Tuesday, May 11, 2010

अनुवांशिक आजारांचा धोका

लेखात म्हटले आहे की, भारतामध्ये असणारे रीतीरिवाज पाकिस्तानातही जवळपास तसेच आहेत. चुलत, मामे, मावस आणि आत्येभाऊ आणि बहिणी यांच्यामध्ये होणाऱ्या विवाहांवर दि न्यूज ने जोरदार टीका केली आहे. अशा विवाहांमुळे अनुवांशिक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा इशारा सदर वृत्तपत्राने पाकिस्तान सरकार आणि जनतेला दिला आहे.
या जगात जे जे जुने आहे ते ते सर्व टाकाऊ आहे असे नाही आणि जे जे नवे आहे ते ते सारे चांगलेच असते असेही नाही. वेळोवेळी होणारे प्रयोग आणि येणारे अनुभव यातून चांगले किंवा वाईट ठरत असते. एके काळी लग्नासाठी मुलगा आणि मुलगी आपल्याच समाजातील असावेत असा आग्रह असायचा.
काही समाजामध्ये तर आईकडून 16 गोत्र आणि वडिलांकडून 16 गोत्र सोडून वधू-वरांचे विवाह निश्चित केले जायचेे. रक्ताचे नाते जेवढे दूरचे असायचे तेवढेच त्यांचे संतान धष्टपुष्ट, निरोगी आणि बुद्धिमान जन्माला यायचे, परंतु स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मांचे प्रमाण विस्कळीत झाले आणि त्यामुळे दूरचे वधू-वर शोधणे कठीण बनले. जन्मकुंडली हाच एकमेव आधार बनला.
भारतीय समाजामध्ये विवाह हा एक संस्कार आहे. संस्कार पूर्ण करण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती आहेत. काळाच्या ओघात या पद्धतींमध्ये शिथिलता येत गेली. याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या नावाने झालेली असली तरी प्राचीन काळापासून तिथे राहणारी जनता तर भारतीयच आहे. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत आणि सामाजिक मनसुद्धा भारतीयच आहे. केवळ उपासनापद्धती बदलल्यामुळे (मुस्लिम झाल्यामुळे) त्यांचा पिंड थोडाच बदलणार आहे?
पाकिस्तानातही आता मुलांमध्ये अनुवांशिक समस्या पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानात ही समस्या मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील इंग्रजी दैनिक दि न्यूजने यासंबंधात एक अत्यंत रोचक आणि चकीत करणारा लेख प्रकाशित केला. या लेखाचे शीर्षक आहे, "विवाह और बिमारीयॉं'.
नात्यात विवाह केल्यानंतर जन्मणाऱ्या मुलांची बौद्धिक क्षमता अतिशय क्षीण असते. त्यांच्या आयक्यू आणि ऍप्टीट्यूड चाचण्यांवरून दिसून येते की, त्यांची बुद्धी कुशाग्र नसते. ही बाब तर मुले जेव्हा वाचू-लिहू लागतात तेव्हा ध्यानात येते, परंतु यापूर्वीच ते भयंकर आजारांना बळी पडतात. याविषयांवरील चर्चेला अग्रक्रम दिला गेला पाहिजे, असे न्यूजने म्हटले आहे.
लेखात पुढे म्हटले आहे की, आम्हाला कसला पाकिस्तान तयार करायचा आहे, दृढ आरोग्य असणारी भावीपिढी की, येत्या काळातील रोगग्रस्त पाकिस्तान?
काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानात 15 हून अधिक मुले एका दुर्मिळ आणि मृत्यूच्या जबड्यात नेणाऱ्या भयानक चर्मरोगाला बळी पडली आहेत. या आजाराचा सर्वात घातक पैलू म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणांना झेलण्याची क्षमता समाप्त होऊन जाते. बलुचिस्तान तर सोडाच लाहोर आणि कराचीसारख्या शहरांमध्ये देखील यावर उपचार होणे अशक्य आहे. या आजारासंबंधी उपाययोजना करण्यात पाकिस्तान सरकार निष्क्रिय आहे. तेथील सामाजिक संस्थांनाही याचे काही देणे-घेणे नाही.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका एन.जी.ओ. ने या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यामुळे या आजाराची भीषणता समाजासमोर आली. पाकिस्तानातील सुजाण नागरिकांनादेखील याविषयी खूपच कमी माहिती आहे.
याविषयावर विचार व्यक्त करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या समस्यांचे विवाह हेच कारण आहे. अनेक पिढ्यांपासून निकटवर्ती नात्यात विवाह होत आहेत. त्यातूनच या घातक रोगांचा जन्म होतो. जवळच्या नात्यांमध्ये वधू-वर शोधणे सोपे आहे, परंतु यामुळे आगामी काळात जन्मणारी पिढी घातक आजारांना बळी पडणार आहे. अशा विवाहांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात याचे वर्णन या छोट्याशा लेखात करता येणार नाही, परंतु रक्ताचा कॅन्सर आणि थॅलिसिमीया हे आजार सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
बलुचिस्तान हा प्रदेश तसा मागास समजला जातो. प्रत्येक तिसऱ्या कबिल्यात असा एकतरी रोगी आढळतोच. महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर असणे तर तेथे सर्वसामान्य बाब आहे. सुरुवातीला डॉक्टरांना वाटायचे की, ज्या माता आपल्या मुलांना स्तन पाजत नाहीत त्या महिलांमध्ये हा रोग होतो, परंतु आता माहीत झाले आहे की, स्तनाचा कॅन्सर हा नात्यातल्या विवाहामुळे होतो. मामेभाऊ अथवा मामेबहीण यांच्याशी होणाऱ्या विवाहामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कोपेनहेगन संमेलनात एक तथ्य समोर आले की, अधिक गोंगाट हा कानासाठी सर्वाधिक हानिकारक आहे आणि मनुष्याला यामुळे बहिरेपण येते. अचानक कानावर येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे हृदयावर मोठा घातक परिणाम होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु गोंगाटामुळे बहिरेपण येते, ही माहिती नवी आहे.
कराचीमधल्या रेहडीगोठ या भागात बहिरी मुलं जन्माला येऊ लागली आहेत. एधी फाऊंडेशनने पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. बिलकीस एधी यांचे म्हणणे आहे की, मुलींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले तरी काही उपयोग झाला नाही.
वातावरणातील मोबाईल आणि विद्युत तरंग यांचा मातेच्या गर्भावर विपरित परिणाम होतो. आज अवकाशात जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी बनविले जाणारे यंत्र आणि संवादासाठीची साधने खूपच घातक सिद्ध झाली आहेत. नात्यातल्या विवाहामुळे जन्मजात बहिरेपणा नवजात शिशुमध्ये का येत असावा, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
जन्मत:च आजार घेऊन येणाऱ्या बालकांवर उपचार करणे खूपच कठीण असते. जन्मानंतर येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करणे सोपे असते, परंतु जन्मत:च बहिरे असणाऱ्या बालकांवर उपचार करणे अशक्य असते.
विवाहापूर्वी लोकांची जनुकीय चाचणी करण्याचा कायदा करण्याचा विषय काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्याचे दि न्यूजनी म्हटले आहे, परंतु पाकिस्तानात हे सर्व घडून येणे कठीण वाटते. कारण हा समाज आजही रूढीवादी समजला जातो. आशियातील 2-3 देश सोडले तर असा कायदा कोठे आहे?
भारत हा तसा पुढारलेला देश आहे, परंतु आमची पारंपरिक विचार करण्याची पद्धत कसे बदलणार? जेथे विवाहापूर्वी वधू-वरांनी एकमेकांचे मुख पाहण्यातही अनेक अडचणी आहेत, तेथे या गोष्टी कशा शक्य होणार?
समाजाला या भयंकर अनुवांशिक आजारातून मुक्त करायचे असेल तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे. लोकांना समजले पाहिजे की, पहिल्या चुलत नात्यांमध्ये विवाह म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. लोक अशा विवाहांचे समर्थन करतात, कारण असे विवाह ठरविणे मोठ्या लोकांना खूपच सोपे असते. यामुळे कबिल्याबाहेर विवाह करायचा नाही या गोष्टीलाही बळ मिळते.
दि न्यूजने म्हटले आहे की, बलुचिस्तानची कहाणी टी.व्ही. वर गाजती आहे, परंतु वृत्तपत्रांनी देखील अशा मुद्द्यांवर लोकांमध्ये जागृती घडवून आणली पाहिजे.
या समस्येचे सर्वात मोठे कारण आहे एखाद्या नव्या धर्माचा उदय आणि एखाद्या नव्या पंथ-संप्रदायाची सुरुवात. सुरुवातीला जमलेले मूठभर लोक अधिक करून आपापसात नाते जुळवतात. संख्या कमी असते तेव्हा लोक जवळच्या नात्यातच मुलं-मुली शोधतात. ही जवळीकताच अनुवांशिक आजारांचे कारण बनते.
फार पूर्वी दळणवळणाची साधने खूप कमी होती. त्या काळात जवळच्याच लोकांशी विवाह जुळवणे सोयीचे होते. आजही जे लोक विदेशात राहतात आणि आपल्याच धर्म किंवा जातीला प्राथमिकता देतात ते नकळतपणे या आजारांना आमंत्रण देतात. वधू-वर विषयक जाहिरातींमुळे खूप मोठा बदल झाला आहे, परंतु जेथे समाज अशिक्षित आहे आणि प्रसिद्धी माध्यमापासून दूर आहे, त्यांच्यासाठी आजही दूरचा विवाह अडचणीचा ठरतो. नात्यामध्ये विवाह जुळवण्यामागे घटस्फोटाची भीती हेही एक कारण आहे.
परिवार आणि कबिल्यातील ज्येष्ठ व्यक्ती विचार करतात की, कुळाचा दबाव आणि समाजाच्या भीतीमुळे वैवाहिक जीवन निभावून नेणे सहजशक्य बनते, परंतु प्रत्येक समाजात वाढत चाललेली घटस्फोटाची प्रकरणे पाहिली म्हणजे यात काही तथ्य नाही, हे दिसून येते.
समाजात जेव्हा मुलं किंवा मुलींचे प्रमाण कमी असते, तेव्हा साटे-लोटे प्रथा प्रबळ बनत जाते. एकाच्या बदल्यात दुसरे, याचा सरळ अर्थ आहे जाणीवपूर्वक नात्यातच विवाह ठरविले जात आहेत. नात्यातल्या विवाहांमागे कोणतीही कारणे असली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत.
वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन झाल्यानंतरही आपण जर मामे, चुलत, आत्ये आणि मावस भाऊ अथवा बहिणींशी विवाह करीत असू, तर याचा अर्थ असा आहे की, आपण स्वत:हूनच अनुवांशिक रोगांना आमंत्रित करीत आहोत. परिणामी तीन चार वर्षांच्या मुला-मुलींच्या डोळ्यांवर चष्मा येत असेल तर याला जबाबदार कोण?
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

प्रेमिकांच्या छळवणूक कथा

शोएब मलिक हा एक लबाड प्रेमीआहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मनात भारताप्रती प्रचंड घृणा आणि द्वेषभावना आहे. तो आपल्या खेळाप्रतिदेखील प्रामाणिक नाही. जो आपल्या देशाशी प्रामाणिक नसेल, तो आपल्या भावी पत्नीप्रति किती प्रामाणिक राहणार? याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टेनिस जगतात भारताचे नाव पुढे आणणारी सानिया मिर्झा लवकरच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या भावी जोडीला आमच्या अनेक बधाईयॉं. वधुवर बनून बोहल्यावर चढण्यापूर्वीच दोघांचा भूतकाळ हात धुवून मागे लागल्याचे दिसत आहे. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात कीर्ती मिळवली आहे, परंतु हे दोघे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत. सानिया जेव्हा टेनिसच्या मैदानात आली तेव्हा मुल्ला-मौलवींनी तिच्याबद्दल कडक नाराजी व्यक्त केली होती. सानियाच्या कपड्यांवरून चर्चा रंगली होती. दुसरा कोणता इस्लामी देश असता तर तिला गुडघे टेकावे लागले असते, परंतु भारतात कठमुल्लांची डाळ शिजली नाही.
सानिया मैदानात टिकून राहिली आणि शेवटी तिनेे स्वत:ला समर्पित खेळाडू म्हणून प्रस्थापित केले. अधूनमधून तिच्या विवाहविषयक बातम्याही वाचायला मिळायच्या. हैदराबादच्या एका मोठ्या बेकरी मालकाच्या मुलाशी विवाह ठरल्याच्या बातम्याही वाचायला मिळाल्या. बेकरी मालकाचा मुलगा सोहराब हा सानियाचा बालमित्र. बेकरी मालकाच्या परिवाराशी सानिया मिर्झा यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ नाते असल्यामुळेच हा विवाह ठरला होता. ही वार्ता लोकांपर्यंत पोहोचते न पोहोचते तोच ठरलेला विवाह तुटल्याच्या बातम्याही येऊन थडकल्या.
सानियाच्या खेळाविषयी झाल्या नाहीत तेवढ्या चर्चा तिच्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून झाल्या. विवाहपूर्व शारीरिक संबंधांचे सानियाने जाहीर समर्थन केले. हे तिचे वैयक्तिक मत असू शकते, परंतु तिरंग्याविषयी तिने व्यक्त केलेल्या मताने मात्र कोट्यवधी भारतीयांच्या भावना पायदळी तुडविल्या गेल्या. तरीही मोठ्या मनाने भारतीयांनी हैदराबादच्या या मुलीला सन्मान दिला. टेनिसच्या मैदानात सानिया भारताचा झेंडा सदैव फडकवीत ठेवेल, याविषयी दृढ विश्वास व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी आलेल्या सानियाच्या बातम्यांमुळे खळबळ माजली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी सानिया विवाह करणार असल्याची बातमी तशी खळबळजनकच होती. सानियाच्या घरच्या मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा विवाह 15 एप्रिलपर्यंत संपन्न होऊन जाईल. गेल्या आठवड्यातच त्या दोघांनी गुपचूप विवाह केल्याचीही चर्चा आहे.
तसे पाहिले तर वयात आलेल्या मुला-मुलींना आपला साथीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु पती-पत्नी बनल्यानंतर दोघांचे ग्रहस्थी जीवन सुखाचे होईल, याची काळजीही भारतीय संस्कृती करते. भविष्य कोण जाणलंय? परंतु वातावरणाचा कानोसा घेतला तर सानियासाठी भावी गृहस्थी जीवन खूपच कठीण दिसते.
शोएब मलिक हा सडकछाप प्रेमी आहे. त्याच्या स्वभावावरून वाटते की, पाकिस्तानात पुन्हा एकदा रीना रॉय हिच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होईल. मोहसीन खान हा पूर्वीच्या काळचा नावाजलेला क्रिकेट खेळाडू. त्या काळातील प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रीना रॉय त्याच्या प्रेमात फसली. रीना रॉय हिच्यावर काय गुदरलं माहिती आहे? रीना रॉय हिचे सारे उपकार मोहसीन खान विसरून गेला. सानियाच्या विवाहप्रसंगी रीना रॉय इतकेच म्हणेल की, सानियाला शुभेच्छा देणे ही तर आपली संस्कृती आहे, परंतु शुभेच्छांसोबत माझी कला आणि करियरचा सत्यानाश करणाऱ्या पाकिस्तानला दु:खाचे सुस्कारे आणि वेदनेचे हुंदकेही घेऊन जा!
क्रिकेटच्या मैदानावरील खेळ पाहून आपल्या प्रेमात पडलेल्या प्रेमिकांना पत्नी बनवल्यानंतर तिचे सौंदर्य, बोैद्धिक कुशलता, चंचलता, चपळता आणि समर्पण या साऱ्यांचा निर्घृण खून कसा पाडला जातो, तिची संपत्ती हडप करून तिच्या यौवनावर कसा घाला घातला जातो, याविषयी काही जाणून घ्यायचे असेल तर जमाइमा हिला अवश्य विचारा. ती इम्रान खान याच्या प्रेमात पडून त्याची पत्नी बनली होती. ती त्याच्या दोन मुलांची आई बनली होती, परंतु त्यानंतर एक दिवस या विदेशी महिलेला आपल्या लंडन येथील माहेरी परतावे लागले.
जमाइमा हिने इम्रान याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, परंतु या मदांध आणि विक्षिप्त क्रिकेटपटूने जमाइमा हिला भिकेला लावले. त्याने आरोप केला की, तुझ्यामुळे मी निवडणूक जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा पंतप्रधान बनणे हे माझे स्वप्न आहे, परंतु तू एका यहुद्याची मुलगी आहेस. माझा देश पाकिस्तान तुझा स्वीकार कसा करेल?
जमाइमा हिच्या वडिलांना केवळ दोन मुलीच होत्या. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि इम्रान याला प्रचंड संपत्ती मिळाली. यानंतर इम्रान याने बिचारी जमाइमा हिला केवळ पाकिस्तानातूनच नव्हे तर आपल्या मनातूनही हाकलले. इम्रान खान हा पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकला नाही. तो कसाबसा संसदेपर्यंत पोहोचू शकला. आता तो राजकारणाच्या दलदलीत फसल्याचे दिसत आहे. त्याची दोन्ही मुले आईजवळ लंडनमध्ये वाढत आहेत. असे आहे पाकिस्तानातील क्रिकेटपटूंचे चरित्र, चारित्र्य आणि काळाकुट्ट इतिहास!
केवळ क्रिकेटपटूंच असे करतात असे नाही. पाकिस्तानातल्या कोणत्याही क्षेत्रावर दृष्टी टाका. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. प्रसिद्ध गायिका नूरजहॉं ही मोठी स्वप्ने घेऊन पाकिस्तानात गेली होती. तिचा प्रिय पती शौकत नावाजलेला दिग्दर्शक होता. तिला काय माहीत की हा पती एक दिवस आपल्याला तलाक तलाक तलाक म्हणून घराबाहेर काढेल? नूरजहॉं हिला पाकिस्तानात गेल्याबद्दल खूप पश्चाताप करावा लागला. याबद्दल खूप लिहिले गेले आहे.
डायनाच्या घटस्फोटानंतर पाकिस्तानी डॉक्टर एहसान खान याच्याशी तिचे सूत जुळेल असे वाटत होते. त्यावेळी पाकिस्तानी मोठ्या अभिमानाने सांगायचे की, डायना एक दिवस पाकिस्तानची सून बनेल, परंतु तिच्या भाग्यात दुसरेच लिहिले होते. एहसान याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच मृत्यूने तिची सुटका केली. पाकिस्तानात प्रेम तर करता येते, परंतु त्याला विवाह म्हणून कायदेशीर मान्यता मिळत नाही. इस्लाममध्ये आपल्या पद्धतीने निकाह करणे बंधनकारक असते. सर्वात आधी गैरमुस्लिमाला मुस्लिम बनावे लागते. त्यानंतरच ती एखाद्या मुसलमानाची पत्नी बनू शकते.
शरियतनुसार एका मुसलमानाला चार बायका करण्याची परवानगी आहे. प्रेमिकाच, पण जिने निकाह केला आहे, तिचा कोणता नंबर? हे तर तिच्या भाग्यावर अवलंबून असते. तिचा प्रेमी पती तिला किती दिवस आपल्या निकाहात ठेवेल आणि कधी तलाक देईल, याची भविष्यवाणी करणे अवघड असते. विवाहाचा विचार करता पती हा एकप्रकारे हुकूमशहाच असतो. इस्लामने तर पत्नीला खुला (स्त्रीकडून दिला जाणारा तलाक) चा अधिकार दिला आहे, परंतु बिचाऱ्या किती महिलांना खुला मिळतो! याची कुठेच गणती नाही. येथे केवळ आणि केवळ पुरुषांचाच अधिकार चालतो.
आजवर आलेल्या बातम्यांवरून आता सिद्ध झाले आहे की, शोएब मलिक हा आधीपासूनच विवाहित आहे. त्याचा आयेशा सिद्दिकी नामक तरुणीबरोबर निकाह झाला होता. त्याने आता तिला तलाक दिला आहे. आयेशाच्या वडिलांनी पोलीस ठाणे जवळ केल्यामुळे शोएब अडचणीत आला. पोलिसांनी त्याचे पारपत्र जप्त केले. अटकेची शक्यता होती. त्यामुळेच सुरुवातीला उर्मटपणा करणारा शोएब तलाक द्यायला तयार झाला.
शोएब याने मिस इंडिया सायली भगत हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती या लांडग्याच्या तावडीत फसली नाही. त्याची पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात बदनाम कॅप्टन म्हणून ओळख आहे. मॅच फिक्सिंगपासून क्रिकेटसंबंधित सगळ्याच गुन्ह्यांमधे तो आकंठ बुडाला आहे. त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून त्याचे भवितव्य काय असेल, हे सांगणे कठीण!
त्याने क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी सदैव शत्रुत्व जपले आहे. गेल्यावेळी भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला होता, तेव्हा जगातील साऱ्या मुसलमानांची शोएब याने क्षमायाचना केली होती. क्रिकेटच्या मैदानात त्याची भूमिका सदैव धर्मांध मुसलमानाला शोभेल अशीच राहिली आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराला ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रसंगी अनुशासनहीनतेसाठी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
सानियाचेही टेनिसमधील आकर्षण आता कमी होताना दिसत आहे. विश्व टेनिस स्पर्धेत 2007 मध्ये तिचे स्थान 27 वे होते. 2008 मध्ये ती 92 व्या स्थानावर फेकली गेली. सानिया आणि शोएब या दोघांनी लग्नानंतर दुबईत राहणार असल्याचे म्हटले आहे. शोएब पाकिस्तानकडून आणि सानिया भारताकडून खेळतील असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या मनाला हे वक्तव्य चांगले वाटत असले तरी यात काही तथ्य नाही. सानियाला भारताकडून मन:पूर्वक शुभेच्छा आहेत, परंतु पाकिस्तान्यांच्या परंपरेनुसार सानियाची फरफट प्रेमिकेकडून छळवणूक कथेकडे झाली, तर ती एका चांगल्या खेळाडूच्या करियरची आत्महत्या ठरेल!
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

