Thursday, June 10, 2010

नव्या "जिहाद'ची बालवाडी

पाकिस्तानने कधीही आतंकवादाचे समर्थन केले नसल्याचे पाकिस्तान सरकार व येथील मुल्ला- मौलवी सांगतात. भारतात अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हापासून पाकिस्तान ही दहशतवाद निर्यात करणारी भूमी असल्याचे चित्र तयार होत आहे. जिहाद शब्द तर पाकिस्तानची ओळख बनला आहे. पाकिस्तान सरकार या आरोपांचे वारंवार खंडन करत आहे व असे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत आहे. मात्र पाकिस्तानचे वृत्तपत्र दै. डॉनने या सर्व आरोपांचा स्वीकार केला आहे आणि पाकिस्तान सरकार काहीही म्हणो, कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही असे संकेत आपल्या वृत्तपत्रीय मजकुरातून दिला आहे.
मुस्लिम जगत // मुजफ्फर हुसैन

मुंबईच्या विशेष न्यायालयाने पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई हल्ल्याच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली. योगायोगाने त्याच दिवशी पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक फैसल शहजाद याला अटक केल्याची बातमी येऊन धडकली. याच फैसल शहजादने न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्क्वेअर येथे कार बॉम्बस्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुदैवाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना याची आधीच कुणकुण लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
फैसल शहजाद अमेरिकेच्या जॉन केनेडी विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडण्यात आले. जगात कोठेही दहशतवादी घटना घडली किंवा हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याची नाळ पाकिस्तानशी जोडलेली जाते. फैसल शहजादच्या अटकेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
याशिवाय आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे हे अतिरेकी एकतर पाकिस्तानी असतात किंवा पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन अथवा ब्रिटिश नागरिक तरी असतात. या अतिरेक्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे रोजगाराच्या शोधात किंवा पैसे कमविण्यासाठी अतिरेकी कारवाया करण्यास प्रवृत्त होणे हे एकवेळ समजू शकते, पण फैसल अहमद तर कोण्या गरीब घरचा नव्हता. तो तर पाकिस्तानच्या वायूदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा होता. याचाच अर्थ तो उच्चशिक्षित होता व गेल्याच वर्षी त्याला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले होते. मात्र अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त होताच त्याने पाकिस्तानला जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले.
तेहरीके तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शहजादने एकट्यानेच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानातील बुद्धिजीवी वर्गातून याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक याला धोक्याचा इशारा समजत आहेत. शहजादसारख्या उच्चशिक्षित तरुणाने हे कृत्य करणे यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. यापूर्वीही पाकिस्तानातील उच्चशिक्षित, पदवीधारक अशा कटात सामील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळलेे आहे. अशा कारवाया करताना घटनास्थळीच कित्येकांना पकडण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात अफगाणिस्तानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शहजातच्या कारवायांचा भांडाफोड झाला. अमेरिकेचे अधिकारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशी या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दै. डॉनने एक विश्लेषणात्मक लेख प्रकाशित केला आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानला जगभरात नव्या जिहादची बालवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
जगात कोठेही हिंसा आणि अराजकता असेल, त्याला सर्वस्वी जबाबदार पाकिस्तानच असल्याचे पाकिस्तानविरुद्धचे पुरावे सांगत आहेत. "नव्या जिहादची नर्सरी' हा शब्दप्रयोग करून दै. डॉनने म्हटले आहे की, अफगाणिस्तान लगतच्या पाकिस्तानच्या सीमारेषेला अल कायदाचे मुख्यकेंद्र मानले जात आहे. याबाबत डॉनने खैबर पख्तुनवाचे मुख्य पोलीस अधिकारी मलिक नवीद खान यांच्या वक्तव्याचा संदर्भही दिला आहे.
खान म्हणतात, संपूर्ण जगभरातून जिहादीवृत्तीचे लोक पाकिस्तानात येत आहेत. कारण ते सहजतेने सीमा ओलांडून अफगाणिस्तानात प्रवेश करू शकतात. ओसामा बिन लादेनचा अमेरिका व तिच्या समर्थकांविरुद्ध जे वैश्विक युद्ध आहे, त्याची पाळेमुळे अफगाणिस्तानातील पर्वतराजीत दूरवर पसरली आहेत. त्यामुळे कट्टरवादी तरुणांसाठी हा प्रदेश स्वर्गासमान आहे आणि सुरक्षितही.
