात जगन्नाथ अशी म्हण आहे. आम्ही आणि आमचे सरकार अकर्मण्य आहोत, त्यामुळे अनाथसुद्धा. भारतात पसरलेली दहशतवादाची विषवेल कशी उखडून टाकायची यावरच आम्ही वादविवाद करीत आहोत.
पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी धर्मांधतेचे वादळ घोंगावत होते. आमच्याच नेत्यांनी त्याला आपल्या येथे राहणाऱ्या समुदायाची इच्छा म्हणून सन्मान दिला. पाकिस्तान तयार झाल्यानंतर तरी तो समुदाय संतुष्ट झाला काय? आजही त्या वर्गाच्या आकांक्षांनी या देशात अनेक आंदोलने सुरू केली आहेत. त्या फुटीर आंदोलनांमध्ये दहशतवादाची पाळेमुळे नाहीत काय?
भारताने स्वातंत्र्यानंतर घटनेनुसार एका नव्या राष्ट्रात राहणाऱ्या समाजाची निर्मिती केली काय? आम्ही तर 1947 च्या वेळी जो समाज होता त्या समाजाचेच घटक राहिलो. आम्ही आमचे धर्म आणि त्यावर आधारित संस्कृतीचे गीत गात राहिलो. स्वतंत्र भारताचा नवा समाज निर्मिला असता तर सर्वांसाठी एकच कायदा तयार झाला नसता काय? ज्या देशात वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी वेगळे वेगळे कायदे असतात तिथे वैधानिक आणि राजकीय ऐक्य कसे नांदेल? ज्याला सरकारी लाभ मिळणार नाही तो वेगळ्या प्रवाहात फुटून निघणारच आहे.
त्यामुळे फुटीरवाद जोपासण्याच्या नादात आपण दहशतवादाची पाळेमुळे ओळखण्यात कमी पडत आहोत. हाच फुटीरवाद कुठे नक्सलवाद बनतो तर कुठे उल्फाच्या रूपात उफाळून येतो. काही ठिकाणी सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या रूपात.
धर्माच्या (उपासनापद्धतीच्या) आधारावर समाज चालत असेल तर त्यात जिहादचे दर्शन होणारच. खलिस्तानच्या आंदोलनाप्रसंगी जेव्हा धर्मयुद्धाचे स्वरूप देण्यात येऊ लागले तेव्हा इंदिरा गांधींनी आपल्या कठोर धोरणांनी आंदोलन दाबून टाकले. त्यामुळे आज आपण पाहतोय की, खलिस्तानी आंदोलन गतप्राण झाले आहे.
शेजारील श्रीलंकेत लिट्टेने भाषा आणि क्षेत्रवादाच्या नावाने दहशतवाद सुरू केला तेव्हा लंका जळू लागली. गेल्या 25 वर्षांत श्रीलंका सरकारने लिट्टेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. परिणामी आज प्रभाकरनचा निप्पात होताना दिसत आहे. ज्या मुद्द्यांवरून श्रीलंकेत दहशतवाद वाढला त्याच्या मुळांवर श्रीलंकेने ऍसिड ओतले. आयर्लंडमध्ये तर कितीतरी वर्षांपासून दहशतवादाने थैमान घातले होते. सरकारने कठोरपणे तेथील दहशतवादाला गाडून टाकले. इटलीच्या माफियांनी आपला नंगानाच सुरू ठेवला होता. साऱ्या युरोपला नाकी नऊ आणले होते. अतिरेकी माफियांनी तेथील पंतप्रधान मूर यांचे अपहरण केले होते आणि दीड महिने त्यांना बंदी बनवून ठेवले होते, परंतु इटली सरकारने अतिरेक्यांसमोर शरणागती पत्करली नाही. परिणामी दहशतवाद संपुष्टात आला.
गेल्या 28 वर्षांपासून भारतात काश्मीर ते मुंबईपर्यंत दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू आहे. सरकार मूकदर्शक बनून आहे. इतकेच नाही तर प्रसंगी मसूद अजहर आणि उमर शेखसारख्या अतिरेक्यांना सोडून दिले आहे. इंडियन एअरलाईन्सच्या विमान अपहरण प्रसंगी भारताने जो बुळगेपणा दाखविला त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत. असा भित्रेपणा दाखवून आपण दहशतवाद रोखू शकू काय? खरे पाहायला गेले तर दहशतवादाची पाळेमुळे आपल्या भित्रेपणातच आहेत. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर भारत सरकार आजपर्यंत काहीतरी करू शकला आहे काय? आम्ही पाकिस्तानवर ज्या प्रकारचे आरोप करतो, त्याच प्रकारचे आरोप करून तो कागदी वाघ बनून जातोय.
अल्पसंख्यकवाद भारताची जखम आहे. या जखमेवर मलम लावण्याचा बनाव करून विदेशी घोसखोरी होत राहते. 26 नोव्हेंबरला साऱ्या देशाने आणि सरकारने ज्या गंभीरतेने घेतले होते ती गंभीरता आता कोठेच दिसत नाही. आता तर हर नेता आणि हर पार्टी निवडणुकीबद्दल बोलताना दिसत आहे. निवडणुका आवश्यक आहेत, पण त्याहून देशाची सुरक्षा अधिक आवश्यक आहे. राष्ट्रच राहिला नाही तर राज्य कोणावर करणार? सत्तालोलुपतेमध्येच दहशतवादाची पाळेमुळे आहेत. यावर संहत आम्ल (ऍसिड) ओतूनच आपल्या राष्ट्राला आणि भारतीयतेला वाचवू शकतो.
दहशतवाद रोखण्यासाठी आमचा देश तयार आहे काय? 26 नोव्हेंबरच्या घटनेनंतर आमचे नेते आणि आमची सेना यांच्या हालचाली अशा होत्या की, जणु आता कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल. एका आठवड्याच्या आतच म्हणण्यात येऊ लागले की, युद्ध हे त्याचे उत्तर नाही, परंतु हे सांगणारे हे ही सांगून टाकत नाहीत की मग उत्तर काय आहे? पाकिस्तानवर दबाव वाढवावा अशा प्रकारची वक्तव्ये मग समोर येऊ लागली. हल्ला होऊन आता दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. दबावाने काय साध्य झाले आहे?
सीमारेषेवर असलेल्या आमच्या सेनेला आमचे कमांडर आणि सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतर्क राहायला सांगितले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून आपली सेना सीमेवर एकत्रित केली. वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक चॅनेलवर म्हटले जाऊ लागले की, आता युद्धाचे परिवर्तन अणुयुद्धात होणार की काय? अणुयुद्धाचा उल्लेख होताच चर्चा तापू लागल्या. पाकिस्तान इस्लामी बॉंब समोर आणू लागला. पाकचे मुख्य वैज्ञानिक अब्दुल कादीर खान म्हणू लागले की, दहा मिनिटांत आम्ही भारताचा नाश करू शकतो.
पाकिस्तानचे राष्ट्रपती जरदारी यांचे म्हणणे होते की, भारतातील सर्वच मोठी शहरे आमच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत, परंतु मकर संक्रात आली तशी अणुयुद्धाची चर्चाही थंडावली. लोकांनी विचार केला की, ओबामांनी सत्ता हातात घेतली की काही ना काही होईल. आता फेब्रुवारीचा महिना सुरू आहे. तरीही सर्वत्र स्मशान शांतता आहे.
युद्ध झाले असते तर काय झाले असते? निश्चितच भारतीय सेना आपले कर्तृत्व दाखविली असती. यापूर्वी या देशाने 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, परंतु एक प्रश्न की ज्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही- 2005 च्या 26 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. जलस्थल एक झाले होते. या जलप्रलयात अनेक मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी सरकारने म्हटले होते की, नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी डिजास्टर्स मॅनेजमेंटची स्थापना करण्यात येईल. स्थापना झाली, इतकेच नाही तर कोट्यवधी रुपयांचे बजेटही बनले. शरद पवार यांना सर्वेसर्वा बनविण्यात आले. जे काही मुंबईत झाले होते तेच बिहारात कोसीने मार्ग बदलल्यामुळे यंदा झाले. त्या जलप्रलयात किती मेले, किती नुकसान झाले हे अद्याप ताजे आहे, परंतु त्यावेळी हे डिजास्टर्स मॅनेजमेंट कोठे होते?
केवळ घोषणा करून हे सरकार नैसर्गिक आणि मानवी आपत्ती रोखू शकत नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवू नका. नाही तर असे होऊ नये की, पुन्हा कुणी कस्साब आणि कुणी अफजल भारतमातेचा चेहरा विद्रुप करण्यासाठी आलेत आणि आम्ही शिकार झालोत.

No comments:

Post a Comment