Thursday, June 10, 2010

नव्या "जिहाद'ची बालवाडी

पाकिस्तानने कधीही आतंकवादाचे समर्थन केले नसल्याचे पाकिस्तान सरकार व येथील मुल्ला- मौलवी सांगतात. भारतात अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हापासून पाकिस्तान ही दहशतवाद निर्यात करणारी भूमी असल्याचे चित्र तयार होत आहे. जिहाद शब्द तर पाकिस्तानची ओळख बनला आहे. पाकिस्तान सरकार या आरोपांचे वारंवार खंडन करत आहे व असे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत आहे. मात्र पाकिस्तानचे वृत्तपत्र दै. डॉनने या सर्व आरोपांचा स्वीकार केला आहे आणि पाकिस्तान सरकार काहीही म्हणो, कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही असे संकेत आपल्या वृत्तपत्रीय मजकुरातून दिला आहे.
मुस्लिम जगत // मुजफ्फर हुसैन

मुंबईच्या विशेष न्यायालयाने पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई हल्ल्याच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली. योगायोगाने त्याच दिवशी पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक फैसल शहजाद याला अटक केल्याची बातमी येऊन धडकली. याच फैसल शहजादने न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्क्वेअर येथे कार बॉम्बस्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुदैवाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना याची आधीच कुणकुण लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
फैसल शहजाद अमेरिकेच्या जॉन केनेडी विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडण्यात आले. जगात कोठेही दहशतवादी घटना घडली किंवा हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याची नाळ पाकिस्तानशी जोडलेली जाते. फैसल शहजादच्या अटकेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
याशिवाय आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे हे अतिरेकी एकतर पाकिस्तानी असतात किंवा पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन अथवा ब्रिटिश नागरिक तरी असतात. या अतिरेक्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे रोजगाराच्या शोधात किंवा पैसे कमविण्यासाठी अतिरेकी कारवाया करण्यास प्रवृत्त होणे हे एकवेळ समजू शकते, पण फैसल अहमद तर कोण्या गरीब घरचा नव्हता. तो तर पाकिस्तानच्या वायूदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा होता. याचाच अर्थ तो उच्चशिक्षित होता व गेल्याच वर्षी त्याला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले होते. मात्र अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त होताच त्याने पाकिस्तानला जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले.
तेहरीके तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शहजादने एकट्यानेच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानातील बुद्धिजीवी वर्गातून याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक याला धोक्याचा इशारा समजत आहेत. शहजादसारख्या उच्चशिक्षित तरुणाने हे कृत्य करणे यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. यापूर्वीही पाकिस्तानातील उच्चशिक्षित, पदवीधारक अशा कटात सामील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळलेे आहे. अशा कारवाया करताना घटनास्थळीच कित्येकांना पकडण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात अफगाणिस्तानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शहजातच्या कारवायांचा भांडाफोड झाला. अमेरिकेचे अधिकारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्याशी या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दै. डॉनने एक विश्लेषणात्मक लेख प्रकाशित केला आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानला जगभरात नव्या जिहादची बालवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
जगात कोठेही हिंसा आणि अराजकता असेल, त्याला सर्वस्वी जबाबदार पाकिस्तानच असल्याचे पाकिस्तानविरुद्धचे पुरावे सांगत आहेत. "नव्या जिहादची नर्सरी' हा शब्दप्रयोग करून दै. डॉनने म्हटले आहे की, अफगाणिस्तान लगतच्या पाकिस्तानच्या सीमारेषेला अल कायदाचे मुख्यकेंद्र मानले जात आहे. याबाबत डॉनने खैबर पख्तुनवाचे मुख्य पोलीस अधिकारी मलिक नवीद खान यांच्या वक्तव्याचा संदर्भही दिला आहे.
खान म्हणतात, संपूर्ण जगभरातून जिहादीवृत्तीचे लोक पाकिस्तानात येत आहेत. कारण ते सहजतेने सीमा ओलांडून अफगाणिस्तानात प्रवेश करू शकतात. ओसामा बिन लादेनचा अमेरिका व तिच्या समर्थकांविरुद्ध जे वैश्विक युद्ध आहे, त्याची पाळेमुळे अफगाणिस्तानातील पर्वतराजीत दूरवर पसरली आहेत. त्यामुळे कट्टरवादी तरुणांसाठी हा प्रदेश स्वर्गासमान आहे आणि सुरक्षितही.
"डॉन'च्या म्हणण्यानुसार सौदी अरेबिया आणि अमेरिकेने 80 च्या दशकात रशियन सेनेविरुद्ध अफगाणिस्तानला भडकावले. परिणामी रशियावर मोठा दबाव पडला व शेवटी रशियाचे सैन्य तेथून निघून गेले. मात्र अलकायदा आणि इतर जिहादी गटांचे अस्तित्व या ठिकाणी तयार झाले.
सेंटर फॉर रिसर्च ऍण्ड सिक्युरिटीजचे प्रमुख इम्तीयाज गुल म्हणतात, पाकिस्तानने कोठूनही येणाऱ्यांना पेशावर व कबाईली प्रदेशात राहण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना या ठिकाणी अडवणारे कोणीही नाही. परिणामी गेल्या तीन दशकांत त्यांनी या प्रदेशात आपले बस्तान बसवले आहे. इम्तीयाज गुल आतंकवादाशी संबंधित प्रत्येक बाबींवर बारीक नजर ठेवून असतात. या संबंधात त्यांचे "सबसे खतरनाक स्थान' हे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.
"डॉन'च्या लेखात म्हटले आहे की, पाकिस्तानात आतंकवादाची सुरुवात जनरल जीयांच्या काळातच झाली, जेव्हा त्यांनी इस्लामचा सूर आळवायला प्रारंभ केला होता. भुट्टोंच्या फाशीला घाबरून जीयांनी इस्लामचा आधार घेतला होता. केवळ इस्लामचा पुरस्कार केल्यानेच आपल्याला लोकप्रियता मिळेल अशी त्यांची धारणा होती. त्यांचे देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण त्यांनी इस्लामच्या आधारावरच तयार केले होते. दुसरीकडे सैन्याने आणि एजन्सींनी कट्टरतावादी गटांना चुचकारणे सुरू केले होते.
या कट्टरवाद्यांना सेनेत आणि इतर संस्थांत उच्च पदे मिळू लागली. एकूणच काय तर इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) ही यांचीच निर्मिती होती. जीयांनी काश्मीर आणि अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याचा सपाटा लावला.
आज 5 अमेरिकन नागरिकांवर पाकिस्तानात खटले चालू आहेत. आतंकवादी हल्ल्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानच्या एका माजी राजकारण्याचा मुलगा असलेल्या डेविड हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात, लष्कर-ए-तोयबासाठी काम केल्याचे व 26 /11 च्या मुंबई हल्ल्यासाठी काही ठिकाणांची (ज्या ठिकाणी हल्ले झाले) पाहणी केल्याचे आरोप मान्य केले आहेत.
ब्रिटनने तर प्रारंभीपासूनच पाकिस्तानला आतंकवादाला जबाबदार ठरवले आहे. 2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याची योजना ही पाकिस्तानातील आतंकवाद्यांनी केली होती. ज्या चार युवकांनी स्वत:ला उडवले होते, त्यांचे प्रशिक्षणही पाकिस्तानात झाले होते. फैसल शहजादच्या अटकेनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आता अमेरिका कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला सूट देण्यास तयार नाही. त्यामुळे अमेरिकेने इशारा दिला आहे की, पाकिस्तानने आतंकवादाचा त्याग करावा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
पाकिस्तान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांतील अधिकृत सूत्रांनुसार अफगाणिस्तानात असलेले अमेरिकेच्या सैन्याचे कमांडर जनरल स्टेनली यांनी इस्लामाबाद येथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कियानींची भेट घेऊन त्यांना अमेरिकेची चिंता बोलून दाखवली. पाकिस्तानने तालिबान आणि अल कायदा यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी, असा अमेरिकेचा आग्रह होता.
शहजादचे घरचे लोक किमान दोन अतिरेक्यांना ओळखतात की जे जिहादी चळवळीत सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकाल्याचा परिणाम आता दिसू लागल्याचे अमेरिका खेदाने म्हणत आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत काही विपरित घडलेच, तर अमेरिकेला पाकिस्तानवर कारवाई करावी लागेल. पाकिस्तान सरकार व तेथील बुद्धीजीवी वर्ग जर वेळीच जागे झाले नाहीत, तर येणारा काळ पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असेल, असे डॉनच्या लेखाच्या शेवटी म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, इस्लामच्या आधारावर बनवल्या गेलेल्या पाकिस्तानला तथाकथित इस्लामी करण्याचा ढोंग करणारे किती मोठे नुकसान पोहोचवत आहेत याची त्यांना जाणीव नाही का? इतिहास यावर शोक करेल. आश्चर्याची गोष्ट ही की, पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या व विश्वसनीय दैनिकाने हा वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तान आतंकवादी असल्याचा याच्याइतका सबळ पुरावा आणखी कोणता असू शकतो?

Thursday, June 3, 2010

प्रश्न केवळ मंदिराचा नाही तर...

1992 पासून या विवादास्पद स्थळासाठी अनेक सूचना, सल्ले दिले गेले आहेत. ज्यांच्यात न्यायपूर्ण आणि सत्य गोष्ट सांगण्याची हिम्मत नाही ते लोक अशा गोल-गोल गोष्टी करून स्वत:ला "अमन का फरिस्ता' सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा गोष्टी करणाऱ्यांचा कदाचित आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा अथवा त्यांची बाजू कमकुवत असावी, म्हणूनच ते असे वेडगळ सल्ले देऊन मंदिरनिर्माणाला विरोध करण्याचा प्रयत्न करीत असतात.
काही दिवसांपूर्वी आणखी एक तकलादू तर्क दिला गेला. असे म्हटले जाऊ लागले की, इस्तंबूल येथील हागिया सोफिया चर्चच्या धर्तीवर हा प्रश्न सोडविला जावा.
या ठिकाणी हागिया सोफिया चर्चचा इतिहास समजून घेतला पाहिजे.
अयोध्येत राम मंदिर निर्माणाची चळवळ सुरू झाल्यापासून काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तसेच काही बुद्धीवादी स्वत: जणु शांतीदूत असल्याच्या थाटात फुकटचे सल्ले देताना दिसतात. अयोध्येत मंदिरही नको आणि मशीदही नको, असा शहाजोग सल्ला द्यायलाही ते विसरत नाहीत. बाबरीच्या ढिगाला हलवून त्या ठिकाणी एखादे रुग्णालय किंवा मोठी शिक्षणसंस्था उभारली जावी आणि यातून समस्त मानवजातीला लाभ होईल, असा सूरही ही मंडळी आळवताना दिसतात. आपल्या अतिरेकी बुद्धीचा अहंकार बाळगणारे बुद्धीजंतू आणखीही अनेक सल्ले देत असतात. त्यांचे म्हणणे असते की, असे केल्याने मंदिर आणि मशिदीचे प्रश्न सुटेल आणि देशात सुखशांती नांदेल.
अयोध्येत मंदिर बनू नये यासाठी अनेक कुतर्क दिली जातात. काही दिवसांपूर्वी आणखी एक तकलादू तर्क दिला गेला. असे म्हटले जाऊ लागले की, इस्तंबूल येथील हागिया सोफिया चर्चच्या धर्तीवर हा प्रश्न सोडविला जावा.
या ठिकाणी हागिया सोफिया चर्चचा इतिहास समजून घेतला पाहिजे. हागिया सोफिया चर्च सन 537 मध्ये बेंजांटाईन शासक जस्टिनियन याच्या कार्यकाळात बांधला गेला. हा काळ रोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ समजला जातो. त्या काळात रोमन शासकांनी स्थापत्य कलेचे अद्‌भूत दर्शन घडवीत अनेक चर्च बांधले. त्याकाळात त्यांचे साम्राज्य तुर्कस्तानपर्यंत पसरले होते. त्यामुळे येथेही अनेक चर्च उभारले गेले. हागिया सोफिया या चर्चची उभारणी त्याच काळात झाली होती, परंतु 13 व्या शतकाच्या शेवटी तिथे मुसलमानांचे राज्य आले. मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यकाळात धडाक्यात शेकडो मशिदी उभ्या केल्या. अनेक चर्चच्या मशिदीत रूपांतर करण्यात आले. इस्तंबूलमध्ये राज्य करणाऱ्या एका मुस्लिम शासकाची नजर हागिया सोफिया या भव्य चर्चवर पडली. त्याने आदेश दिला की, या चर्चला मशीद बनवा. मग काय चर्चची चिन्हे पुसली जाऊ लागली. चर्चला मशीद बनविण्याची धडपड सुरू झाली.
चारही बाजूला उंच उंच मनोरे उभे करण्यात येऊ लागले. चर्चमध्ये जिथे पादरी बसायचे तिथे सुल्तान नमाज करू लागला. चर्चच्या भिंतींवर मेरी आणि येशूची चित्रे होती, ती खरवडून काढण्यात आली. त्या ठिकाणी कुराणातील आयती लिहिल्या गेल्या. इतके सारे करूनही चर्चची ओळख ते पुसू शकले नाहीत. आजही त्या वास्तूच्या घुमटांवर मेरी आणि येशूची चित्रे पाहायला मिळतात. त्या सुलतानाला आणि मुस्लिम जनतेला चर्चचे मशीद बनविले याचेच समाधान होते.
हागिया सोफिया चर्चवर तुर्कांचा ताबा 1453 पासून 1934 पर्यंत राहिला, परंतु एक काळ असा आला की, 1923 मध्ये कमाल अतातुर्क यांच्या नेतृत्वात क्रांती झाली. त्यांनी सर्व जुन्या वास्तू पाडून टाकल्या.
कमाल पाशाने इस्लामला कठमुल्लांच्या तावडीतून मुक्त केले. राजकीय क्रांतीसोबतच ही सांस्कृतिक क्रांतीदेखील होती. इस्लामच्या नावाने जो पाखंड सुरू होता तो कमाल पाशा यांनी थांबविला. त्यांनी धर्माच्या नावाखाली चाललेले धर्मांधांचे राजकारण थांबविले. धूर्त मुल्ला आणि अय्याशी करणारे सुलतान यांना सुतासारखे सरळ केले. याच काळात पाशा यांची दृष्टी हागिया सोफिया मशिदीवरही गेली. कमाल पाशा यांचे म्हणणे होते की, मुस्लिम शासकांनी पूर्वी जोर जबरदस्ती आणि क्रूरतापूर्वक अन्य धर्मीयांची धर्मस्थळे ताब्यात घेतली ती परत केली पाहिजेत. यासाठी त्यांनी एक मोहीमच चालविली. मुसलमानांनी लावलेला कलंक पुसून टाकला.
अतातुर्क कमालपाशा यांनी जाहीररीत्या मुस्लिम शासकांच्या असहिष्णू कृत्यांची निंदा केली. त्यांनी अन्य धर्मीयांना त्यांची त्यांची धर्मस्थळे परत करायला सुरुवता केली. हागिया सोफिया चर्चसंंबंधी निर्णय घेताना पाशा यांनी इस्तंबूलमधील ख्रिस्ती लोकांना एकत्रित केलेे. त्या पादऱ्यांची क्षमायाचना करीत हे ऐतिहासिक चर्च त्यांच्या स्वाधीन करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्या काळात मुस्लिम शासकांच्या अत्याचाराने बेजार होऊन अनेक ख्रिस्ती तुर्कीतून पलायन केले होते. त्यामुळे पुढे येऊन या चर्चचा ताबा कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. हे चर्च पुन्हा कोण सुरू करणार असा प्रश्न होता. या संबंधात कमाल पाशा यांनी पोप यांच्याशीही संपर्क केला, परंतु कोणीही शासक किंवा धर्मगुरू हे चर्च स्वीकारायला समोर आले नाहीत. यानंतर कमाल पाशा म्हणाले, ख्रिस्ती बांधव चर्च ताब्यात घ्यायला समोर येत नसतील तर हा त्यांचा निर्णय आहे, परंतु राजकीय शक्ती वापरून या चर्चला मशीद बनविले गेले आहे, त्यामुळे ही बाब सहन करता येणार नाही.
उर्दूतील प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी आपल्या शिकवा और जवाबे शिकवा या पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्ही मुसलमानांनी हे अल्लाह तुला खुष करण्यासाठी चर्च पाडले नाहीत काय? अन्य धर्मीयांची धर्मस्थळेही आम्ही उद्‌ध्वस्त केली आहेत. त्यांना अपमानितही केले आहे, परंतु हे परवरदिगार तू तरीही मुसलमानांवर प्रसन्न का नाही झालास? परंतु कमाल पाशा हे इकबालसारखे धर्मांध नव्हते. त्यांनी परधर्मीयांना त्यांची धर्मस्थळे परत केली. ज्यांनी पुन्हा धर्मस्थळे स्वीकारली नाहीत, ती त्यांनी सन्मानाने जतन केली. यावरून ध्यानात येते की, इकबाल हा सच्चा मुसलमान नव्हता तर कमाल पाशा हे सच्चे मुसलमान होते. त्यांनी अन्य धर्मांचा आदर केला. अन्य धर्मीयांची श्रद्धास्थळे पाशा यांनी मुसलमानांच्या तावडीतून सोडवून दिली.
भले हागिया सोफिया चर्च स्वीकारायला ख्रिश्चनांनी नकार दिला असेल, कमाल पाशा यांनी मात्र त्या वास्तूला मशीद राहू दिले नाही. त्या वास्तूला एका संग्रहालयात रूपांतरित केले. कमाल पाशा यांच्या या धाडसाचे आणि न्यायाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
हागिया सोफिया चर्चचा इतिहास जेव्हा काही बुद्धीजीविंना आणि राम मंदिराच्या विरोधकांना ज्ञात झाले तेव्हा त्यांनी कमाल पाशा यांची मुक्त कंठाने प्रशंसा करायला सुरुवात केली. तुर्कीत जे काही घडले त्याचे भारतातही अनुकरण झाले पाहिजे, असे ते म्हणू लागले. कमाल पाशा यांनी संग्रहालय बनवून वादच संपुष्टात आणला त्यामुळे भारतातही उक्त वाद समाप्त करायचा असेल तर मंदिर आणि मशीद न बनविता तिथे एखादे संग्रहालय बनविले जावे. काही लोकांना हा सल्ला ऐकताना बरा वाटत असेल, परंतु ते असे करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचाच प्रयत्न करीत असतात.
प्रश्न केवळ राम मंदिराचाच असता तर काही लोक असा विचार करू शकले असते, परंतु येथे प्रश्न केवळ राम मंदिराचा नाही, तर राम जन्मभूमीचा आहे. एखाद्या महापुरुषाचे जन्मस्थान त्याच्या कोट्यवधी भक्तांसाठी तीर्थस्थळच असते. मंदिरे अनेक असू शकतात, परंतु जन्मस्थान तर एकच असते. कल्पना करा की, हागिया सोफिया चर्च येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थानी असते तर ख्रिस्ती बंधू-भगिनी आणि तत्कालीन ख्रिस्ती पादरी हे चर्च सोडायला तयार झाले असते का? येशूच्या जन्मस्थानी एखादे संग्रहालय झालेले ख्रिस्ती लोकांना चालले असते काय? याचे उत्तर आहे कदापि नाही.
कोणत्याही धर्मातील महापुरुषाचे जन्मस्थान बदलता येत नाही किंवा ते कोणाच्या ताब्यातही देता येत नाही. त्यामुळे हागिया सोफिया चर्चचे उदाहरण भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थान निर्माण होणाऱ्या मंदिरासाठी देता येणार नाही. अतातुर्क यांनी म्हटले की, ख्रिस्ती लोकांवर मुस्लिम शासकांकडून घोर अन्याय झाला आहे. वर्तमान सरकार हिंदूंच्या आस्थेचा सन्मान करत असे म्हणेल काय की, हिंदूंवर मुस्लिम शासकांनी घोर अन्याय केला आहे? गठ्ठा मतांसाठी लाचार होणारे सरकार असे म्हणणार नाही.
अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी जन्मलेल्या पुत्राचे स्थान अन्य ठिकाणी कसे असू शकेल? हिंदू परंपरेनुसार त्यांचे देवी-देवता जेथे जन्मले तेथे मंदिराशिवाय अन्य स्मृती काय असणार? त्यामुळे प्राचीन काळी तिथे मंदिरच असणार. राममंदिर तोडणे इस्लामी धर्मांधांना कठीण नव्हते. भारतातील शेकडो मंदिरे तोडून मशिदी बनविण्यात आल्या हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही. मंदिर आणि मूर्ती तोडण्याची मुसलमानांची परंपरा मुस्लिम कवी आणि इतिहासकारांनीही काही लपवून ठेवलेली नाही. त्यांनी अभिमानाने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद किंवा अन्य वास्तू बांधताच येणार नाही. रुग्णालय, संग्रहालय किंवा विद्यापीठ यांपैकी काही तिथे बांधता येणार नाही. हागिया सोफिया चर्चचे आपण जेव्हा ऐतिहासिक उदाहरण देतो तेव्हा मोकळ्या मनाने स्वीकार केले पाहिजे की, हिंदू समाज ज्या पवित्र स्थानासाठी शेकडो वर्षांपासून संघर्ष करीत आहे, तिथे रामजन्मभूमीवर मंदिरच निर्माण झाले पाहिजे.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

Tuesday, May 11, 2010

अनुवांशिक आजारांचा धोका

लेखात म्हटले आहे की, भारतामध्ये असणारे रीतीरिवाज पाकिस्तानातही जवळपास तसेच आहेत. चुलत, मामे, मावस आणि आत्येभाऊ आणि बहिणी यांच्यामध्ये होणाऱ्या विवाहांवर दि न्यूज ने जोरदार टीका केली आहे. अशा विवाहांमुळे अनुवांशिक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा इशारा सदर वृत्तपत्राने पाकिस्तान सरकार आणि जनतेला दिला आहे.
या जगात जे जे जुने आहे ते ते सर्व टाकाऊ आहे असे नाही आणि जे जे नवे आहे ते ते सारे चांगलेच असते असेही नाही. वेळोवेळी होणारे प्रयोग आणि येणारे अनुभव यातून चांगले किंवा वाईट ठरत असते. एके काळी लग्नासाठी मुलगा आणि मुलगी आपल्याच समाजातील असावेत असा आग्रह असायचा.
काही समाजामध्ये तर आईकडून 16 गोत्र आणि वडिलांकडून 16 गोत्र सोडून वधू-वरांचे विवाह निश्चित केले जायचेे. रक्ताचे नाते जेवढे दूरचे असायचे तेवढेच त्यांचे संतान धष्टपुष्ट, निरोगी आणि बुद्धिमान जन्माला यायचे, परंतु स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मांचे प्रमाण विस्कळीत झाले आणि त्यामुळे दूरचे वधू-वर शोधणे कठीण बनले. जन्मकुंडली हाच एकमेव आधार बनला.
भारतीय समाजामध्ये विवाह हा एक संस्कार आहे. संस्कार पूर्ण करण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती आहेत. काळाच्या ओघात या पद्धतींमध्ये शिथिलता येत गेली. याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या नावाने झालेली असली तरी प्राचीन काळापासून तिथे राहणारी जनता तर भारतीयच आहे. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत आणि सामाजिक मनसुद्धा भारतीयच आहे. केवळ उपासनापद्धती बदलल्यामुळे (मुस्लिम झाल्यामुळे) त्यांचा पिंड थोडाच बदलणार आहे?
पाकिस्तानातही आता मुलांमध्ये अनुवांशिक समस्या पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानात ही समस्या मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील इंग्रजी दैनिक दि न्यूजने यासंबंधात एक अत्यंत रोचक आणि चकीत करणारा लेख प्रकाशित केला. या लेखाचे शीर्षक आहे, "विवाह और बिमारीयॉं'.
नात्यात विवाह केल्यानंतर जन्मणाऱ्या मुलांची बौद्धिक क्षमता अतिशय क्षीण असते. त्यांच्या आयक्यू आणि ऍप्टीट्यूड चाचण्यांवरून दिसून येते की, त्यांची बुद्धी कुशाग्र नसते. ही बाब तर मुले जेव्हा वाचू-लिहू लागतात तेव्हा ध्यानात येते, परंतु यापूर्वीच ते भयंकर आजारांना बळी पडतात. याविषयांवरील चर्चेला अग्रक्रम दिला गेला पाहिजे, असे न्यूजने म्हटले आहे.
लेखात पुढे म्हटले आहे की, आम्हाला कसला पाकिस्तान तयार करायचा आहे, दृढ आरोग्य असणारी भावीपिढी की, येत्या काळातील रोगग्रस्त पाकिस्तान?
काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानात 15 हून अधिक मुले एका दुर्मिळ आणि मृत्यूच्या जबड्यात नेणाऱ्या भयानक चर्मरोगाला बळी पडली आहेत. या आजाराचा सर्वात घातक पैलू म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणांना झेलण्याची क्षमता समाप्त होऊन जाते. बलुचिस्तान तर सोडाच लाहोर आणि कराचीसारख्या शहरांमध्ये देखील यावर उपचार होणे अशक्य आहे. या आजारासंबंधी उपाययोजना करण्यात पाकिस्तान सरकार निष्क्रिय आहे. तेथील सामाजिक संस्थांनाही याचे काही देणे-घेणे नाही.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका एन.जी.ओ. ने या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यामुळे या आजाराची भीषणता समाजासमोर आली. पाकिस्तानातील सुजाण नागरिकांनादेखील याविषयी खूपच कमी माहिती आहे.
याविषयावर विचार व्यक्त करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या समस्यांचे विवाह हेच कारण आहे. अनेक पिढ्यांपासून निकटवर्ती नात्यात विवाह होत आहेत. त्यातूनच या घातक रोगांचा जन्म होतो. जवळच्या नात्यांमध्ये वधू-वर शोधणे सोपे आहे, परंतु यामुळे आगामी काळात जन्मणारी पिढी घातक आजारांना बळी पडणार आहे. अशा विवाहांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात याचे वर्णन या छोट्याशा लेखात करता येणार नाही, परंतु रक्ताचा कॅन्सर आणि थॅलिसिमीया हे आजार सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
बलुचिस्तान हा प्रदेश तसा मागास समजला जातो. प्रत्येक तिसऱ्या कबिल्यात असा एकतरी रोगी आढळतोच. महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर असणे तर तेथे सर्वसामान्य बाब आहे. सुरुवातीला डॉक्टरांना वाटायचे की, ज्या माता आपल्या मुलांना स्तन पाजत नाहीत त्या महिलांमध्ये हा रोग होतो, परंतु आता माहीत झाले आहे की, स्तनाचा कॅन्सर हा नात्यातल्या विवाहामुळे होतो. मामेभाऊ अथवा मामेबहीण यांच्याशी होणाऱ्या विवाहामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कोपेनहेगन संमेलनात एक तथ्य समोर आले की, अधिक गोंगाट हा कानासाठी सर्वाधिक हानिकारक आहे आणि मनुष्याला यामुळे बहिरेपण येते. अचानक कानावर येणाऱ्या मोठ्या आवाजामुळे हृदयावर मोठा घातक परिणाम होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु गोंगाटामुळे बहिरेपण येते, ही माहिती नवी आहे.
कराचीमधल्या रेहडीगोठ या भागात बहिरी मुलं जन्माला येऊ लागली आहेत. एधी फाऊंडेशनने पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. बिलकीस एधी यांचे म्हणणे आहे की, मुलींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. पाकिस्तान सरकारचे याकडे लक्ष वेधले तरी काही उपयोग झाला नाही.
वातावरणातील मोबाईल आणि विद्युत तरंग यांचा मातेच्या गर्भावर विपरित परिणाम होतो. आज अवकाशात जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी बनविले जाणारे यंत्र आणि संवादासाठीची साधने खूपच घातक सिद्ध झाली आहेत. नात्यातल्या विवाहामुळे जन्मजात बहिरेपणा नवजात शिशुमध्ये का येत असावा, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
जन्मत:च आजार घेऊन येणाऱ्या बालकांवर उपचार करणे खूपच कठीण असते. जन्मानंतर येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करणे सोपे असते, परंतु जन्मत:च बहिरे असणाऱ्या बालकांवर उपचार करणे अशक्य असते.
विवाहापूर्वी लोकांची जनुकीय चाचणी करण्याचा कायदा करण्याचा विषय काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्याचे दि न्यूजनी म्हटले आहे, परंतु पाकिस्तानात हे सर्व घडून येणे कठीण वाटते. कारण हा समाज आजही रूढीवादी समजला जातो. आशियातील 2-3 देश सोडले तर असा कायदा कोठे आहे?
भारत हा तसा पुढारलेला देश आहे, परंतु आमची पारंपरिक विचार करण्याची पद्धत कसे बदलणार? जेथे विवाहापूर्वी वधू-वरांनी एकमेकांचे मुख पाहण्यातही अनेक अडचणी आहेत, तेथे या गोष्टी कशा शक्य होणार?
समाजाला या भयंकर अनुवांशिक आजारातून मुक्त करायचे असेल तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे. लोकांना समजले पाहिजे की, पहिल्या चुलत नात्यांमध्ये विवाह म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. लोक अशा विवाहांचे समर्थन करतात, कारण असे विवाह ठरविणे मोठ्या लोकांना खूपच सोपे असते. यामुळे कबिल्याबाहेर विवाह करायचा नाही या गोष्टीलाही बळ मिळते.
दि न्यूजने म्हटले आहे की, बलुचिस्तानची कहाणी टी.व्ही. वर गाजती आहे, परंतु वृत्तपत्रांनी देखील अशा मुद्द्यांवर लोकांमध्ये जागृती घडवून आणली पाहिजे.
या समस्येचे सर्वात मोठे कारण आहे एखाद्या नव्या धर्माचा उदय आणि एखाद्या नव्या पंथ-संप्रदायाची सुरुवात. सुरुवातीला जमलेले मूठभर लोक अधिक करून आपापसात नाते जुळवतात. संख्या कमी असते तेव्हा लोक जवळच्या नात्यातच मुलं-मुली शोधतात. ही जवळीकताच अनुवांशिक आजारांचे कारण बनते.
फार पूर्वी दळणवळणाची साधने खूप कमी होती. त्या काळात जवळच्याच लोकांशी विवाह जुळवणे सोयीचे होते. आजही जे लोक विदेशात राहतात आणि आपल्याच धर्म किंवा जातीला प्राथमिकता देतात ते नकळतपणे या आजारांना आमंत्रण देतात. वधू-वर विषयक जाहिरातींमुळे खूप मोठा बदल झाला आहे, परंतु जेथे समाज अशिक्षित आहे आणि प्रसिद्धी माध्यमापासून दूर आहे, त्यांच्यासाठी आजही दूरचा विवाह अडचणीचा ठरतो. नात्यामध्ये विवाह जुळवण्यामागे घटस्फोटाची भीती हेही एक कारण आहे.
परिवार आणि कबिल्यातील ज्येष्ठ व्यक्ती विचार करतात की, कुळाचा दबाव आणि समाजाच्या भीतीमुळे वैवाहिक जीवन निभावून नेणे सहजशक्य बनते, परंतु प्रत्येक समाजात वाढत चाललेली घटस्फोटाची प्रकरणे पाहिली म्हणजे यात काही तथ्य नाही, हे दिसून येते.
समाजात जेव्हा मुलं किंवा मुलींचे प्रमाण कमी असते, तेव्हा साटे-लोटे प्रथा प्रबळ बनत जाते. एकाच्या बदल्यात दुसरे, याचा सरळ अर्थ आहे जाणीवपूर्वक नात्यातच विवाह ठरविले जात आहेत. नात्यातल्या विवाहांमागे कोणतीही कारणे असली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत.
वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन झाल्यानंतरही आपण जर मामे, चुलत, आत्ये आणि मावस भाऊ अथवा बहिणींशी विवाह करीत असू, तर याचा अर्थ असा आहे की, आपण स्वत:हूनच अनुवांशिक रोगांना आमंत्रित करीत आहोत. परिणामी तीन चार वर्षांच्या मुला-मुलींच्या डोळ्यांवर चष्मा येत असेल तर याला जबाबदार कोण?
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

प्रेमिकांच्या छळवणूक कथा

शोएब मलिक हा एक लबाड प्रेमीआहे. इतकेच नव्हे तर त्याच्या मनात भारताप्रती प्रचंड घृणा आणि द्वेषभावना आहे. तो आपल्या खेळाप्रतिदेखील प्रामाणिक नाही. जो आपल्या देशाशी प्रामाणिक नसेल, तो आपल्या भावी पत्नीप्रति किती प्रामाणिक राहणार? याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टेनिस जगतात भारताचे नाव पुढे आणणारी सानिया मिर्झा लवकरच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या भावी जोडीला आमच्या अनेक बधाईयॉं. वधुवर बनून बोहल्यावर चढण्यापूर्वीच दोघांचा भूतकाळ हात धुवून मागे लागल्याचे दिसत आहे. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात कीर्ती मिळवली आहे, परंतु हे दोघे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत. सानिया जेव्हा टेनिसच्या मैदानात आली तेव्हा मुल्ला-मौलवींनी तिच्याबद्दल कडक नाराजी व्यक्त केली होती. सानियाच्या कपड्यांवरून चर्चा रंगली होती. दुसरा कोणता इस्लामी देश असता तर तिला गुडघे टेकावे लागले असते, परंतु भारतात कठमुल्लांची डाळ शिजली नाही.
सानिया मैदानात टिकून राहिली आणि शेवटी तिनेे स्वत:ला समर्पित खेळाडू म्हणून प्रस्थापित केले. अधूनमधून तिच्या विवाहविषयक बातम्याही वाचायला मिळायच्या. हैदराबादच्या एका मोठ्या बेकरी मालकाच्या मुलाशी विवाह ठरल्याच्या बातम्याही वाचायला मिळाल्या. बेकरी मालकाचा मुलगा सोहराब हा सानियाचा बालमित्र. बेकरी मालकाच्या परिवाराशी सानिया मिर्झा यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ नाते असल्यामुळेच हा विवाह ठरला होता. ही वार्ता लोकांपर्यंत पोहोचते न पोहोचते तोच ठरलेला विवाह तुटल्याच्या बातम्याही येऊन थडकल्या.
सानियाच्या खेळाविषयी झाल्या नाहीत तेवढ्या चर्चा तिच्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून झाल्या. विवाहपूर्व शारीरिक संबंधांचे सानियाने जाहीर समर्थन केले. हे तिचे वैयक्तिक मत असू शकते, परंतु तिरंग्याविषयी तिने व्यक्त केलेल्या मताने मात्र कोट्यवधी भारतीयांच्या भावना पायदळी तुडविल्या गेल्या. तरीही मोठ्या मनाने भारतीयांनी हैदराबादच्या या मुलीला सन्मान दिला. टेनिसच्या मैदानात सानिया भारताचा झेंडा सदैव फडकवीत ठेवेल, याविषयी दृढ विश्वास व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी आलेल्या सानियाच्या बातम्यांमुळे खळबळ माजली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी सानिया विवाह करणार असल्याची बातमी तशी खळबळजनकच होती. सानियाच्या घरच्या मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा विवाह 15 एप्रिलपर्यंत संपन्न होऊन जाईल. गेल्या आठवड्यातच त्या दोघांनी गुपचूप विवाह केल्याचीही चर्चा आहे.
तसे पाहिले तर वयात आलेल्या मुला-मुलींना आपला साथीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु पती-पत्नी बनल्यानंतर दोघांचे ग्रहस्थी जीवन सुखाचे होईल, याची काळजीही भारतीय संस्कृती करते. भविष्य कोण जाणलंय? परंतु वातावरणाचा कानोसा घेतला तर सानियासाठी भावी गृहस्थी जीवन खूपच कठीण दिसते.
शोएब मलिक हा सडकछाप प्रेमी आहे. त्याच्या स्वभावावरून वाटते की, पाकिस्तानात पुन्हा एकदा रीना रॉय हिच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होईल. मोहसीन खान हा पूर्वीच्या काळचा नावाजलेला क्रिकेट खेळाडू. त्या काळातील प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रीना रॉय त्याच्या प्रेमात फसली. रीना रॉय हिच्यावर काय गुदरलं माहिती आहे? रीना रॉय हिचे सारे उपकार मोहसीन खान विसरून गेला. सानियाच्या विवाहप्रसंगी रीना रॉय इतकेच म्हणेल की, सानियाला शुभेच्छा देणे ही तर आपली संस्कृती आहे, परंतु शुभेच्छांसोबत माझी कला आणि करियरचा सत्यानाश करणाऱ्या पाकिस्तानला दु:खाचे सुस्कारे आणि वेदनेचे हुंदकेही घेऊन जा!
क्रिकेटच्या मैदानावरील खेळ पाहून आपल्या प्रेमात पडलेल्या प्रेमिकांना पत्नी बनवल्यानंतर तिचे सौंदर्य, बोैद्धिक कुशलता, चंचलता, चपळता आणि समर्पण या साऱ्यांचा निर्घृण खून कसा पाडला जातो, तिची संपत्ती हडप करून तिच्या यौवनावर कसा घाला घातला जातो, याविषयी काही जाणून घ्यायचे असेल तर जमाइमा हिला अवश्य विचारा. ती इम्रान खान याच्या प्रेमात पडून त्याची पत्नी बनली होती. ती त्याच्या दोन मुलांची आई बनली होती, परंतु त्यानंतर एक दिवस या विदेशी महिलेला आपल्या लंडन येथील माहेरी परतावे लागले.
जमाइमा हिने इम्रान याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, परंतु या मदांध आणि विक्षिप्त क्रिकेटपटूने जमाइमा हिला भिकेला लावले. त्याने आरोप केला की, तुझ्यामुळे मी निवडणूक जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा पंतप्रधान बनणे हे माझे स्वप्न आहे, परंतु तू एका यहुद्याची मुलगी आहेस. माझा देश पाकिस्तान तुझा स्वीकार कसा करेल?
जमाइमा हिच्या वडिलांना केवळ दोन मुलीच होत्या. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि इम्रान याला प्रचंड संपत्ती मिळाली. यानंतर इम्रान याने बिचारी जमाइमा हिला केवळ पाकिस्तानातूनच नव्हे तर आपल्या मनातूनही हाकलले. इम्रान खान हा पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकला नाही. तो कसाबसा संसदेपर्यंत पोहोचू शकला. आता तो राजकारणाच्या दलदलीत फसल्याचे दिसत आहे. त्याची दोन्ही मुले आईजवळ लंडनमध्ये वाढत आहेत. असे आहे पाकिस्तानातील क्रिकेटपटूंचे चरित्र, चारित्र्य आणि काळाकुट्ट इतिहास!
केवळ क्रिकेटपटूंच असे करतात असे नाही. पाकिस्तानातल्या कोणत्याही क्षेत्रावर दृष्टी टाका. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. प्रसिद्ध गायिका नूरजहॉं ही मोठी स्वप्ने घेऊन पाकिस्तानात गेली होती. तिचा प्रिय पती शौकत नावाजलेला दिग्दर्शक होता. तिला काय माहीत की हा पती एक दिवस आपल्याला तलाक तलाक तलाक म्हणून घराबाहेर काढेल? नूरजहॉं हिला पाकिस्तानात गेल्याबद्दल खूप पश्चाताप करावा लागला. याबद्दल खूप लिहिले गेले आहे.
डायनाच्या घटस्फोटानंतर पाकिस्तानी डॉक्टर एहसान खान याच्याशी तिचे सूत जुळेल असे वाटत होते. त्यावेळी पाकिस्तानी मोठ्या अभिमानाने सांगायचे की, डायना एक दिवस पाकिस्तानची सून बनेल, परंतु तिच्या भाग्यात दुसरेच लिहिले होते. एहसान याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच मृत्यूने तिची सुटका केली. पाकिस्तानात प्रेम तर करता येते, परंतु त्याला विवाह म्हणून कायदेशीर मान्यता मिळत नाही. इस्लाममध्ये आपल्या पद्धतीने निकाह करणे बंधनकारक असते. सर्वात आधी गैरमुस्लिमाला मुस्लिम बनावे लागते. त्यानंतरच ती एखाद्या मुसलमानाची पत्नी बनू शकते.
शरियतनुसार एका मुसलमानाला चार बायका करण्याची परवानगी आहे. प्रेमिकाच, पण जिने निकाह केला आहे, तिचा कोणता नंबर? हे तर तिच्या भाग्यावर अवलंबून असते. तिचा प्रेमी पती तिला किती दिवस आपल्या निकाहात ठेवेल आणि कधी तलाक देईल, याची भविष्यवाणी करणे अवघड असते. विवाहाचा विचार करता पती हा एकप्रकारे हुकूमशहाच असतो. इस्लामने तर पत्नीला खुला (स्त्रीकडून दिला जाणारा तलाक) चा अधिकार दिला आहे, परंतु बिचाऱ्या किती महिलांना खुला मिळतो! याची कुठेच गणती नाही. येथे केवळ आणि केवळ पुरुषांचाच अधिकार चालतो.
आजवर आलेल्या बातम्यांवरून आता सिद्ध झाले आहे की, शोएब मलिक हा आधीपासूनच विवाहित आहे. त्याचा आयेशा सिद्दिकी नामक तरुणीबरोबर निकाह झाला होता. त्याने आता तिला तलाक दिला आहे. आयेशाच्या वडिलांनी पोलीस ठाणे जवळ केल्यामुळे शोएब अडचणीत आला. पोलिसांनी त्याचे पारपत्र जप्त केले. अटकेची शक्यता होती. त्यामुळेच सुरुवातीला उर्मटपणा करणारा शोएब तलाक द्यायला तयार झाला.
शोएब याने मिस इंडिया सायली भगत हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती या लांडग्याच्या तावडीत फसली नाही. त्याची पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात बदनाम कॅप्टन म्हणून ओळख आहे. मॅच फिक्सिंगपासून क्रिकेटसंबंधित सगळ्याच गुन्ह्यांमधे तो आकंठ बुडाला आहे. त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून त्याचे भवितव्य काय असेल, हे सांगणे कठीण!
त्याने क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी सदैव शत्रुत्व जपले आहे. गेल्यावेळी भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला होता, तेव्हा जगातील साऱ्या मुसलमानांची शोएब याने क्षमायाचना केली होती. क्रिकेटच्या मैदानात त्याची भूमिका सदैव धर्मांध मुसलमानाला शोभेल अशीच राहिली आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराला ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रसंगी अनुशासनहीनतेसाठी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
सानियाचेही टेनिसमधील आकर्षण आता कमी होताना दिसत आहे. विश्व टेनिस स्पर्धेत 2007 मध्ये तिचे स्थान 27 वे होते. 2008 मध्ये ती 92 व्या स्थानावर फेकली गेली. सानिया आणि शोएब या दोघांनी लग्नानंतर दुबईत राहणार असल्याचे म्हटले आहे. शोएब पाकिस्तानकडून आणि सानिया भारताकडून खेळतील असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या मनाला हे वक्तव्य चांगले वाटत असले तरी यात काही तथ्य नाही. सानियाला भारताकडून मन:पूर्वक शुभेच्छा आहेत, परंतु पाकिस्तान्यांच्या परंपरेनुसार सानियाची फरफट प्रेमिकेकडून छळवणूक कथेकडे झाली, तर ती एका चांगल्या खेळाडूच्या करियरची आत्महत्या ठरेल!
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील