तुर्की येथील मारदिन या शहरात नुकतेच इस्लामी विद्वानांचे एक संमेलन पार पडले. या संमेलनात सातशे वर्षांपूर्वी इब्ने तैमय्याकडून देण्यात आलेल्या जिहादच्या प्रासंगिकतेवर चर्चा झाली. या फतव्याच्या आधारे कोणाही गैरमुसलमानाला काफीर ठरविता येणार नाही आणि त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणाही करता येणार नाही, या विषयावर सर्वजण सहमत झाले. फतव्याचा आधार घेऊन गैरमुसलमानाला काफीर ठरविणे ही चुकीची व्याख्या आहे. कोणत्याही हिंसेला आणि नरसंहाराला फतव्याच्या नावावर तर्कसंगत ठरवता येणार नाही.
21 व्या शतकातही मुसलमान इतका मागास आणि कट्टर का आहे? मुस्लिमांवर सतत फतव्याची तलवार लटकत असते हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. फतव्यांवर नेहमीच चर्चा होताना दिसते. आज लोकशाहीचे युग आहे. कुणी धर्मयुद्धाच्या गोष्टी करीत असेल तर ते मनाला पटण्यासारखे नाही.
मध्ययुगात धर्माच्या नावावर अनेक लढाया झाल्या. मानवी इतिहास क्रुसेड युद्ध विसरणे शक्य नाही. जगातल्या सर्वच धर्मांमध्ये धर्मयुद्ध शब्द कोणत्या ना कोणत्या रूपात पाहायला मिळतोच. मध्य आशियातून उगम पावलेल्या तीनही धर्मांनी जगावर विजय मिळविण्यासाठी वेळोवेळी युद्ध केले. विजय मिळविल्यानंतर तिथे आपले साम्राज्य प्रस्थापित केले, परंतु 21 व्या शतकात एकमेव मुस्लिम समाजच असा आहे की, जो आजही धर्माच्या नावावर साम्राज्य प्रस्थापित करू इच्छितो.
20 व्या शतकाच्या सातव्या दशकात पाकिस्तानचे तुकडे झाले आणि बांगला देशाची निर्मिती झाली. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुलफिकार अली भुट्टो यांनी इस्लामी बॉंबच्या नावाने मुस्लिम जगताला संघटित होण्यासाठी आवाहन केले. पाहता पाहता इस्लामी बॉंबसोबतच इस्लामी सेना, इस्लामी बॅंक आणि इस्लामी शेअर बाजार असे शब्द कानावर येऊ लागले.
इस्लामी ब्लॉकची सुरुवात तर सौदी अरबला जगाचा खलिफा बनविण्यासाठी झाली होती. या आगीत तेल ओतण्याचे काम अतिरेकी संघटनांनी केले. अतिरेकी संघटनांनी स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्याचे मनसुबे बाळगले आहेत.
अधिकांश मुसलमानांनी लोकशाही स्वीकारली नाही, हे वास्तव आहे. असे नसते तर इजिप्तमधील राजेशाही संपल्यानंतर कर्नल नासिर यांच्याविरुद्ध सैयद कुतुब याने अल बुरहानचा पाया घातला असता काय? सौदी अरबच्या शासकांनी 1932 मध्ये किंग सऊद यांच्या नेतृत्त्वाखाली आपले धार्मिक साम्राज्य स्थापित केले तरीही तेथील एका गटाने इस्लामच्या नावावर या राजेशाहीला मान्यता दिली नाही. आजही तेथे अशा घडामोडी घडताना दिसतात.
ओसामा बिन लादेन याची विचारधारा काही एका दिवसात तयार झालेली नाही. इस्लाममध्ये जो गट सत्ता प्राप्त करण्यात अयशस्वी होतो, तो दुसऱ्या गटाला गैर इस्लामी ठरवतो. त्याच्या विरोधात युद्ध सुरू करतो. पुढे जाऊन गैरइस्लामी देशांतही धर्माच्या नावाने हेच तत्त्व सक्रिय झाले. यातून रशिया आणि चीनही वाचू शकले नाहीत. आज चेचेन्या येथील मुस्लिम अतिरेक्यांमुळे रशिया दु:खी आहे, तर जियांग मुसलमानांनी चीनच्या नाकी नऊ आणले आहे.
मुस्लिम साम्राज्यवाद्यांची सगळी मदार केवळ धार्मिक वेडेपणावर आधारलेली आहे. येथे धर्माकडे शक्तीशाली शस्त्र म्हणून पाहण्यात येते. संपूर्ण जगाला दारूल हरब (इस्लामच्या शत्रूंचा देेश) आणि दारूल इस्लाममध्ये विभाजित केले आहे. तसेच दारूल हरबला दारूल इस्लाम बनविण्यासाठी बहुविवाह आणि धर्मांतरणाचा वापर करण्यात आला. मुसलमानांची संख्या वेगाने वाढावी हाच यामागचा उद्देश.
14 व्या शतकात मुस्लिम साम्राज्यवाद्यांनी "फतवा' नावाने एक नवा शोध लावला. मुस्लिम साम्राज्याच्या सीमा वाढविण्यासाठी त्यांनी अशी व्यवस्था केली. इस्लामी विद्वान वेळोवेळी अरबी शब्दांची व्याख्या करून इस्लामी साम्राज्य वाढवायला मदत करण्यासाठी ही व्यवस्था तयार झाली. इस्लामी विद्वान आणि साम्राज्याचा प्रसार करणाऱ्या टोळीने शब्दांच्या व्याख्या आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे करायला सुरुवात केली. यात जिहाद हा एक शब्द होता की, ज्या शब्दाला इस्लामचा आत्मा असल्याचे सांगण्यात आले. या शब्दाच्या आधारे मुसलमानांना अधिक कट्टर आणि लढाऊ बनविण्याचे शिक्षण देण्यात येऊ लागले.
फतवा शब्दाने तालिबांनींच्या उपद्व्यापांचे समर्थन केले आणि समस्त मुस्लिम समाजाला एका सेनेच्या रूपात बदलण्याचा निर्णय झाला. परिणामी संपूर्ण जगात मुसलमानांबद्दल घृणेची लाट आली. आज सारे जग मुसलमानांच्या धर्मांध कारवायांनी त्रस्त होऊन त्यांच्याविरोधात संघटित होताना दिसत आहे. आता कुठे विचारी आणि उदार मुसलमान फतव्यासंबंधी आपली मते स्पष्ट करताना दिसत आहेत. जिहादला कितपत इस्लामी म्हणावे यावर आता साऱ्या जगातून मंथन होऊ लागले आहे. जगात मुसलमान इतरांपासून वेगळे पडू नये यासाठी चिंता आणि चिंतनाला सुरुवात झाली आहे.
मुस्लिम प्रदेशावर मंगोल लोकांनी केलेल्या आक्रमण आणि व्यापक नरसंहाराच्या विरोधात इस्लामी विद्वान इब्न तैमिय्या यांनी मारदिन फतवा जारी केला होता. याचवेळी साऱ्या जगाचे विभाजन मुस्लिम आणि गैरमुस्लिम असे करण्यात आले. येथूनच काफिर शब्दाची सुरुवात झाली आणि मग गैरमुसलमानांच्या विरोधात मुस्लिम आक्रमणकारींनी तलवार चालवायला सुरुवात केली.
परंतु या व्याख्येचा वापर मुसलमानांसाठीही होऊ लागला तेव्हा मात्र मुसलमान स्वत:च गोत्यात आले. आज तर एक गट दुसऱ्या गटावर हाच आरोप करताना दिसतो. ज्या गटाला सत्ता मिळत नाही, तो गट दुसऱ्या गटाला काफिरची संज्ञा द्यायला विसरत नाही. इतकेच नाही तर त्यांच्याविरोधात जिहादची घोषणाही केली जाते. सौदी अरबच्या विरोधात ओसामा अशाच पद्धतीने फतवे काढीत असतो.
मुसलमानांमध्ये खरा कोण आणि खोटा कोण याचा न्याय करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मारदिन संमेलनात भाग घेतलेल्या विद्वानांनी धाडसाने निर्णय घेतला आहे की, इब्ने तैमिय्या यांच्या फतव्याच्या आधाराने इतिहासातील मुस्लिम बादशहाचे जे मत बनले व त्यांनी जो व्यवहार केला, त्याचे आजच्या काळात औचित्य नाही. मध्ययुगीन व्यवस्था आजच्या जगाला लागू होऊ शकत नाही. आज जगातील देशांच्या सीमांना तसे फार महत्त्व राहिलेले नाही. सारे जग आज एक खेडे बनून समोर येत आहे.
परंपरेने मिळालेली धार्मिक विचारधारा आणि रूढी आज कायदे बनून जिवंत राहणे शक्य नाही. या फतव्यांमुळे, विशेषकरून जिहाद संकल्पनेमुळे मुसलमानांना साऱ्या जगापासून वेगळे पाडले गेले आहे.
मुसलमानांकडे कधीच चांगली शस्त्रे नव्हती. केवळ धर्माने प्रेरित होऊन ते लढत राहिले. लढाई जिंकल्यानंतर लुटीच्या मालाचे (माले गनीमत) आकर्षण होते. आता ते आकर्षण राहिले नाही. प्राचीन काळी इस्लामी जगताने विजयाचे मापदंड बनविले होते. आता त्यात कोणतेही आकर्षण आणि तथ्य राहिलेले नाही.
जगावर एक दृष्टिक्षेप टाकून पाहा. 11/9 नंतर जारी केलेल्या फतव्याचा काही उपयोग झाला काय? धर्माच्या नावाने मुसलमान एका मंचावर आले काय? ओसामाने जिहादचे आवाहन केले; मात्र त्याला किती मुस्लिम देशांनी समर्थन दिले? फतवा तर मुल्ला उमर यानेही काढला होता.
इराकमध्ये सद्दामला वाचविण्यासाठी फतव्यांचा पाऊस पडला. पाकिस्तानात लाल मशीद हत्याकांडानंतर मुल्लांनी पाक सेनेला घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश मिळाले का? तालिबान आणि काश्मिरात बसलेले अतिरेकी भारताविरुद्ध फतव्यांची गरळ ओकत असतात, परंतु या अतिरेकी संघटनांना किती समर्थन मिळते? जैशे मोहम्मद आणि लष्करे तैयबा या नावांवरूनच ध्यानात येते की, ते धर्माचा आधार घेऊन भारताला ठेचण्याचे मनसुबे बाळगतात, परंतु आतापर्यंत त्यांना यश मिळाले काय? अतिरेक्यांनी पावलोपावली इस्लामच्या नावाने मुसलमानांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना यश मिळते का?
पाकिस्तानातील बरेलवी विचारधारेचे विद्वान डॉ. ताहेरूल कादिरी यांनी अतिरेक्यांच्या विरोधात 600 पानी अहवाल लंडनमध्ये प्रकाशित केला होता. यामध्ये दहशतवादाची घोर निर्भत्सना करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी सोमालियातही शांती नांदावी या उद्देेशाने जनतेसमोर एक दस्तावेज सादर करण्यात आले. त्यात म्हटले होते की, याचा अतिरेक्यांना लाभ होणार नाही, परंतु अतिरेकी फतव्यांना हद्दपार करू इच्छिणाऱ्यांना याचा लाभ होईल.
मारदीन संमेलनात सौदी अरब, तुर्की, भारत, सेनीगाल, कुवैत, इराण, मोरक्को आणि इंडोनेशियासहित 15 मोठ्या देशांतील विद्वानांनी सहभाग घेतला होता. संमेलनात विचारविमर्श झाल्यानंतर त्यांनी उक्त विचार व्यक्त केले आहे. मुसलमानांनी ठरविले तर इस्लाम आणि मुसलमानांचे चित्र उज्ज्वल बनू शकते. तालिबान आणि अलकायदा सर्वत्र पराभूत होताना दिसत आहे.
त्यांना आपली राहिलेली अब्रू वाचवायची असेल तर त्यांनी विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही. अन्यथा आता जिहाद आणि काफिर या शब्दांच्या विरोधात एक चक्रीवादळ येईल आणि यात कठमुल्लांना उद्ध्वस्त केले जाईल.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील
No comments:
Post a Comment