"डॉन'च्या म्हणण्यानुसार सौदी अरेबिया आणि अमेरिकेने 80 च्या दशकात रशियन सेनेविरुद्ध अफगाणिस्तानला भडकावले. परिणामी रशियावर मोठा दबाव पडला व शेवटी रशियाचे सैन्य तेथून निघून गेले. मात्र अलकायदा आणि इतर जिहादी गटांचे अस्तित्व या ठिकाणी तयार झाले.
सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड सिक्युरिटीजचे प्रमुख इम्तीयाज गुल म्हणतात, पाकिस्तानने कोठूनही येणाऱ्यांना पेशावर व कबाईली प्रदेशात राहण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना या ठिकाणी अडवणारे कोणीही नाही. परिणामी गेल्या तीन दशकांत त्यांनी या प्रदेशात आपले बस्तान बसवले आहे. इम्तीयाज गुल आतंकवादाशी संबंधित प्रत्येक बाबींवर बारीक नजर ठेवून असतात. या संबंधात त्यांचे "सबसे खतरनाक स्थान' हे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.
"डॉन'च्या लेखात म्हटले आहे की, पाकिस्तानात आतंकवादाची सुरुवात जनरल जीयांच्या काळातच झाली, जेव्हा त्यांनी इस्लामचा सूर आळवायला प्रारंभ केला होता. भुट्टोंच्या फाशीला घाबरून जीयांनी इस्लामचा आधार घेतला होता. केवळ इस्लामचा पुरस्कार केल्यानेच आपल्याला लोकप्रियता मिळेल अशी त्यांची धारणा होती. त्यांचे देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण त्यांनी इस्लामच्या आधारावरच तयार केले होते. दुसरीकडे सैन्याने आणि एजन्सींनी कट्टरतावादी गटांना चुचकारणे सुरू केले होते.
या कट्टरवाद्यांना सेनेत आणि इतर संस्थांत उच्च पदे मिळू लागली. एकूणच काय तर इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) ही यांचीच निर्मिती होती. जीयांनी काश्मीर आणि अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याचा सपाटा लावला.
आज 5 अमेरिकन नागरिकांवर पाकिस्तानात खटले चालू आहेत. आतंकवादी हल्ल्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानच्या एका माजी राजकारण्याचा मुलगा असलेल्या डेविड हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात, लष्कर-ए-तोयबासाठी काम केल्याचे व 26 /11 च्या मुंबई हल्ल्यासाठी काही ठिकाणांची (ज्या ठिकाणी हल्ले झाले) पाहणी केल्याचे आरोप मान्य केले आहेत.
ब्रिटनने तर प्रारंभीपासूनच पाकिस्तानला आतंकवादाला जबाबदार ठरवले आहे. 2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याची योजना ही पाकिस्तानातील आतंकवाद्यांनी केली होती. ज्या चार युवकांनी स्वत:ला उडवले होते, त्यांचे प्रशिक्षणही पाकिस्तानात झाले होते. फैसल शहजादच्या अटकेनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आता अमेरिका कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला सूट देण्यास तयार नाही. त्यामुळे अमेरिकेने इशारा दिला आहे की, पाकिस्तानने आतंकवादाचा त्याग करावा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
पाकिस्तान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांतील अधिकृत सूत्रांनुसार अफगाणिस्तानात असलेले अमेरिकेच्या सैन्याचे कमांडर जनरल स्टेनली यांनी इस्लामाबाद येथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कियानींची भेट घेऊन त्यांना अमेरिकेची चिंता बोलून दाखवली. पाकिस्तानने तालिबान आणि अल कायदा यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी, असा अमेरिकेचा आग्रह होता.
शहजादचे घरचे लोक किमान दोन अतिरेक्यांना ओळखतात की जे जिहादी चळवळीत सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकाल्याचा परिणाम आता दिसू लागल्याचे अमेरिका खेदाने म्हणत आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत काही विपरित घडलेच, तर अमेरिकेला पाकिस्तानवर कारवाई करावी लागेल. पाकिस्तान सरकार व तेथील बुद्धीजीवी वर्ग जर वेळीच जागे झाले नाहीत, तर येणारा काळ पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असेल, असे डॉनच्या लेखाच्या शेवटी म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, इस्लामच्या आधारावर बनवल्या गेलेल्या पाकिस्तानला तथाकथित इस्लामी करण्याचा ढोंग करणारे किती मोठे नुकसान पोहोचवत आहेत याची त्यांना जाणीव नाही का? इतिहास यावर शोक करेल. आश्चर्याची गोष्ट ही की, पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या व विश्वसनीय दैनिकाने हा वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तान आतंकवादी असल्याचा याच्याइतका सबळ पुरावा आणखी कोणता असू शकतो?

