पाकिस्तानातील महान गझल गायक
पाकिस्तानातील बहुसंख्य लोकांना वाटते की, काहीही करून हसन यांना भारतात नेण्यात आले तर त्यांचे प्राण वाचू शकतील, परंतु पाकिस्तानात सध्या चांगले वातावरण नाही. भारताप्रती सुडाची भावना आणि कटुता तेथे ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अशा वेळी त्यांना भारतात आणणे कठीण आहे.
मेहदी हसन यांचे नाव ऐकले नाही असा हिंदुस्थानी क्वचितच सापडेल. त्यांचे नाव ऐकले की, गझल गायकीचे चाहते भावविभोर होतात. सध्या पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. कधी काय घडेल आणि तालिबानी येऊन थडकतील याबद्दल काही सांगण्यासारखी स्थिती नाही. असे असले तरी आजही पाकिस्तानात हिंदुस्थानी संगीताचा वारसा तेवत आहे. त्यामुळेच गोळ्या आणि बॉंबस्फोटांच्या कल्लोळातही ते हसन मेहदींचे स्मरण करीत आहेत.
गझलसम्राट मेहदी हसन मृत्यूशय्येवर असल्याचे वृत्त भारतात आले, तेव्हा अनेक लोक चिंतित झाले. पाकिस्तानात ज्यांचा संपर्क आहे असे लोक प्रयत्न करीत आहेत की, कसेही करून हसन मेहदी यांना भारतात आणावे; असे झाले तर त्यांच्यावर योग्य उपचार होतील असे या लोकांना वाटते, परंतु हसन मेहदी यांच्या निकटवर्ती सूत्रांकडून समजते की, हसन मेहदी हे अधिक काळचे सोबती नाहीत. कोणत्याही क्षणी त्यांचे श्वास थांबतील आणि गझल गायकीतील हा तारा अस्त पावेल.
पाकिस्तानात सुरुवातीपासूनच कलाकारांची स्थिती दयनीय आहे. कलेची कदर करणारे लोक काळाच्या ओघात काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जे काही थोडे लोक शिल्लक आहेत, त्यांच्याजवळ आपल्या कलाकारांची काळजी घेण्याइतकी साधनसंपत्ती नाही आणि पाक सरकारात त्यांची तेवढी पोहोचही नाही. पाकिस्तानातील बहुसंख्य लोकांना वाटते की, काहीही करून हसन यांना भारतात नेण्यात आले तर त्यांचे प्राण वाचू शकतील, परंतु पाकिस्तानात सध्या चांगले वातावरण नाही. भारताप्रती सुडाची भावना आणि कटुता तेथे ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अशा वेळी त्यांना भारतात आणणे कठीण आहे.
पाकिस्तानात एक वेळ अशी होती की, सिंधमधील नेते जी.एम. सैयद आजारी पडले तेव्हा त्यांना भारतात आणून मुंबईच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. इतकेच काय हृदयाला छिद्र असलेल्या एका छोट्या बालिकेला बेंगळूरू येथील रुग्णालयात भरती करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जो कोणी रोगी म्हणून येथे आला तो ठणठणीत होऊन आनंदाने पाकिस्तानात परतला. पाकिस्तानातील हूकुमशहांनी जेव्हा केव्हा तेथील लेखकांवरील अत्याचार वाढविले तेव्हा ते पळून भारतात आश्रयाला आले. मानवतेच्या भावनेतून भारत आपल्या शेजारील देशांच्या दु:खात सदैव सहभागी झाला आहे, परंतु या साऱ्या गोष्टींच्या बदल्यात भारताला काय मिळाले, याचा इतिहास पाकिस्तान आपल्यापेक्षा अधिक जाणून आहे.
परिस्थिती अशी आहे की, हसन मेहदी भारतात येऊ शकणार नाहीत, परंतु त्यांच्या अंतिम श्वासांमध्ये भारत व्यापून राहिला आहे. कारण हसन मेहदी हे एक कलाकार आहेत. कोणताही कलाकार चांगल्या प्रकारे जाणून असतो की, भारत हा एक असा देश आहे की, जेथे संगीताचे झरे फुटले. गीत आणि संगीताची भूमीच हसन मेहदी यांची पीडा समजू शकते.
सध्यस्थितीत पाकिस्तानात तालिबान्यांची घुसखोरी वाढली आहे. ते कोणत्याही क्षणी इस्लामाबादवर ताबा मिळवू शकतात. तालिबानी हे संगीताचे घोर विरोधी आहेत. संगीत हे इस्लामच्या विरुद्ध आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे अशा वातावरणात हसन मेहदी यांची पाकिस्तानात कोणीही सहय्यता करू शकत नाही. परदेशात पाठवून त्यांच्यावर उपचार करण्याचा धोकाही कोणी पत्करू शकत नाही.
1990 चे दशक म्हणजे हसन मेहदी यांच्या जीवनातील सुवर्णकाळ होता. त्या काळात नुसरत फतेह अली यांचीही मुंबईला ये-जा सुरू झाली होती. वातावरणात तणाव नव्हता तेव्हा अनेक पाकिस्तानी कलाकार भारत दौरा करू लागले होते. येथे आल्यानंतर आपल्या कलेला व्यासपीठ मिळाले म्हणून त्यांना आनंद तर व्हायचाच, शिवाय लक्षावधी रुपयांची कमाईही व्हायची.
मेहदी हसन यांच्या भारत दौऱ्यावर एक दृष्टी टाकली म्हणजे ध्यानात येईल की, 1985 ते 2001 या काळात ते दर पाच सहा-महिन्यांतून भारतात यायचे. भारतातल्या मोठ्यामोठ्या शहरांमध्ये त्यांच्या गझल गायकीचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. अशा कार्यक्रमांचे तिकीट मिळविण्यासाठी श्रोते अक्षरश: थकून जायचे. त्यांचा एकही दौरा असा झाला नाही की, ज्यातून त्यांना किमान 50 लाखांची कमाई झाली नाही. हैदराबाद येथील एका कार्यक्रमात तर त्यांनी सव्वा कोटी रूपयांची कमाई केली होती. मुंबईतील अनेक चित्रपट दिग्दर्शकही त्यांचे चाहते होते. हसन मेहदी यांच्याशी निर्माण झालेल्या अनुबंधातून त्यांना मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती झाली होती. केवळ भारत दौऱ्याचीच गोष्ट करायची झाली तर त्यांनी सहजपणे 25-50 कोटींची कमाई केली, असे म्हणता येईल. ही कमाई त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेशी होती.
लंडनमध्ये त्यांचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे तेथील उत्पन्नही काही कमी नव्हते. आता प्रश्न असा आहे की, हा पैसा गेला कुठे? एक साधारण मनुष्यदेखील आपल्या वृद्धापकाळासाठी आणि आजार वगैरेंसाठी काही ना काही बचत करून ठेवतो. त्यामुळे हसन मेहदी यांच्याकडेच दोष जातो. कलाकारांसाठी सरकारकडे आग्रह करता येते, मात्र सरकारला बाध्य करता येत नाही.
पाकिस्तानात हसन मेहदी यांची सेवासुश्रुशा कोण करत आहे याची विस्तृत माहिती तर अद्याप मिळू शकलेली नाही. आर्थिक चणचण भासत असल्याने ते दु:खी आहेत हे मात्र खरे. त्यामुळेच आपल्या आजारावर चांगले उपचार करून घेणे त्यांना कठीण बनले आहे.
जगातील प्रत्येक कलाकाराला आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागते, ही काही नवीन गोष्ट नाही. जेथे लोकशाही आहे किंवा साहित्य आणि कलेचा आदर करणारे सरकार आहे, तेथे कलाकाराला काही ना काही सहाय्यता केली जाते. अन्यथा आर्थिक कुचंबणा सहन करीत अंथरूणावर पडल्या पडल्या मृत्यूची प्रतीक्षा करणेच काय ते कलाकाराच्या नशिबी असते.
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या सर्वच कलाकारांना दु:ख भोगावे लागले आहे. देशाची फाळणी झाली तेव्हा हे कलाकार समजत होते की, आपल्या धर्माचे सरकार आपला सन्मान करेल, सहाय्यता करेल, परंतु त्यांना काय माहीत की, पाकिस्तानातील सरकार औरंगजेब बनून त्यांच्याशी अमानवी व्यवहार करेल आणि तेव्हा त्यांना भारतात येण्यासाठी तरसत राहावे लागेल.
पाकिस्तानात गेल्यानंतर पुन्हा भारतात परतण्याचे साहस कोणी दाखविले नाही. जोश मलीहआबादी आणि महान लेखक नियाज फतेहपुरी यांनांही असे भारतात येण्याचे धाडस झाले नाही, परंतु हे सारे भारत-भारत म्हणतच मृत्यूला कवटाळले. एक गोष्ट त्यांनी मान्य केली की, त्यांचा पाकिस्तानात जायचा निर्णय दुर्दैवी होता.
visit @ www.muslimjagat.blogspot.com
No comments:
Post a Comment