Sunday, May 9, 2010

मुंबईत 90 हजार पाकिस्तानी

मुंबईत 90 हजार अवैध पाकिस्तानी राहतात. ही संख्या अधिकही असू शकेल, कमी नाही. मुंबई महानगरपालिकेकडून प्रकाशित कागदपत्रानुसार मुंबईत किमान 90 हजार पाकिस्तानी सुखा-समाधानाने राहत आहेत. इतकी मोठी संख्या मुंबईत पंजाब, हरियाणा आणि गोवा येथून आलेल्यांचीही नाही. ही खळबळजनक आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने 2009 च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालात उपलब्ध आहे.
भारतातील सर्वात मोठ्या महानगरात आम्ही राहतो, याचा मुंबईकरांना मोठा अभिमान असतो. बॉलिवूड नगरी, भारतातील महान औद्योगिक शहर या शब्दांत मुंबईचे वर्णन केले जाते. तसे पाहिले तर मुंबईची विशेषता अनेक क्षेत्रांशी निगडित आहे, परंतु मुंबईकरांना कुठे माहीत आहे की, त्यांच्या पुढे-मागे, वर-खाली अख्ख्या मुंबईला हादरवून सोडू शकतील असे अपराधीही राहतात?
26 नोव्हेंबरच्या घटनेआधी किती पापी मुंबईत येऊन गेले हे कुणाला माहीत आहे? या सुंदर शहराला उद्‌ध्वस्त करण्याचे कारस्थान रचण्यासाठी ते येथे किती दिवस राहिले याची तरी कोणाला माहिती आहे? सामान्य लोकांच्या सुखी जीवनावर आघात करून त्याची राखरांगोळी करणारे या शहरात वावरताहेत हे तरी किती जणांना ठाऊक होते?
भारताचे तुकडे होऊन पाकिस्तान बनले तेव्हापासून भारत फाळणीच्या वेदना सहन करीत आहे. मुंबई आजही या वेदनेने विव्हळताना दिसते. पाकिस्तान उगवल्यानंतर तेथील लेखक कवींनी दिल्ली, लखनौ आणि कोलकाता या शहरांपेक्षा मुंबईवर लेखणी झिजवल्याचे दिसून येते. आपल्या जीवनात एकदा तरी मुंबईत यावे असे प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीची इच्छा असते, कधी व्यापारी बनून, कधी फिल्मी हस्ती बनून, तर कधी अतिरेकी बनून. असे नसते तर भारतीय शहरांपैकी मुंबईतच सर्वाधिक अवैध पाकिस्तानी राहिले नसते.
वेगवेगळी निमित्ते शोधून पाकिस्तानी मुंबईत येत असतात. काही इकडे तिकडे फिरून परततात. काही मुंबादेवीच्या या नगरीला उद्‌ध्वस्त करण्याचे मनसुबे ठेवून येथेच राहतात. मुंबई पोलीस त्यांचा शोध घेतात, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. मुंबईत बाहेरून येऊन जेवढे लोक मिसळतात त्यात सर्वाधिक संख्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींची आहे.
भारतात भारत-पाक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होते तेव्हा पाकिस्तान्यांना भारतात घुसण्याची खूप मोठी संधी वाटते. गेल्या वेळी अशाच स्पर्धांच्या वेळी भारत सरकारने पाच हजार पाकिस्तानी लोकांना भारतात येण्यासाठी पारपत्र दिले होते. त्यातून 1700 लोक आता तीन वर्षे होऊनही अद्याप पाकिस्तानला परतले नाहीत. भारत सरकार शोधून शोधून थकले, मात्र त्यांचा ठावठिकाणा काही लागला नाही.
अशा संधी वर्षातून दोन-चारदा येतातच. क्रिकेट आणि चित्रपट हे पाकिस्तान्यांसाठी भारतात घुसण्याची प्रमुख माध्यमे आहेत. आता राजस्थानच्या मुनाबव स्टेशनवरून चालणारी रेल्वे, धडाक्यात सुरू असणाऱ्या बसगाड्या यांमुळे भारतात येणे कठीण नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या बसमध्ये बसायलाही जागा नसते, मात्र दिल्लीहून परतणाऱ्या गाड्या जवळजवळ रिकाम्या धावतात. पाकिस्तानातून भारतात सर्वांनाच यायचे असते, परंतु भारतातून आपल्या शहराला, गावाला परतायची इच्छा मात्र कोणालाच नसते. याचे काय कारण असावे बरे!
मागील काही वर्षांपासून मुंबईत अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान्यांची मुंबईतील संख्या कमी झाली आहे, परंतु समाधान व्यक्त करण्याइतकी ती कमी झालेली नाही. मुंबईच्या 1 कोटी 19 लाख 78 हजार 450 इतक्या लोकसंख्येत 89 हजार 838 इतके पाकिस्तानी आहेत. म्हणजेच जवळजवळ 1 प्रतिशत लोकसंख्या पाकिस्तानी आहे. कोणी म्हणेल ही संख्या तर खूपच नगण्य आहे, परंतु विषाचा एक कणदेखील आपला नाश करू शकतो हे विसरून चालणार नाही. येथे प्रस्तुत केलेली आकडेवारी ही 2001 सालच्या जनगणनेवर आधारित आहे. मे 2011 मध्ये जनगणना सुरू होईल. तेव्हा कळून येईल की, मुंबादेवीच्या नगरातील पाकिस्तानी वाढले की कमी झाले?
मुंबई महानगरपालिकेने 2007 साली टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून प्रकाशित एका सर्व्हेक्षणाचा आधार घेऊन ही आकडेवारी प्रकाशित केली. कोणतीही राजकीय विचारधारा असलेली व्यक्ती टाटा सोशल सायन्स संस्थेकडे अविश्वासाने पाहात नाही. ही संस्था अत्यंत विश्वसनीय आहे. टाटा सोशल सायन्स संस्थेने प्रकाशित केलेली आकडेवारी पाहा... 1961 साली मुंबईच्या लोकसंख्येत 4.17 टक्के लोक पाकिस्तानी होते. 1971 मध्ये 3.05 टक्के, 1981 मध्ये 2.06 टक्के आणि 1991 मध्ये 1.32 टक्के होते.
आता 2001 मध्ये ही आकडेवारी कमी होऊन 1 वर आली आहे. एक पाकिस्तानीही भारतासाठी धोका ठरू शकतो, मुंबईत तर 1 टक्के लोक पाकिस्तानी आहेत. ही खूप मोठी संख्या आहे.
महानगराच्या पोलीस व्यवस्थेत विदेशी नागरिकांशी संबंधित एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडे सर्व प्रकारची माहिती असते. मुंबई पोलीस विभाग वरील आकडेवारीला मान्यता देत नाही. बांगलादेशींच्या संबंधातही जेव्हा चर्चा सुरू असते, तेव्हाही मुंबई पोलीस मौन असतात, परंतु जेव्हा मतदार याद्यांतून लोक बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांना ओळखतात तेव्हाही पोलीस व्यवस्था मौनच असते, हे चिंताजनक आहे.
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारही आकडेवारी सार्वजनिक करू इच्छित नाही, परंतु आता माहितीच्या अधिकाराखाली त्यांना ही माहिती द्यावीच लागेल. साऱ्या जगाला माहीत आहे की, मुंबई महापालिकेत दोन वॉर्ड असे आहेत की, जेथे नगरसेवक विजयी होणे अथवा पराभूत होणे हे पाक आणि बांगलादेशींवर अवलंबून आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने या संबंधीची माहिती प्रामाणिकपणे उपलब्ध केली, याबद्दल मुंबई महानगरपालिका आभारी आहे. सरकार कानाडोळा करते त्यामुळे परदेशात बसून भारतात अतिरेकी कारवाया चालविणारे सहजपणे भारतात स्लीपर सेल तयार करण्यात यशस्वी होतात. बाहेरून आलेल्या अतिरेक्यांना जोवर आतून समर्थन मिळत नाही, तोवर त्यांच्या कारवाया यशस्वी होऊच शकत नाही. जगात अनेक देशांत अतिरेकी कारवाया सुरू आहेत, परंतु भारतात आतून समर्थन मिळविणे अतिरेक्यांसाठी खूपच सोपे आहे.
सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीन भारत सरकारसाठी डोकेदुखी बनले आहेत. या अतिरेकी संघटनांसाठी महानगर मुंबई म्हणजे एक सुरक्षित किल्लाच. 1993 चे बॉंबस्फोट असू देत की, 26/11 ची घटना, देशद्रोही तत्त्वांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या देशद्रोही तत्त्वांना मुंबईत आर्थिक सहाय्यही सहजतेने होते. मुंबई हे शहर हवाला रॅकेटसाठीही कुप्रसिद्ध आहे. मुंबईच्या सागरी सीमा पळून जायला सोईच्या आहेत. महाराष्ट्राला जवळपास 750 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. इतका मोठा सागरकिनारा मुंबईवर हल्ला करण्यासाठी आत आणि बाहेर लपलेल्या पाकिस्तान्यांसाठी सोयीचे आहे. भारताचे शत्रू मुंबईवर हल्ला करण्यासाठी जणु टपूनच बसलेले असतात.
अवैध पाकिस्तानी विविध मार्गांनी मुंबईत घुसतात. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सरळ सरळ तीन लढाया झाल्या. या काळात पोलीस विभागाने सर्वाधिक पाकिस्तानी मुंबईतूनच पकडले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई शहर भारताच्या शत्रूंसाठी एक केंद्र बनल्याचे दिसते. पाकिस्तान्यांना शोधून काढणे खूप कठीण असले तरी यांना पकडून जोपर्यंत त्यांच्या देशात ढकलून देण्यात येणार नाही तोपर्यंत मुंबई आणि भारत सुरक्षित राहू शकणार नाही.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

भारतीय भाजीपाला पाकिस्तानात

पाकिस्तानी माध्यमांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानात कांदे आणि बटाटे स्वस्त दरात उपलब्ध करून भारत येथील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. भारतीयांच्या तोंडचा भाजीपाला पळवून सारा माल भारत धडाक्यात पाकिस्तानात पाठवीत आहे. बाजारात भारतीय माल इतका स्वस्त असतो की, पाकिस्तानी शेतकरी कोणत्याही स्थितीत स्पर्धा करू शकत नाही. पाकिस्तानी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढा पैसाही पदरात पडत नाही.
भारतात महागाईने लोकांना बेजार केले आहे. रस्त्यापासून संसदेपर्यंत सर्वत्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध होत आहे, परंतु सरकारने आपली कातडी आणखी टणक केली आहे. सकाळी घरात कोणती भाजी आणायची याची चिंता भारतीय महिलांना दररोज भेडसावत आहे. भाजी मंडईत गेल्यानंतर ध्यानात येते की, कालचे कोबी अन्‌ टोमॅटोचे भाव आज नाहीत. कोणतीही भाजी घ्यायची म्हटली तरी अव्वाच्या सव्वा भाववाढ झाल्याचे दिसत आहे. कालपर्यंत दाळ-भात, कांदा-भाकरी आमच्या ताटात दिसायची. आता कांदा रजेवर गेला आहे. भाकरी कधी संपावर जाईल माहीत नाही. सर्वसामान्य जनता महागाईने मेताकुटीला आली आहे. काही दिवसांनी अनागोंदी माजली तर आश्चर्य नको. भारतातल्या शेतीत असंख्य प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येते. यातून भारतीयांचे उदरभरण होत असते, परंतु आता पालक, मेथी, कारले आणि भेंडी आदी भाज्या जणु पंचपक्वान्नाप्रमाणे सर्वसामान्यांच्या भोजनातून दूर झाल्या आहेत. मंडईतून भाज्या कमी होण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील सर्वात मोठे कारण उन्हाळा असल्याचे सांगण्यात येते, परंतु ते खरे नाही. सरकार आपले पाप झाकण्यासाठी थापा मारीत आहे.
कांद्यापासून बटाट्यापर्यंत आणि हिरव्या मिरचीपासून वाटाण्यापर्यंत सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आता दिसत का नाहीत? लोक विचारत आहेत, भाज्या कोठे गेल्या? भाजीपाल्यांचे भाव गगनाला का भिडले? या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांकडेही नाही, परंतु पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमांजवळ मात्र या प्रश्नाचे उत्तर अवश्य आहे. पाकिस्तानातील सर्वात अधिक विश्वसनीय आणि लोकप्रिय इंग्रजी दैनिक दि नेशनने याचा भांडाफोड केला आहे. या वृत्तपत्राने लिहिले आहे की, "भारतीयांच्या तोंडचा घास हिसकावून भारत सरकार पाकिस्तानी लोकांना देण्यासाठी मन मोठे करीत आहे.'
भारतीयांच्या भुकेचे शोषण करून भारत सरकार अन्याय करीत आहे, हे सत्य आहे. सरकार एकीकडे उदार होऊन पाकिस्तानी लोकांवर कृपा करीत आहे तर दुसरीकडे तुटवडा निर्माण करून भाजीपाल्याचा काळाबाजार करणाऱ्यांच्या तुंबड्या भरत आहे.
पाकिस्तानातील या वृत्तपत्राने भारताकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यासंबंधीही कडवट टीका केली आहे. नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या नद्यांचे पाणी लबाडी करून भारत अनेक वर्षांपासून आपल्याकडे वळवत आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमे कालपर्यंत काश्मिरातील दहशतवादाच्या नावाने भारताच्या नावे खडे फोडीत. आता ती भाजीपाला विषयावरून आणि नद्यांच्या पाण्याची चोरी होत असल्याचे सांगून भारताच्या नावे शंख करीत आहेत.
दि नेशनने लिहिले आहे की, आमच्या वाटणीचे सिंधू नदीचे पाणी पळवल्यानंतर आता नवी दिल्ली स्वस्त दरात भाज्या निर्यात करून आमची शेती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या कृषि आधारित अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा हा प्रकार आहे. या षड्‌यंत्राचा उद्देश आमच्या शेतकऱ्यांना संपविणे हा आहे.
भारतातून येणाऱ्या भाज्या विशेषकरून कांदा आणि बटाटा यांची आयात रोखण्यासाठी इस्लामाबादने मोठी कस्टम ड्युटी लावली आहे. यामुळे वर्षभरापूर्वी दोन्ही देशांतील व्यापार ठप्प झाला होता, परंतु व्यापार पुन्हा कसा सुरू झाला माहीत नाही. पाकिस्तानच्या संसदेने किंवा आयात-निर्यात मंत्रालयाने या संदर्भात कोणत्याही नव्या धोरणाची घोषणा केलेली नाही, तरी व्यापार कसा सुरू झाला हा प्रश्नच आहे.
पाक सरकारच्या अनुमतीशिवाय हे सर्व होत आहे याबद्दल दि नेशनने आश्चर्य व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील काही मंडळींच्या स्वार्थातून तर हे होत नाही ना? पाक सरकार या मुद्द्यावर उदासीन आहे आणि भारत सरकार धडाक्यात माल पाठवीत आहे. दि नेशनने दिलेल्या माहितीनुसार दररोज 40 ट्रक भाज्या भारतातून पाकिस्तानात जात आहे. पाकिस्तानच्या सीमेवर यासाठी कोणतेही बंधन नाही. आजपर्यंत कोणत्याही ट्रकवाल्याने याविषयी तक्रार केलेली नाही. याचाच अर्थ असा की, भाज्यांचा काळाबाजार करणाऱ्यांचे भारतीय व्यापाऱ्यांशी संगनमत आहे. कसे का होईना लोकांना भाजी मिळत आहे तर यात वाईट काय, अशी पाक सरकारची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासन कानाडोळा करीत आहे. खरे तर भारतातही भाज्यांची स्थिती खूप चांगली आहे असे नाही. भारतातील मंडईत दररोज भाज्यांचे भाव वाढत आहेत, परंतु भारतीय जनता आणि सरकार पाकिस्तानचे नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणजे आपल्या लोकांना भुकेले ठेवूनही भारत सरकार पाकिस्तानला दु:खी आणि अपमानीत करण्याचा प्रयत्न करते.
दि नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानातील ट्रेड माफियांनी कांद्याचे भाव 20 वरून सरळ 40 रुपये किलोवर नेऊन त्यांना मदतच केली आहे. या व्यापाराला अधिकृत मान्यता नसताना इतक्या धडाक्यात सुरू आहे, हे मोठे आश्चर्य आहे. कांद्याप्रमाणेच बटाट्याचे ट्रकही सीमापार करून पाकिस्तानात पोहोचत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात बटाटा 10 ते 15 रुपयांत उपलब्ध होता. आता बटाटा 30 रुपयांवर गेला आहे.
पाकिस्तानात लाहोर, हैदराबाद आणि मुल्तान येथील भाजीपाला विक्रत्यांचे म्हणणे आहे की, आता तर कोबी आणि लसूणसुद्धा ट्रकने येत आहे. पाकिस्तानातील भाजी मंडईतील सूत्रांचे म्हणणे आहे की, आमच्या इथे टमाटे आणि पान कोबी यांची काहीही कमतरता नाही तरीही कांद्या-बटाट्याच्या ट्रकमधून याच्या करंड्या धडाक्यात येत आहेत. वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, भारतात भाज्यांचा दुष्काळ आहे तरीही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यामागे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पंगू करण्याचे षड्‌यंत्र आहे. पाकिस्तानातील ज्या शेतकऱ्यांची रोजीरोटी भाजीपाला शेतीवर अवलंबून आहे, ते चिंताग्रस्त झाले आहेत, परंतु त्यांची काळजी आहे कोणाला? भारतीय कालपर्यंत चित्रपट, कापड आणि फॅन्सी सामान चोरट्या मार्गाने पाकिस्तानात पाठवायचे. आता तर आमच्या जेवणाच्या ताटातही त्यांनी घुसखोरी केली आहे. भारतीय कांदा आणि बटाटा या भाज्यांनी थैमान घातले आहे. पूर्वी पाकिस्तानला बटाटा कमी पडायचा तेव्हा चीन आणि उजबेकिस्तान या देशातून तो आयात केला जायचा, परंतु यावेळी मात्र भारताने आपले साम्राज्य पसरवले आहे. नेशनने लिहिले आहे की, भारतातून गूळ आणि तूरडाळीची सातत्याने तस्करी होत असते. सर्वसाधारणपणे सरकारचे लक्ष वाघा सीमेवर असते, परंतु राजस्थानच्या मुनाबाव रेल्वे आणि गुजरातकडून येणाऱ्या उंटांवरूनही माल येत असतो.
या महागाईच्या दिवसांत पाकिस्तान सरकार लोकांनी मांस आणि कोंबडी खावे यासाठी अधिक प्रयत्न करीत आहे. म्हैस, बैल आणि गाय यांचे मांस 200 ते 250 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. बोकडाचे मांसही 300 रुपयेपेक्षा कमी नाही. समजा मांस स्वस्तात मिळाले तरी काय उपयोग? ते शिजवण्यासाठी कांदा, लसूण, हळद, मिरची, जिरे आणि इतर गरम मसाला लागतोच की नाही. या सर्व वस्तूंचे उत्पादन शेतात होते. त्यामुळे शेवटी या वस्तूंची खरेदी करावीच लागते. म्हणजे शेतीत जोवर धान्य पिकणार नाही तोवर माणसाचे पोट भरणार नाही. आजवर केवळ धान्याचीच टंचाई असायची, आता भाजीटंचाईचे संकटही येत आहे.
नेशनसह दै. जंग आणि साप्ताहिक नियतकालिक जहॉंनेही या मुद्द्यावर रान उठविले आहे. पाकिस्तानात खाण्याच्या सर्व वस्तू सहज उपलब्ध व्हायच्या. आता अचानक काय झाले? असे जहॉंने विचारले आहे. आता पाकिस्तानातली पिकं डोलताना का दिसत नाहीत? याचे खरे कारण आहे पाण्याची कमतरता. पाकिस्तानचा सुरुवातीपासूनच भारतावर आरोप आहे की, फाळणीच्या वेळी पाणीप्रश्नी भारताने पाकिस्तानवर अन्याय केला आहे. पाकिस्तानचे सिंधू जल आयुक्त जमात अली शाह यांनी जागतिक बॅंकेकडे किशनगंगा परियोजनेत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, परंतु पाक मिडीयाचे म्हणणे आहे की, पाकने खूप याआधीच शहाणे व्हायला हवे होते. नेशनने लिहिले आहे की, पाकिस्तान खूप आधीपासूनच सिंधू पाणीप्रश्नी भारताचा अन्याय सहन करीत आहे. पाकिस्तानात गव्हाचे संकट आले ते पाणी चोरीमुळेच, असेही नेशनने म्हटले आहे.
पाकिस्तानने कितीही आरोप केले तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. भारतातून ज्या नद्या पाकिस्तान आणि बांगलादेशात जातात, त्याचा अधिक लाभ त्या देशांनाच आहे. यात भारतावर अन्यायच झाला आहे. खरे तर काला बाग डॅम आणि फरक्का डॅममध्ये भारतीय नद्यांचेच पाणी वाहून जाते. या बंधाऱ्यांमुळे भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याचे बहुतांश पाणी पाकिस्तानलाच मिळते. यामुळे त्यांची शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनली आहे. भारतात अन्नधान्यांचे उत्पादन घटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बांधाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने केली गेलेली निर्मिती होय. याचे परिणाम आजही आपल्या भारताला भोगावे लागत आहेत.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

भारतीय भाजीपाला पाकिस्तानात

पाकिस्तानी माध्यमांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानात कांदे आणि बटाटे स्वस्त दरात उपलब्ध करून भारत येथील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. भारतीयांच्या तोंडचा भाजीपाला पळवून सारा माल भारत धडाक्यात पाकिस्तानात पाठवीत आहे. बाजारात भारतीय माल इतका स्वस्त असतो की, पाकिस्तानी शेतकरी कोणत्याही स्थितीत स्पर्धा करू शकत नाही. पाकिस्तानी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढा पैसाही पदरात पडत नाही.
भारतात महागाईने लोकांना बेजार केले आहे. रस्त्यापासून संसदेपर्यंत सर्वत्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध होत आहे, परंतु सरकारने आपली कातडी आणखी टणक केली आहे. सकाळी घरात कोणती भाजी आणायची याची चिंता भारतीय महिलांना दररोज भेडसावत आहे. भाजी मंडईत गेल्यानंतर ध्यानात येते की, कालचे कोबी अन्‌ टोमॅटोचे भाव आज नाहीत. कोणतीही भाजी घ्यायची म्हटली तरी अव्वाच्या सव्वा भाववाढ झाल्याचे दिसत आहे. कालपर्यंत दाळ-भात, कांदा-भाकरी आमच्या ताटात दिसायची. आता कांदा रजेवर गेला आहे. भाकरी कधी संपावर जाईल माहीत नाही. सर्वसामान्य जनता महागाईने मेताकुटीला आली आहे. काही दिवसांनी अनागोंदी माजली तर आश्चर्य नको. भारतातल्या शेतीत असंख्य प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येते. यातून भारतीयांचे उदरभरण होत असते, परंतु आता पालक, मेथी, कारले आणि भेंडी आदी भाज्या जणु पंचपक्वान्नाप्रमाणे सर्वसामान्यांच्या भोजनातून दूर झाल्या आहेत. मंडईतून भाज्या कमी होण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील सर्वात मोठे कारण उन्हाळा असल्याचे सांगण्यात येते, परंतु ते खरे नाही. सरकार आपले पाप झाकण्यासाठी थापा मारीत आहे.
कांद्यापासून बटाट्यापर्यंत आणि हिरव्या मिरचीपासून वाटाण्यापर्यंत सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आता दिसत का नाहीत? लोक विचारत आहेत, भाज्या कोठे गेल्या? भाजीपाल्यांचे भाव गगनाला का भिडले? या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांकडेही नाही, परंतु पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमांजवळ मात्र या प्रश्नाचे उत्तर अवश्य आहे. पाकिस्तानातील सर्वात अधिक विश्वसनीय आणि लोकप्रिय इंग्रजी दैनिक दि नेशनने याचा भांडाफोड केला आहे. या वृत्तपत्राने लिहिले आहे की, "भारतीयांच्या तोंडचा घास हिसकावून भारत सरकार पाकिस्तानी लोकांना देण्यासाठी मन मोठे करीत आहे.'
भारतीयांच्या भुकेचे शोषण करून भारत सरकार अन्याय करीत आहे, हे सत्य आहे. सरकार एकीकडे उदार होऊन पाकिस्तानी लोकांवर कृपा करीत आहे तर दुसरीकडे तुटवडा निर्माण करून भाजीपाल्याचा काळाबाजार करणाऱ्यांच्या तुंबड्या भरत आहे.
पाकिस्तानातील या वृत्तपत्राने भारताकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यासंबंधीही कडवट टीका केली आहे. नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या नद्यांचे पाणी लबाडी करून भारत अनेक वर्षांपासून आपल्याकडे वळवत आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमे कालपर्यंत काश्मिरातील दहशतवादाच्या नावाने भारताच्या नावे खडे फोडीत. आता ती भाजीपाला विषयावरून आणि नद्यांच्या पाण्याची चोरी होत असल्याचे सांगून भारताच्या नावे शंख करीत आहेत.
दि नेशनने लिहिले आहे की, आमच्या वाटणीचे सिंधू नदीचे पाणी पळवल्यानंतर आता नवी दिल्ली स्वस्त दरात भाज्या निर्यात करून आमची शेती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या कृषि आधारित अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा हा प्रकार आहे. या षड्‌यंत्राचा उद्देश आमच्या शेतकऱ्यांना संपविणे हा आहे.
भारतातून येणाऱ्या भाज्या विशेषकरून कांदा आणि बटाटा यांची आयात रोखण्यासाठी इस्लामाबादने मोठी कस्टम ड्युटी लावली आहे. यामुळे वर्षभरापूर्वी दोन्ही देशांतील व्यापार ठप्प झाला होता, परंतु व्यापार पुन्हा कसा सुरू झाला माहीत नाही. पाकिस्तानच्या संसदेने किंवा आयात-निर्यात मंत्रालयाने या संदर्भात कोणत्याही नव्या धोरणाची घोषणा केलेली नाही, तरी व्यापार कसा सुरू झाला हा प्रश्नच आहे.
पाक सरकारच्या अनुमतीशिवाय हे सर्व होत आहे याबद्दल दि नेशनने आश्चर्य व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील काही मंडळींच्या स्वार्थातून तर हे होत नाही ना? पाक सरकार या मुद्द्यावर उदासीन आहे आणि भारत सरकार धडाक्यात माल पाठवीत आहे. दि नेशनने दिलेल्या माहितीनुसार दररोज 40 ट्रक भाज्या भारतातून पाकिस्तानात जात आहे. पाकिस्तानच्या सीमेवर यासाठी कोणतेही बंधन नाही. आजपर्यंत कोणत्याही ट्रकवाल्याने याविषयी तक्रार केलेली नाही. याचाच अर्थ असा की, भाज्यांचा काळाबाजार करणाऱ्यांचे भारतीय व्यापाऱ्यांशी संगनमत आहे. कसे का होईना लोकांना भाजी मिळत आहे तर यात वाईट काय, अशी पाक सरकारची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासन कानाडोळा करीत आहे. खरे तर भारतातही भाज्यांची स्थिती खूप चांगली आहे असे नाही. भारतातील मंडईत दररोज भाज्यांचे भाव वाढत आहेत, परंतु भारतीय जनता आणि सरकार पाकिस्तानचे नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणजे आपल्या लोकांना भुकेले ठेवूनही भारत सरकार पाकिस्तानला दु:खी आणि अपमानीत करण्याचा प्रयत्न करते.
दि नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानातील ट्रेड माफियांनी कांद्याचे भाव 20 वरून सरळ 40 रुपये किलोवर नेऊन त्यांना मदतच केली आहे. या व्यापाराला अधिकृत मान्यता नसताना इतक्या धडाक्यात सुरू आहे, हे मोठे आश्चर्य आहे. कांद्याप्रमाणेच बटाट्याचे ट्रकही सीमापार करून पाकिस्तानात पोहोचत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात बटाटा 10 ते 15 रुपयांत उपलब्ध होता. आता बटाटा 30 रुपयांवर गेला आहे.
पाकिस्तानात लाहोर, हैदराबाद आणि मुल्तान येथील भाजीपाला विक्रत्यांचे म्हणणे आहे की, आता तर कोबी आणि लसूणसुद्धा ट्रकने येत आहे. पाकिस्तानातील भाजी मंडईतील सूत्रांचे म्हणणे आहे की, आमच्या इथे टमाटे आणि पान कोबी यांची काहीही कमतरता नाही तरीही कांद्या-बटाट्याच्या ट्रकमधून याच्या करंड्या धडाक्यात येत आहेत. वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, भारतात भाज्यांचा दुष्काळ आहे तरीही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यामागे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पंगू करण्याचे षड्‌यंत्र आहे. पाकिस्तानातील ज्या शेतकऱ्यांची रोजीरोटी भाजीपाला शेतीवर अवलंबून आहे, ते चिंताग्रस्त झाले आहेत, परंतु त्यांची काळजी आहे कोणाला? भारतीय कालपर्यंत चित्रपट, कापड आणि फॅन्सी सामान चोरट्या मार्गाने पाकिस्तानात पाठवायचे. आता तर आमच्या जेवणाच्या ताटातही त्यांनी घुसखोरी केली आहे. भारतीय कांदा आणि बटाटा या भाज्यांनी थैमान घातले आहे. पूर्वी पाकिस्तानला बटाटा कमी पडायचा तेव्हा चीन आणि उजबेकिस्तान या देशातून तो आयात केला जायचा, परंतु यावेळी मात्र भारताने आपले साम्राज्य पसरवले आहे. नेशनने लिहिले आहे की, भारतातून गूळ आणि तूरडाळीची सातत्याने तस्करी होत असते. सर्वसाधारणपणे सरकारचे लक्ष वाघा सीमेवर असते, परंतु राजस्थानच्या मुनाबाव रेल्वे आणि गुजरातकडून येणाऱ्या उंटांवरूनही माल येत असतो.
या महागाईच्या दिवसांत पाकिस्तान सरकार लोकांनी मांस आणि कोंबडी खावे यासाठी अधिक प्रयत्न करीत आहे. म्हैस, बैल आणि गाय यांचे मांस 200 ते 250 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. बोकडाचे मांसही 300 रुपयेपेक्षा कमी नाही. समजा मांस स्वस्तात मिळाले तरी काय उपयोग? ते शिजवण्यासाठी कांदा, लसूण, हळद, मिरची, जिरे आणि इतर गरम मसाला लागतोच की नाही. या सर्व वस्तूंचे उत्पादन शेतात होते. त्यामुळे शेवटी या वस्तूंची खरेदी करावीच लागते. म्हणजे शेतीत जोवर धान्य पिकणार नाही तोवर माणसाचे पोट भरणार नाही. आजवर केवळ धान्याचीच टंचाई असायची, आता भाजीटंचाईचे संकटही येत आहे.
नेशनसह दै. जंग आणि साप्ताहिक नियतकालिक जहॉंनेही या मुद्द्यावर रान उठविले आहे. पाकिस्तानात खाण्याच्या सर्व वस्तू सहज उपलब्ध व्हायच्या. आता अचानक काय झाले? असे जहॉंने विचारले आहे. आता पाकिस्तानातली पिकं डोलताना का दिसत नाहीत? याचे खरे कारण आहे पाण्याची कमतरता. पाकिस्तानचा सुरुवातीपासूनच भारतावर आरोप आहे की, फाळणीच्या वेळी पाणीप्रश्नी भारताने पाकिस्तानवर अन्याय केला आहे. पाकिस्तानचे सिंधू जल आयुक्त जमात अली शाह यांनी जागतिक बॅंकेकडे किशनगंगा परियोजनेत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, परंतु पाक मिडीयाचे म्हणणे आहे की, पाकने खूप याआधीच शहाणे व्हायला हवे होते. नेशनने लिहिले आहे की, पाकिस्तान खूप आधीपासूनच सिंधू पाणीप्रश्नी भारताचा अन्याय सहन करीत आहे. पाकिस्तानात गव्हाचे संकट आले ते पाणी चोरीमुळेच, असेही नेशनने म्हटले आहे.
पाकिस्तानने कितीही आरोप केले तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. भारतातून ज्या नद्या पाकिस्तान आणि बांगलादेशात जातात, त्याचा अधिक लाभ त्या देशांनाच आहे. यात भारतावर अन्यायच झाला आहे. खरे तर काला बाग डॅम आणि फरक्का डॅममध्ये भारतीय नद्यांचेच पाणी वाहून जाते. या बंधाऱ्यांमुळे भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याचे बहुतांश पाणी पाकिस्तानलाच मिळते. यामुळे त्यांची शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनली आहे. भारतात अन्नधान्यांचे उत्पादन घटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बांधाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने केली गेलेली निर्मिती होय. याचे परिणाम आजही आपल्या भारताला भोगावे लागत आहेत.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

उलेमांचा दृष्टिकोन बदलतोय

तुर्की येथील मारदिन या शहरात नुकतेच इस्लामी विद्वानांचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात सातशे वर्षांपूर्वी इब्ने तैमय्याकडून देण्यात आलेल्या जिहादच्या प्रासंगिकतेवर चर्चा झाली. या फतव्याच्या आधारे कोणाही गैरमुसलमानाला काफीर ठरविता येणार नाही आणि त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणाही करता येणार नाही, या विषयावर सर्वजण सहमत झाले. फतव्याचा आधार घेऊन गैरमुसलमानाला काफीर ठरविणे ही चुकीची व्याख्या आहे. कोणत्याही हिंसेला आणि नरसंहाराला फतव्याच्या नावावर तर्कसंगत ठरवता येणार नाही.
21 व्या शतकातही मुसलमान इतका मागास आणि कट्टर का आहे? मुस्लिमांवर सतत फतव्याची तलवार लटकत असते हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. फतव्यांवर नेहमीच चर्चा होताना दिसते. आज लोकशाहीचे युग आहे. कुणी धर्मयुद्धाच्या गोष्टी करीत असेल तर ते मनाला पटण्यासारखे नाही.
मध्ययुगात धर्माच्या नावावर अनेक लढाया झाल्या. मानवी इतिहास क्रुसेड युद्ध विसरणे शक्य नाही. जगातल्या सर्वच धर्मांमध्ये धर्मयुद्ध शब्द कोणत्या ना कोणत्या रूपात पाहायला मिळतोच. मध्य आशियातून उगम पावलेल्या तीनही धर्मांनी जगावर विजय मिळविण्यासाठी वेळोवेळी युद्ध केले. विजय मिळविल्यानंतर तिथे आपले साम्राज्य प्रस्थापित केले, परंतु 21 व्या शतकात एकमेव मुस्लिम समाजच असा आहे की, जो आजही धर्माच्या नावावर साम्राज्य प्रस्थापित करू इच्छितो.
20 व्या शतकाच्या सातव्या दशकात पाकिस्तानचे तुकडे झाले आणि बांगला देशाची निर्मिती झाली. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुलफिकार अली भुट्टो यांनी इस्लामी बॉंबच्या नावाने मुस्लिम जगताला संघटित होण्यासाठी आवाहन केले. पाहता पाहता इस्लामी बॉंबसोबतच इस्लामी सेना, इस्लामी बॅंक आणि इस्लामी शेअर बाजार असे शब्द कानावर येऊ लागले.
इस्लामी ब्लॉकची सुरुवात तर सौदी अरबला जगाचा खलिफा बनविण्यासाठी झाली होती. या आगीत तेल ओतण्याचे काम अतिरेकी संघटनांनी केले. अतिरेकी संघटनांनी स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्याचे मनसुबे बाळगले आहेत.
अधिकांश मुसलमानांनी लोकशाही स्वीकारली नाही, हे वास्तव आहे. असे नसते तर इजिप्तमधील राजेशाही संपल्यानंतर कर्नल नासिर यांच्याविरुद्ध सैयद कुतुब याने अल बुरहानचा पाया घातला असता काय? सौदी अरबच्या शासकांनी 1932 मध्ये किंग सऊद यांच्या नेतृत्त्वाखाली आपले धार्मिक साम्राज्य स्थापित केले तरीही तेथील एका गटाने इस्लामच्या नावावर या राजेशाहीला मान्यता दिली नाही. आजही तेथे अशा घडामोडी घडताना दिसतात.
ओसामा बिन लादेन याची विचारधारा काही एका दिवसात तयार झालेली नाही. इस्लाममध्ये जो गट सत्ता प्राप्त करण्यात अयशस्वी होतो, तो दुसऱ्या गटाला गैर इस्लामी ठरवतो. त्याच्या विरोधात युद्ध सुरू करतो. पुढे जाऊन गैरइस्लामी देशांतही धर्माच्या नावाने हेच तत्त्व सक्रिय झाले. यातून रशिया आणि चीनही वाचू शकले नाहीत. आज चेचेन्या येथील मुस्लिम अतिरेक्यांमुळे रशिया दु:खी आहे, तर जियांग मुसलमानांनी चीनच्या नाकी नऊ आणले आहे.
मुस्लिम साम्राज्यवाद्यांची सगळी मदार केवळ धार्मिक वेडेपणावर आधारलेली आहे. येथे धर्माकडे शक्तीशाली शस्त्र म्हणून पाहण्यात येते. संपूर्ण जगाला दारूल हरब (इस्लामच्या शत्रूंचा देेश) आणि दारूल इस्लाममध्ये विभाजित केले आहे. तसेच दारूल हरबला दारूल इस्लाम बनविण्यासाठी बहुविवाह आणि धर्मांतरणाचा वापर करण्यात आला. मुसलमानांची संख्या वेगाने वाढावी हाच यामागचा उद्देश.
14 व्या शतकात मुस्लिम साम्राज्यवाद्यांनी "फतवा' नावाने एक नवा शोध लावला. मुस्लिम साम्राज्याच्या सीमा वाढविण्यासाठी त्यांनी अशी व्यवस्था केली. इस्लामी विद्वान वेळोवेळी अरबी शब्दांची व्याख्या करून इस्लामी साम्राज्य वाढवायला मदत करण्यासाठी ही व्यवस्था तयार झाली. इस्लामी विद्वान आणि साम्राज्याचा प्रसार करणाऱ्या टोळीने शब्दांच्या व्याख्या आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे करायला सुरुवात केली. यात जिहाद हा एक शब्द होता की, ज्या शब्दाला इस्लामचा आत्मा असल्याचे सांगण्यात आले. या शब्दाच्या आधारे मुसलमानांना अधिक कट्टर आणि लढाऊ बनविण्याचे शिक्षण देण्यात येऊ लागले.
फतवा शब्दाने तालिबांनींच्या उपद्‌व्यापांचे समर्थन केले आणि समस्त मुस्लिम समाजाला एका सेनेच्या रूपात बदलण्याचा निर्णय झाला. परिणामी संपूर्ण जगात मुसलमानांबद्दल घृणेची लाट आली. आज सारे जग मुसलमानांच्या धर्मांध कारवायांनी त्रस्त होऊन त्यांच्याविरोधात संघटित होताना दिसत आहे. आता कुठे विचारी आणि उदार मुसलमान फतव्यासंबंधी आपली मते स्पष्ट करताना दिसत आहेत. जिहादला कितपत इस्लामी म्हणावे यावर आता साऱ्या जगातून मंथन होऊ लागले आहे. जगात मुसलमान इतरांपासून वेगळे पडू नये यासाठी चिंता आणि चिंतनाला सुरुवात झाली आहे.
मुस्लिम प्रदेशावर मंगोल लोकांनी केलेल्या आक्रमण आणि व्यापक नरसंहाराच्या विरोधात इस्लामी विद्वान इब्न तैमिय्या यांनी मारदिन फतवा जारी केला होता. याचवेळी साऱ्या जगाचे विभाजन मुस्लिम आणि गैरमुस्लिम असे करण्यात आले. येथूनच काफिर शब्दाची सुरुवात झाली आणि मग गैरमुसलमानांच्या विरोधात मुस्लिम आक्रमणकारींनी तलवार चालवायला सुरुवात केली.
परंतु या व्याख्येचा वापर मुसलमानांसाठीही होऊ लागला तेव्हा मात्र मुसलमान स्वत:च गोत्यात आले. आज तर एक गट दुसऱ्या गटावर हाच आरोप करताना दिसतो. ज्या गटाला सत्ता मिळत नाही, तो गट दुसऱ्या गटाला काफिरची संज्ञा द्यायला विसरत नाही. इतकेच नाही तर त्यांच्याविरोधात जिहादची घोषणाही केली जाते. सौदी अरबच्या विरोधात ओसामा अशाच पद्धतीने फतवे काढीत असतो.
मुसलमानांमध्ये खरा कोण आणि खोटा कोण याचा न्याय करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मारदिन संमेलनात भाग घेतलेल्या विद्वानांनी धाडसाने निर्णय घेतला आहे की, इब्ने तैमिय्या यांच्या फतव्याच्या आधाराने इतिहासातील मुस्लिम बादशहाचे जे मत बनले व त्यांनी जो व्यवहार केला, त्याचे आजच्या काळात औचित्य नाही. मध्ययुगीन व्यवस्था आजच्या जगाला लागू होऊ शकत नाही. आज जगातील देशांच्या सीमांना तसे फार महत्त्व राहिलेले नाही. सारे जग आज एक खेडे बनून समोर येत आहे.
परंपरेने मिळालेली धार्मिक विचारधारा आणि रूढी आज कायदे बनून जिवंत राहणे शक्य नाही. या फतव्यांमुळे, विशेषकरून जिहाद संकल्पनेमुळे मुसलमानांना साऱ्या जगापासून वेगळे पाडले गेले आहे.
मुसलमानांकडे कधीच चांगली शस्त्रे नव्हती. केवळ धर्माने प्रेरित होऊन ते लढत राहिले. लढाई जिंकल्यानंतर लुटीच्या मालाचे (माले गनीमत) आकर्षण होते. आता ते आकर्षण राहिले नाही. प्राचीन काळी इस्लामी जगताने विजयाचे मापदंड बनविले होते. आता त्यात कोणतेही आकर्षण आणि तथ्य राहिलेले नाही.
जगावर एक दृष्टिक्षेप टाकून पाहा. 11/9 नंतर जारी केलेल्या फतव्याचा काही उपयोग झाला काय? धर्माच्या नावाने मुसलमान एका मंचावर आले काय? ओसामाने जिहादचे आवाहन केले; मात्र त्याला किती मुस्लिम देशांनी समर्थन दिले? फतवा तर मुल्ला उमर यानेही काढला होता.
इराकमध्ये सद्दामला वाचविण्यासाठी फतव्यांचा पाऊस पडला. पाकिस्तानात लाल मशीद हत्याकांडानंतर मुल्लांनी पाक सेनेला घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश मिळाले का? तालिबान आणि काश्मिरात बसलेले अतिरेकी भारताविरुद्ध फतव्यांची गरळ ओकत असतात, परंतु या अतिरेकी संघटनांना किती समर्थन मिळते? जैशे मोहम्मद आणि लष्करे तैयबा या नावांवरूनच ध्यानात येते की, ते धर्माचा आधार घेऊन भारताला ठेचण्याचे मनसुबे बाळगतात, परंतु आतापर्यंत त्यांना यश मिळाले काय? अतिरेक्यांनी पावलोपावली इस्लामच्या नावाने मुसलमानांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना यश मिळते का?
पाकिस्तानातील बरेलवी विचारधारेचे विद्वान डॉ. ताहेरूल कादिरी यांनी अतिरेक्यांच्या विरोधात 600 पानी अहवाल लंडनमध्ये प्रकाशित केला होता. यामध्ये दहशतवादाची घोर निर्भत्सना करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी सोमालियातही शांती नांदावी या उद्देेशाने जनतेसमोर एक दस्तावेज सादर करण्यात आले. त्यात म्हटले होते की, याचा अतिरेक्यांना लाभ होणार नाही, परंतु अतिरेकी फतव्यांना हद्दपार करू इच्छिणाऱ्यांना याचा लाभ होईल.
मारदीन संमेलनात सौदी अरब, तुर्की, भारत, सेनीगाल, कुवैत, इराण, मोरक्को आणि इंडोनेशियासहित 15 मोठ्या देशांतील विद्वानांनी सहभाग घेतला होता. संमेलनात विचारविमर्श झाल्यानंतर त्यांनी उक्त विचार व्यक्त केले आहे. मुसलमानांनी ठरविले तर इस्लाम आणि मुसलमानांचे चित्र उज्ज्वल बनू शकते. तालिबान आणि अलकायदा सर्वत्र पराभूत होताना दिसत आहे.
त्यांना आपली राहिलेली अब्रू वाचवायची असेल तर त्यांनी विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही. अन्यथा आता जिहाद आणि काफिर या शब्दांच्या विरोधात एक चक्रीवादळ येईल आणि यात कठमुल्लांना उद्‌ध्वस्त केले जाईल.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

पाकिस्तानात बनले भगतसिंग चौक

2010 चा मार्च महिना आला आणि दीप दरवर्षीप्रमाणे आपल्या मोहिमेवर निघाली, परंतु यावर्षी आपले स्वप्न साकार होईल याची तिला थोडीही कल्पना नव्हती. दैनिक डॉनच्या मुखपृष्ठावर ही चकित करणारी बातमी झळकली अन्‌ सारा लाहोर आनंदात न्हाऊन निघाला. वृत्तात म्हटले होते की, पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी लाहोर महापालिकेला शादमां चौक भगतसिंग यांच्या नावे करण्यात यावे, असा निर्देश दिला आहे. इतिहासातील सत्य स्वीकारले याबद्दल पाक सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे.
दरवर्षी 23 मार्च रोजी भारतीय उपखंडात भगतसिंग यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिश सरकारने लाहोर येथील सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली होती. या तीन युवकांच्या हौतात्म्याने सारा भारत शोकसागरात बुडाला होता. फाळणीनंतर लाहोरची सेंट्रल जेल अन्य स्थानी हलविण्यात आली. जेथे जेल होती तेथे एक चौक बनविण्यात आले. या चौकाला नाव दिले शादमां चौक. पाकिस्तानातील अनेक बुद्धीजीवींनी पाक सरकारच्या या कृतीची घोर निंदा केली. त्यांनी मागणी केली की, भगतसिंग हे "शहीदे आजम' होते. त्यांची भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी करता येणार नाही. त्यामुळे या चौकाला किमान भगतसिंग यांचे नाव दिले जावे, परंतु पाक सरकारने याची दखल घेतली नाही.
या घटनेमुळे सैयदा दीप नामक महिलेला मोठा धक्का बसला. तिने इन्स्टिट्यूट फॉर पीस अँड सेक्युलर स्टडीज नामक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या वतीने तिने भगतसिंग यांच्याप्रति आदर असलेल्या लोकांना आवाहन केले. मार्च महिन्याची सुरुवात होताच सैयदा दीप आपल्या साथीदारांसमवेत शादमां चौकात तळ ठोकायची. प्ले कार्ड आणि बॅनर घेऊन ही मंडळी आपल्या मागणीकडे लोकांचे लक्ष वेधत. शादमां चौकाचे नामकरण भगतसिंग चौक असे व्हावे ही त्यांची एकमेव मागणी होती. हजारो लोक तेथून जात. सारे या महिलेच्या धाडसाची आणि भगतसिंग यांच्याप्रति असलेल्या अभिमानाची प्रशंसा करीत.
यंदा पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी लाहोर महापालिकेला शादमां चौक भगतसिंग यांच्या नावे करण्यात यावे, असा निर्देश दिला आहे. ज्या लोकांनी आततायी ब्रिटिश सरकारशी दोन हात केले होते, त्या सर्वांचे नाव आणि कार्य यांचे स्मरण व्हावे यासाठी आता पाकमध्ये जनमत तयार होत आहे. या घटनेमुळे लाहोरात आता पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत झाला आहे. कोणी कल्पनाही करणार नाही असे लेख पाकच्या वृत्तपत्रांतून प्रकाशित होत आहेत. पाकमधील जागरुक लोक स्वातंत्र्याच्या इतिहासाची उजळणी करीत आहेत. भगतसिंग यांच्या निमित्ताने आता सर्वच हुतात्म्यांचे स्मरण करण्यात यावे असे त्यांना वाटत आहे.
दै. डॉनमध्ये ए.जी. नूरानी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. ज्या हुतात्म्यांना लोक आता विसरले आहेत, त्या सर्व पाकिस्तानच्या हुतात्म्यांवर प्रकाश टाकला गेला पाहिजे, असे नूरानी आपल्या लेखात म्हणतात. पाकिस्तान आणि पंजाबातील सरकारे नेहमीच राजकीय उठाठेवी करण्यात मग्न असतात, त्यांना इतिहासाशी काही देणे -घेेणे नसते, परंतु पंजाबी कॉंग्रेसचे अध्यक्ष फखरे जमा यांनी पाक सरकारकडे मागणी केली आहे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ज्या पंजाबी सुपुत्रांनी आपले सर्वस्व अर्पित केले, त्यांना इतिहासात स्थान देण्यात यावे. पंजाबच्या हुतात्म्यांचा इतिहास पुन्हा एकदा लिहिण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला माहीत नाही की, इंग्रजांशी झुंज देताना पंजाबच्या पुत्रांनी कशा प्रकारच्या योजना आखून यशस्वी केल्या.
भगतसिंग चौक असे नामकरण केल्यानंतर लाहोरात या घटनेवर काय प्रतिक्रिया उमटल्या, त्या विसरून चालणार नाही. भगतसिंग यांच्या नावाने एक चौक करणे पुरेसे नाही. ज्या तीन पंजाब पुत्रांनी इतिहास घडवलं आहे, त्यांच्यासाठी सरकार आणि जनतेने आणखी खूप काही करणे शेष आहे. पंजाबी कॉंग्रेसने म्हटले आहे की, केवळ पाकिस्तान सरकारनेच सर्व काही करावे असे नाही. भारताच्या स्वातंत्र्यात पंजाबचे काय योगदान आहे आणि कोणी कोणी आपले रक्त सांडून या देशाला मुक्त केले, यासंबंधात भारत सरकारनेही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. पंजाब कॉंग्रेसला वाटते की, हे काम दोन्ही देशांनी मिळून केले पाहिले.
पंजाब कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पंजाबच्या योगदानाविषयी आजवर विश्वासार्ह ठरेल असा इतिहासच लिहिला गेला नाही. फाळणीनंतर भारतानेही याकडे दुर्लक्षच केले आहे. फखरे जमा यांचे म्हणणे आहे की, भगतसिंग यांच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याची योग्य वेळ आली आहे. भारत प्रत्येक वेळी पाकिस्तानकडेच बोट दाखवितो, परंतु भारताने आत्मचिंतन करावे. भारताने आपल्या इतिहासात पाकिस्तानच्या पंजाबी स्वातंत्र्योद्ध्यांना योग्य स्थान दिले आहे काय? असा प्रश्न फखरे जमा यांनी केला आहे. पाकिस्तान सरकारने अनेक वर्षांपासून भगतसिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, हे खरे, पण भारतानेही अन्य हुतात्म्यांच्या बाबतीत दुर्लक्षच केले नाही काय? पंजाबी कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी प्रश्न केला आहे की, भारताने राय अहमद खान आणि दुल्ला भाटीसारख्या पंजाबी नायकांचे कोठे स्मारक उभे केले आहेत काय? या वीरांनी स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान दिले नाही काय?
भगतसिंग यांच्या हौतात्म्याचा दाखला देत फखरे जमा यांनी आठवण करून दिली आहे की, भगतसिंग यांचा बचाव करणारे केंद्रीय ऍसंब्लीतील सर्वात चांगले भाषण कायदे आजम मोहम्मद थली जिन्ना यांनी केले होते. भारत ही गोष्ट विसरला काय? भगतसिंग यांच्या हौतात्म्यानंतर दुसऱ्या दिवशी मौलाना जफर अली खान यांनी श्रद्धांजली सभेत सामूहिक प्रार्थनेचे नेतृत्व केले होते. लाहोर कटाच्या खटल्यासाठी गठित स्पेशल ट्रिब्युनलचे गठन करणाऱ्या अध्यादेशावर 19 जून 1930 रोजी जारी करण्यात आलेल्या लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनच्या अहवालावर डॉ. मोहम्मद इकबाल आणि अन्य दोन लोकांव्यतिरिक्त बरकत अली यांचे हस्ताक्षर होते. हे सारे कट्टर लीगवाले होते.
एक कट्टर मुस्लिम लीगवालाही भगतसिंग यांच्या हौतात्म्यावर अश्रू ढाळतो. ब्रिटिश सरकारच्या या कुकृत्याचा धिक्कार करतो. यावरून ध्यानात येऊ शकेल की, तत्कालीन पंजाब भगतसिंग यांच्या हौतात्म्याने किती दु:खी होता. पंजाबातील प्रत्येक नागरिक विद्रोहाच्या भाषेत ब्रिटिशांना आव्हान देत होता. भगतसिंगांच्या हौतात्म्याने सारा देश आणि सर्व राजकीय पक्ष स्तब्ध झाले होते. सर्वांच्या मनात ब्रिटिश सरकारविषयी घृणा होती. 23 मार्च 1931 च्या घटनेने सारा भारत हादरून गेला होता. कारण भगतसिंग आणि साथीदारांनी ब्रिटिशांच्या मर्मावर अखेरचा घाव घातला होता.
पंजाबी कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे की, भगतसिंग यांचा संबंध कोणाशी आहे... भारताशी की पाकिस्तानशी?
पंजाबी कॉंगे्रस आजदेखील भारत सरकारशी बोलणी करणार असेल आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाला भारत किंवा पाकिस्तानचा इतिहास असे पाहणार नसेल, इतिहासाकडे हिंदू किंवा मुस्लिम दृष्टिकोनातून पाहणार नाही, असे आश्वासन देणार असेल, तर भारताला काहीच अडचण नाही. भारत तर आजदेखील पाकिस्तानी संस्कृती भारतीयच असल्याचे मानतो.
मुस्लिम लीगच्या काळ्या कृत्यांना विसरून जुन्या काळात जायला भारत आजही उत्सुक आहे, परंतु प्रश्न असा आहे की, पंजाब कॉंग्रेसचे फखरे जमा ही गोष्ट पाकिस्तान सरकारच्या गळी उतरविण्यात यशस्वी होतील काय? 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा 150 वा वर्ष साजरा होणार होता, त्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पाक यात्रेच्या वेळी तत्कालीन पाक राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना म्हटले होते की, आपण दोन्ही देशांनी मिळून इतिहासाचे हे सुवर्ण क्षण स्मरण करूया. त्यावेळी मुशर्रफ हे अटलजींसमोर मौन राहिले, परंतु नंतर पत्रकारांशी वार्ता करताना म्हटले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी दिवसा स्वप्न पाहणे सोडून द्यावे. या टिप्पणीचा काय अर्थ होतो? यातून कोणत्या भावना व्यक्त होतात?
पंजाबी कॉंग्रेसने हे प्रकरण पुन्हा समोर आणले आहे, तर त्यांनी भारत सरकारशी बोलणी करावी. त्याआधी आपल्या स्वत:च्या सरकारचे मत जाणून घ्यावे अन्यथा धर्मांध मानसिकतेच्या लोकांकडून काहीही होणार नाही.
दै. डॉनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखावरून समाधान वाटते की, आजही पाकिस्तानच्या पंजाबात अशा संघटना आणि व्यक्ती आहेत की, जे आपल्या इतिहासातील वीरांना जिवंत ठेवू इच्छितात. भगतसिंगसारखे देशभक्त हे कोणत्याही एका देशाचे अथवा धर्माचे नसतात. असे वीर मानवजात ज्यासाठी हर क्षण संघर्ष करीत असते, त्या स्वातंत्र्याचे प्रतीक असतात. पाकिस्तान सरकारने भगतसिंग यांच्यासाठी जो मनाचा मोठेपणा दाखविला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. भगतसिंग चौकाच्या निमित्ताने पाक सरकार आणि तेथील कट्टरवाद्यांच्या हृदयात बदल होणार असेल तर प्रत्येक विचारी आणि राष्ट्रीय विचाराची व्यक्ती त्याचे स्वागतच करेल.
पंजाबी कॉंग्रेसने पंजाबी स्वतंत्रता सेनानींच्या अवहेलनेचे जे दु:ख मांडले आहे, ते योग्य माध्यमाने भारतात पोहोचविले तर भारत त्याचे स्वागतच करेल. कारण भारताची ही संस्कृतीच आहे.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील