पाकिस्तानने कधीही आतंकवादाचे समर्थन केले नसल्याचे पाकिस्तान सरकार व येथील मुल्ला- मौलवी सांगतात. भारतात अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हापासून पाकिस्तान ही दहशतवाद निर्यात करणारी भूमी असल्याचे चित्र तयार होत आहे. जिहाद शब्द तर पाकिस्तानची ओळख बनला आहे. पाकिस्तान सरकार या आरोपांचे वारंवार खंडन करत आहे व असे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत आहे. मात्र पाकिस्तानचे वृत्तपत्र दै. डॉनने या सर्व आरोपांचा स्वीकार केला आहे आणि पाकिस्तान सरकार काहीही म्हणो, कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही असे संकेत आपल्या वृत्तपत्रीय मजकुरातून दिला आहे.
मुस्लिम जगत // मुजफ्फर हुसैन
मुंबईच्या विशेष न्यायालयाने पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई हल्ल्याच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली. योगायोगाने त्याच दिवशी पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक फैसल शहजाद याला अटक केल्याची बातमी येऊन धडकली. याच फैसल शहजादने न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्क्वेअर येथे कार बॉम्बस्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुदैवाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना याची आधीच कुणकुण लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
फैसल शहजाद अमेरिकेच्या जॉन केनेडी विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडण्यात आले. जगात कोठेही दहशतवादी घटना घडली किंवा हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याची नाळ पाकिस्तानशी जोडलेली जाते. फैसल शहजादच्या अटकेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
याशिवाय आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे हे अतिरेकी एकतर पाकिस्तानी असतात किंवा पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन अथवा ब्रिटिश नागरिक तरी असतात. या अतिरेक्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे रोजगाराच्या शोधात किंवा पैसे कमविण्यासाठी अतिरेकी कारवाया करण्यास प्रवृत्त होणे हे एकवेळ समजू शकते, पण फैसल अहमद तर कोण्या गरीब घरचा नव्हता. तो तर पाकिस्तानच्या वायूदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा होता. याचाच अर्थ तो उच्चशिक्षित होता व गेल्याच वर्षी त्याला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले होते. मात्र अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त होताच त्याने पाकिस्तानला जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले.
तेहरीके तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शहजादने एकट्यानेच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानातील बुद्धिजीवी वर्गातून याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक याला धोक्याचा इशारा समजत आहेत. शहजादसारख्या उच्चशिक्षित तरुणाने हे कृत्य करणे यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. यापूर्वीही पाकिस्तानातील उच्चशिक्षित, पदवीधारक अशा कटात सामील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळलेे आहे. अशा कारवाया करताना घटनास्थळीच कित्येकांना पकडण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात अफगाणिस्तानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शहजातच्या कारवायांचा भांडाफोड झाला. अमेरिकेचे अधिकारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशी या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दै. डॉनने एक विश्लेषणात्मक लेख प्रकाशित केला आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानला जगभरात नव्या जिहादची बालवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
जगात कोठेही हिंसा आणि अराजकता असेल, त्याला सर्वस्वी जबाबदार पाकिस्तानच असल्याचे पाकिस्तानविरुद्धचे पुरावे सांगत आहेत. "नव्या जिहादची नर्सरी' हा शब्दप्रयोग करून दै. डॉनने म्हटले आहे की, अफगाणिस्तान लगतच्या पाकिस्तानच्या सीमारेषेला अल कायदाचे मुख्यकेंद्र मानले जात आहे. याबाबत डॉनने खैबर पख्तुनवाचे मुख्य पोलीस अधिकारी मलिक नवीद खान यांच्या वक्तव्याचा संदर्भही दिला आहे.
खान म्हणतात, संपूर्ण जगभरातून जिहादीवृत्तीचे लोक पाकिस्तानात येत आहेत. कारण ते सहजतेने सीमा ओलांडून अफगाणिस्तानात प्रवेश करू शकतात. ओसामा बिन लादेनचा अमेरिका व तिच्या समर्थकांविरुद्ध जे वैश्विक युद्ध आहे, त्याची पाळेमुळे अफगाणिस्तानातील पर्वतराजीत दूरवर पसरली आहेत. त्यामुळे कट्टरवादी तरुणांसाठी हा प्रदेश स्वर्गासमान आहे आणि सुरक्षितही.
"डॉन'च्या म्हणण्यानुसार सौदी अरेबिया आणि अमेरिकेने 80 च्या दशकात रशियन सेनेविरुद्ध अफगाणिस्तानला भडकावले. परिणामी रशियावर मोठा दबाव पडला व शेवटी रशियाचे सैन्य तेथून निघून गेले. मात्र अलकायदा आणि इतर जिहादी गटांचे अस्तित्व या ठिकाणी तयार झाले.
सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड सिक्युरिटीजचे प्रमुख इम्तीयाज गुल म्हणतात, पाकिस्तानने कोठूनही येणाऱ्यांना पेशावर व कबाईली प्रदेशात राहण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना या ठिकाणी अडवणारे कोणीही नाही. परिणामी गेल्या तीन दशकांत त्यांनी या प्रदेशात आपले बस्तान बसवले आहे. इम्तीयाज गुल आतंकवादाशी संबंधित प्रत्येक बाबींवर बारीक नजर ठेवून असतात. या संबंधात त्यांचे "सबसे खतरनाक स्थान' हे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.
"डॉन'च्या लेखात म्हटले आहे की, पाकिस्तानात आतंकवादाची सुरुवात जनरल जीयांच्या काळातच झाली, जेव्हा त्यांनी इस्लामचा सूर आळवायला प्रारंभ केला होता. भुट्टोंच्या फाशीला घाबरून जीयांनी इस्लामचा आधार घेतला होता. केवळ इस्लामचा पुरस्कार केल्यानेच आपल्याला लोकप्रियता मिळेल अशी त्यांची धारणा होती. त्यांचे देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण त्यांनी इस्लामच्या आधारावरच तयार केले होते. दुसरीकडे सैन्याने आणि एजन्सींनी कट्टरतावादी गटांना चुचकारणे सुरू केले होते.
या कट्टरवाद्यांना सेनेत आणि इतर संस्थांत उच्च पदे मिळू लागली. एकूणच काय तर इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) ही यांचीच निर्मिती होती. जीयांनी काश्मीर आणि अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याचा सपाटा लावला.
आज 5 अमेरिकन नागरिकांवर पाकिस्तानात खटले चालू आहेत. आतंकवादी हल्ल्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानच्या एका माजी राजकारण्याचा मुलगा असलेल्या डेविड हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात, लष्कर-ए-तोयबासाठी काम केल्याचे व 26 /11 च्या मुंबई हल्ल्यासाठी काही ठिकाणांची (ज्या ठिकाणी हल्ले झाले) पाहणी केल्याचे आरोप मान्य केले आहेत.
ब्रिटनने तर प्रारंभीपासूनच पाकिस्तानला आतंकवादाला जबाबदार ठरवले आहे. 2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याची योजना ही पाकिस्तानातील आतंकवाद्यांनी केली होती. ज्या चार युवकांनी स्वत:ला उडवले होते, त्यांचे प्रशिक्षणही पाकिस्तानात झाले होते. फैसल शहजादच्या अटकेनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आता अमेरिका कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला सूट देण्यास तयार नाही. त्यामुळे अमेरिकेने इशारा दिला आहे की, पाकिस्तानने आतंकवादाचा त्याग करावा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
पाकिस्तान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांतील अधिकृत सूत्रांनुसार अफगाणिस्तानात असलेले अमेरिकेच्या सैन्याचे कमांडर जनरल स्टेनली यांनी इस्लामाबाद येथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कियानींची भेट घेऊन त्यांना अमेरिकेची चिंता बोलून दाखवली. पाकिस्तानने तालिबान आणि अल कायदा यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी, असा अमेरिकेचा आग्रह होता.
शहजादचे घरचे लोक किमान दोन अतिरेक्यांना ओळखतात की जे जिहादी चळवळीत सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकाल्याचा परिणाम आता दिसू लागल्याचे अमेरिका खेदाने म्हणत आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत काही विपरित घडलेच, तर अमेरिकेला पाकिस्तानवर कारवाई करावी लागेल. पाकिस्तान सरकार व तेथील बुद्धीजीवी वर्ग जर वेळीच जागे झाले नाहीत, तर येणारा काळ पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असेल, असे डॉनच्या लेखाच्या शेवटी म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, इस्लामच्या आधारावर बनवल्या गेलेल्या पाकिस्तानला तथाकथित इस्लामी करण्याचा ढोंग करणारे किती मोठे नुकसान पोहोचवत आहेत याची त्यांना जाणीव नाही का? इतिहास यावर शोक करेल. आश्चर्याची गोष्ट ही की, पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या व विश्वसनीय दैनिकाने हा वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तान आतंकवादी असल्याचा याच्याइतका सबळ पुरावा आणखी कोणता असू शकतो?
No comments:
Post a Comment