Thursday, June 3, 2010

प्रश्न केवळ मंदिराचा नाही तर...

1992 पासून या विवादास्पद स्थळासाठी अनेक सूचना, सल्ले दिले गेले आहेत. ज्यांच्यात न्यायपूर्ण आणि सत्य गोष्ट सांगण्याची हिम्मत नाही ते लोक अशा गोल-गोल गोष्टी करून स्वत:ला "अमन का फरिस्ता' सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा गोष्टी करणाऱ्यांचा कदाचित आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा अथवा त्यांची बाजू कमकुवत असावी, म्हणूनच ते असे वेडगळ सल्ले देऊन मंदिरनिर्माणाला विरोध करण्याचा प्रयत्न करीत असतात.
काही दिवसांपूर्वी आणखी एक तकलादू तर्क दिला गेला. असे म्हटले जाऊ लागले की, इस्तंबूल येथील हागिया सोफिया चर्चच्या धर्तीवर हा प्रश्न सोडविला जावा.
या ठिकाणी हागिया सोफिया चर्चचा इतिहास समजून घेतला पाहिजे.
अयोध्येत राम मंदिर निर्माणाची चळवळ सुरू झाल्यापासून काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तसेच काही बुद्धीवादी स्वत: जणु शांतीदूत असल्याच्या थाटात फुकटचे सल्ले देताना दिसतात. अयोध्येत मंदिरही नको आणि मशीदही नको, असा शहाजोग सल्ला द्यायलाही ते विसरत नाहीत. बाबरीच्या ढिगाला हलवून त्या ठिकाणी एखादे रुग्णालय किंवा मोठी शिक्षणसंस्था उभारली जावी आणि यातून समस्त मानवजातीला लाभ होईल, असा सूरही ही मंडळी आळवताना दिसतात. आपल्या अतिरेकी बुद्धीचा अहंकार बाळगणारे बुद्धीजंतू आणखीही अनेक सल्ले देत असतात. त्यांचे म्हणणे असते की, असे केल्याने मंदिर आणि मशिदीचे प्रश्न सुटेल आणि देशात सुखशांती नांदेल.
अयोध्येत मंदिर बनू नये यासाठी अनेक कुतर्क दिली जातात. काही दिवसांपूर्वी आणखी एक तकलादू तर्क दिला गेला. असे म्हटले जाऊ लागले की, इस्तंबूल येथील हागिया सोफिया चर्चच्या धर्तीवर हा प्रश्न सोडविला जावा.
या ठिकाणी हागिया सोफिया चर्चचा इतिहास समजून घेतला पाहिजे. हागिया सोफिया चर्च सन 537 मध्ये बेंजांटाईन शासक जस्टिनियन याच्या कार्यकाळात बांधला गेला. हा काळ रोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ समजला जातो. त्या काळात रोमन शासकांनी स्थापत्य कलेचे अद्‌भूत दर्शन घडवीत अनेक चर्च बांधले. त्याकाळात त्यांचे साम्राज्य तुर्कस्तानपर्यंत पसरले होते. त्यामुळे येथेही अनेक चर्च उभारले गेले. हागिया सोफिया या चर्चची उभारणी त्याच काळात झाली होती, परंतु 13 व्या शतकाच्या शेवटी तिथे मुसलमानांचे राज्य आले. मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यकाळात धडाक्यात शेकडो मशिदी उभ्या केल्या. अनेक चर्चच्या मशिदीत रूपांतर करण्यात आले. इस्तंबूलमध्ये राज्य करणाऱ्या एका मुस्लिम शासकाची नजर हागिया सोफिया या भव्य चर्चवर पडली. त्याने आदेश दिला की, या चर्चला मशीद बनवा. मग काय चर्चची चिन्हे पुसली जाऊ लागली. चर्चला मशीद बनविण्याची धडपड सुरू झाली.
चारही बाजूला उंच उंच मनोरे उभे करण्यात येऊ लागले. चर्चमध्ये जिथे पादरी बसायचे तिथे सुल्तान नमाज करू लागला. चर्चच्या भिंतींवर मेरी आणि येशूची चित्रे होती, ती खरवडून काढण्यात आली. त्या ठिकाणी कुराणातील आयती लिहिल्या गेल्या. इतके सारे करूनही चर्चची ओळख ते पुसू शकले नाहीत. आजही त्या वास्तूच्या घुमटांवर मेरी आणि येशूची चित्रे पाहायला मिळतात. त्या सुलतानाला आणि मुस्लिम जनतेला चर्चचे मशीद बनविले याचेच समाधान होते.
हागिया सोफिया चर्चवर तुर्कांचा ताबा 1453 पासून 1934 पर्यंत राहिला, परंतु एक काळ असा आला की, 1923 मध्ये कमाल अतातुर्क यांच्या नेतृत्वात क्रांती झाली. त्यांनी सर्व जुन्या वास्तू पाडून टाकल्या.
कमाल पाशाने इस्लामला कठमुल्लांच्या तावडीतून मुक्त केले. राजकीय क्रांतीसोबतच ही सांस्कृतिक क्रांतीदेखील होती. इस्लामच्या नावाने जो पाखंड सुरू होता तो कमाल पाशा यांनी थांबविला. त्यांनी धर्माच्या नावाखाली चाललेले धर्मांधांचे राजकारण थांबविले. धूर्त मुल्ला आणि अय्याशी करणारे सुलतान यांना सुतासारखे सरळ केले. याच काळात पाशा यांची दृष्टी हागिया सोफिया मशिदीवरही गेली. कमाल पाशा यांचे म्हणणे होते की, मुस्लिम शासकांनी पूर्वी जोर जबरदस्ती आणि क्रूरतापूर्वक अन्य धर्मीयांची धर्मस्थळे ताब्यात घेतली ती परत केली पाहिजेत. यासाठी त्यांनी एक मोहीमच चालविली. मुसलमानांनी लावलेला कलंक पुसून टाकला.
अतातुर्क कमालपाशा यांनी जाहीररीत्या मुस्लिम शासकांच्या असहिष्णू कृत्यांची निंदा केली. त्यांनी अन्य धर्मीयांना त्यांची त्यांची धर्मस्थळे परत करायला सुरुवता केली. हागिया सोफिया चर्चसंंबंधी निर्णय घेताना पाशा यांनी इस्तंबूलमधील ख्रिस्ती लोकांना एकत्रित केलेे. त्या पादऱ्यांची क्षमायाचना करीत हे ऐतिहासिक चर्च त्यांच्या स्वाधीन करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्या काळात मुस्लिम शासकांच्या अत्याचाराने बेजार होऊन अनेक ख्रिस्ती तुर्कीतून पलायन केले होते. त्यामुळे पुढे येऊन या चर्चचा ताबा कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. हे चर्च पुन्हा कोण सुरू करणार असा प्रश्न होता. या संबंधात कमाल पाशा यांनी पोप यांच्याशीही संपर्क केला, परंतु कोणीही शासक किंवा धर्मगुरू हे चर्च स्वीकारायला समोर आले नाहीत. यानंतर कमाल पाशा म्हणाले, ख्रिस्ती बांधव चर्च ताब्यात घ्यायला समोर येत नसतील तर हा त्यांचा निर्णय आहे, परंतु राजकीय शक्ती वापरून या चर्चला मशीद बनविले गेले आहे, त्यामुळे ही बाब सहन करता येणार नाही.
उर्दूतील प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी आपल्या शिकवा और जवाबे शिकवा या पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्ही मुसलमानांनी हे अल्लाह तुला खुष करण्यासाठी चर्च पाडले नाहीत काय? अन्य धर्मीयांची धर्मस्थळेही आम्ही उद्‌ध्वस्त केली आहेत. त्यांना अपमानितही केले आहे, परंतु हे परवरदिगार तू तरीही मुसलमानांवर प्रसन्न का नाही झालास? परंतु कमाल पाशा हे इकबालसारखे धर्मांध नव्हते. त्यांनी परधर्मीयांना त्यांची धर्मस्थळे परत केली. ज्यांनी पुन्हा धर्मस्थळे स्वीकारली नाहीत, ती त्यांनी सन्मानाने जतन केली. यावरून ध्यानात येते की, इकबाल हा सच्चा मुसलमान नव्हता तर कमाल पाशा हे सच्चे मुसलमान होते. त्यांनी अन्य धर्मांचा आदर केला. अन्य धर्मीयांची श्रद्धास्थळे पाशा यांनी मुसलमानांच्या तावडीतून सोडवून दिली.
भले हागिया सोफिया चर्च स्वीकारायला ख्रिश्चनांनी नकार दिला असेल, कमाल पाशा यांनी मात्र त्या वास्तूला मशीद राहू दिले नाही. त्या वास्तूला एका संग्रहालयात रूपांतरित केले. कमाल पाशा यांच्या या धाडसाचे आणि न्यायाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
हागिया सोफिया चर्चचा इतिहास जेव्हा काही बुद्धीजीविंना आणि राम मंदिराच्या विरोधकांना ज्ञात झाले तेव्हा त्यांनी कमाल पाशा यांची मुक्त कंठाने प्रशंसा करायला सुरुवात केली. तुर्कीत जे काही घडले त्याचे भारतातही अनुकरण झाले पाहिजे, असे ते म्हणू लागले. कमाल पाशा यांनी संग्रहालय बनवून वादच संपुष्टात आणला त्यामुळे भारतातही उक्त वाद समाप्त करायचा असेल तर मंदिर आणि मशीद न बनविता तिथे एखादे संग्रहालय बनविले जावे. काही लोकांना हा सल्ला ऐकताना बरा वाटत असेल, परंतु ते असे करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचाच प्रयत्न करीत असतात.
प्रश्न केवळ राम मंदिराचाच असता तर काही लोक असा विचार करू शकले असते, परंतु येथे प्रश्न केवळ राम मंदिराचा नाही, तर राम जन्मभूमीचा आहे. एखाद्या महापुरुषाचे जन्मस्थान त्याच्या कोट्यवधी भक्तांसाठी तीर्थस्थळच असते. मंदिरे अनेक असू शकतात, परंतु जन्मस्थान तर एकच असते. कल्पना करा की, हागिया सोफिया चर्च येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थानी असते तर ख्रिस्ती बंधू-भगिनी आणि तत्कालीन ख्रिस्ती पादरी हे चर्च सोडायला तयार झाले असते का? येशूच्या जन्मस्थानी एखादे संग्रहालय झालेले ख्रिस्ती लोकांना चालले असते काय? याचे उत्तर आहे कदापि नाही.
कोणत्याही धर्मातील महापुरुषाचे जन्मस्थान बदलता येत नाही किंवा ते कोणाच्या ताब्यातही देता येत नाही. त्यामुळे हागिया सोफिया चर्चचे उदाहरण भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थान निर्माण होणाऱ्या मंदिरासाठी देता येणार नाही. अतातुर्क यांनी म्हटले की, ख्रिस्ती लोकांवर मुस्लिम शासकांकडून घोर अन्याय झाला आहे. वर्तमान सरकार हिंदूंच्या आस्थेचा सन्मान करत असे म्हणेल काय की, हिंदूंवर मुस्लिम शासकांनी घोर अन्याय केला आहे? गठ्ठा मतांसाठी लाचार होणारे सरकार असे म्हणणार नाही.
अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी जन्मलेल्या पुत्राचे स्थान अन्य ठिकाणी कसे असू शकेल? हिंदू परंपरेनुसार त्यांचे देवी-देवता जेथे जन्मले तेथे मंदिराशिवाय अन्य स्मृती काय असणार? त्यामुळे प्राचीन काळी तिथे मंदिरच असणार. राममंदिर तोडणे इस्लामी धर्मांधांना कठीण नव्हते. भारतातील शेकडो मंदिरे तोडून मशिदी बनविण्यात आल्या हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मंदिर आणि मूर्ती तोडण्याची मुसलमानांची परंपरा मुस्लिम कवी आणि इतिहासकारांनीही काही लपवून ठेवलेली नाही. त्यांनी अभिमानाने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद किंवा अन्य वास्तू बांधताच येणार नाही. रुग्णालय, संग्रहालय किंवा विद्यापीठ यांपैकी काही तिथे बांधता येणार नाही. हागिया सोफिया चर्चचे आपण जेव्हा ऐतिहासिक उदाहरण देतो तेव्हा मोकळ्या मनाने स्वीकार केले पाहिजे की, हिंदू समाज ज्या पवित्र स्थानासाठी शेकडो वर्षांपासून संघर्ष करीत आहे, तिथे रामजन्मभूमीवर मंदिरच निर्माण झाले पाहिजे.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील