पाकिस्तानी माध्यमांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानात कांदे आणि बटाटे स्वस्त दरात उपलब्ध करून भारत येथील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. भारतीयांच्या तोंडचा भाजीपाला पळवून सारा माल भारत धडाक्यात पाकिस्तानात पाठवीत आहे. बाजारात भारतीय माल इतका स्वस्त असतो की, पाकिस्तानी शेतकरी कोणत्याही स्थितीत स्पर्धा करू शकत नाही. पाकिस्तानी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढा पैसाही पदरात पडत नाही.
भारतात महागाईने लोकांना बेजार केले आहे. रस्त्यापासून संसदेपर्यंत सर्वत्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध होत आहे, परंतु सरकारने आपली कातडी आणखी टणक केली आहे. सकाळी घरात कोणती भाजी आणायची याची चिंता भारतीय महिलांना दररोज भेडसावत आहे. भाजी मंडईत गेल्यानंतर ध्यानात येते की, कालचे कोबी अन् टोमॅटोचे भाव आज नाहीत. कोणतीही भाजी घ्यायची म्हटली तरी अव्वाच्या सव्वा भाववाढ झाल्याचे दिसत आहे. कालपर्यंत दाळ-भात, कांदा-भाकरी आमच्या ताटात दिसायची. आता कांदा रजेवर गेला आहे. भाकरी कधी संपावर जाईल माहीत नाही. सर्वसामान्य जनता महागाईने मेताकुटीला आली आहे. काही दिवसांनी अनागोंदी माजली तर आश्चर्य नको. भारतातल्या शेतीत असंख्य प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येते. यातून भारतीयांचे उदरभरण होत असते, परंतु आता पालक, मेथी, कारले आणि भेंडी आदी भाज्या जणु पंचपक्वान्नाप्रमाणे सर्वसामान्यांच्या भोजनातून दूर झाल्या आहेत. मंडईतून भाज्या कमी होण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील सर्वात मोठे कारण उन्हाळा असल्याचे सांगण्यात येते, परंतु ते खरे नाही. सरकार आपले पाप झाकण्यासाठी थापा मारीत आहे.
कांद्यापासून बटाट्यापर्यंत आणि हिरव्या मिरचीपासून वाटाण्यापर्यंत सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आता दिसत का नाहीत? लोक विचारत आहेत, भाज्या कोठे गेल्या? भाजीपाल्यांचे भाव गगनाला का भिडले? या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांकडेही नाही, परंतु पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमांजवळ मात्र या प्रश्नाचे उत्तर अवश्य आहे. पाकिस्तानातील सर्वात अधिक विश्वसनीय आणि लोकप्रिय इंग्रजी दैनिक दि नेशनने याचा भांडाफोड केला आहे. या वृत्तपत्राने लिहिले आहे की, "भारतीयांच्या तोंडचा घास हिसकावून भारत सरकार पाकिस्तानी लोकांना देण्यासाठी मन मोठे करीत आहे.'
भारतीयांच्या भुकेचे शोषण करून भारत सरकार अन्याय करीत आहे, हे सत्य आहे. सरकार एकीकडे उदार होऊन पाकिस्तानी लोकांवर कृपा करीत आहे तर दुसरीकडे तुटवडा निर्माण करून भाजीपाल्याचा काळाबाजार करणाऱ्यांच्या तुंबड्या भरत आहे.
पाकिस्तानातील या वृत्तपत्राने भारताकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यासंबंधीही कडवट टीका केली आहे. नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या नद्यांचे पाणी लबाडी करून भारत अनेक वर्षांपासून आपल्याकडे वळवत आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमे कालपर्यंत काश्मिरातील दहशतवादाच्या नावाने भारताच्या नावे खडे फोडीत. आता ती भाजीपाला विषयावरून आणि नद्यांच्या पाण्याची चोरी होत असल्याचे सांगून भारताच्या नावे शंख करीत आहेत.
दि नेशनने लिहिले आहे की, आमच्या वाटणीचे सिंधू नदीचे पाणी पळवल्यानंतर आता नवी दिल्ली स्वस्त दरात भाज्या निर्यात करून आमची शेती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या कृषि आधारित अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचा हा प्रकार आहे. या षड्यंत्राचा उद्देश आमच्या शेतकऱ्यांना संपविणे हा आहे.
भारतातून येणाऱ्या भाज्या विशेषकरून कांदा आणि बटाटा यांची आयात रोखण्यासाठी इस्लामाबादने मोठी कस्टम ड्युटी लावली आहे. यामुळे वर्षभरापूर्वी दोन्ही देशांतील व्यापार ठप्प झाला होता, परंतु व्यापार पुन्हा कसा सुरू झाला माहीत नाही. पाकिस्तानच्या संसदेने किंवा आयात-निर्यात मंत्रालयाने या संदर्भात कोणत्याही नव्या धोरणाची घोषणा केलेली नाही, तरी व्यापार कसा सुरू झाला हा प्रश्नच आहे.
पाक सरकारच्या अनुमतीशिवाय हे सर्व होत आहे याबद्दल दि नेशनने आश्चर्य व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील काही मंडळींच्या स्वार्थातून तर हे होत नाही ना? पाक सरकार या मुद्द्यावर उदासीन आहे आणि भारत सरकार धडाक्यात माल पाठवीत आहे. दि नेशनने दिलेल्या माहितीनुसार दररोज 40 ट्रक भाज्या भारतातून पाकिस्तानात जात आहे. पाकिस्तानच्या सीमेवर यासाठी कोणतेही बंधन नाही. आजपर्यंत कोणत्याही ट्रकवाल्याने याविषयी तक्रार केलेली नाही. याचाच अर्थ असा की, भाज्यांचा काळाबाजार करणाऱ्यांचे भारतीय व्यापाऱ्यांशी संगनमत आहे. कसे का होईना लोकांना भाजी मिळत आहे तर यात वाईट काय, अशी पाक सरकारची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासन कानाडोळा करीत आहे. खरे तर भारतातही भाज्यांची स्थिती खूप चांगली आहे असे नाही. भारतातील मंडईत दररोज भाज्यांचे भाव वाढत आहेत, परंतु भारतीय जनता आणि सरकार पाकिस्तानचे नुकसान करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणजे आपल्या लोकांना भुकेले ठेवूनही भारत सरकार पाकिस्तानला दु:खी आणि अपमानीत करण्याचा प्रयत्न करते.
दि नेशनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानातील ट्रेड माफियांनी कांद्याचे भाव 20 वरून सरळ 40 रुपये किलोवर नेऊन त्यांना मदतच केली आहे. या व्यापाराला अधिकृत मान्यता नसताना इतक्या धडाक्यात सुरू आहे, हे मोठे आश्चर्य आहे. कांद्याप्रमाणेच बटाट्याचे ट्रकही सीमापार करून पाकिस्तानात पोहोचत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात बटाटा 10 ते 15 रुपयांत उपलब्ध होता. आता बटाटा 30 रुपयांवर गेला आहे.
पाकिस्तानात लाहोर, हैदराबाद आणि मुल्तान येथील भाजीपाला विक्रत्यांचे म्हणणे आहे की, आता तर कोबी आणि लसूणसुद्धा ट्रकने येत आहे. पाकिस्तानातील भाजी मंडईतील सूत्रांचे म्हणणे आहे की, आमच्या इथे टमाटे आणि पान कोबी यांची काहीही कमतरता नाही तरीही कांद्या-बटाट्याच्या ट्रकमधून याच्या करंड्या धडाक्यात येत आहेत. वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, भारतात भाज्यांचा दुष्काळ आहे तरीही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यामागे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पंगू करण्याचे षड्यंत्र आहे. पाकिस्तानातील ज्या शेतकऱ्यांची रोजीरोटी भाजीपाला शेतीवर अवलंबून आहे, ते चिंताग्रस्त झाले आहेत, परंतु त्यांची काळजी आहे कोणाला? भारतीय कालपर्यंत चित्रपट, कापड आणि फॅन्सी सामान चोरट्या मार्गाने पाकिस्तानात पाठवायचे. आता तर आमच्या जेवणाच्या ताटातही त्यांनी घुसखोरी केली आहे. भारतीय कांदा आणि बटाटा या भाज्यांनी थैमान घातले आहे. पूर्वी पाकिस्तानला बटाटा कमी पडायचा तेव्हा चीन आणि उजबेकिस्तान या देशातून तो आयात केला जायचा, परंतु यावेळी मात्र भारताने आपले साम्राज्य पसरवले आहे. नेशनने लिहिले आहे की, भारतातून गूळ आणि तूरडाळीची सातत्याने तस्करी होत असते. सर्वसाधारणपणे सरकारचे लक्ष वाघा सीमेवर असते, परंतु राजस्थानच्या मुनाबाव रेल्वे आणि गुजरातकडून येणाऱ्या उंटांवरूनही माल येत असतो.
या महागाईच्या दिवसांत पाकिस्तान सरकार लोकांनी मांस आणि कोंबडी खावे यासाठी अधिक प्रयत्न करीत आहे. म्हैस, बैल आणि गाय यांचे मांस 200 ते 250 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. बोकडाचे मांसही 300 रुपयेपेक्षा कमी नाही. समजा मांस स्वस्तात मिळाले तरी काय उपयोग? ते शिजवण्यासाठी कांदा, लसूण, हळद, मिरची, जिरे आणि इतर गरम मसाला लागतोच की नाही. या सर्व वस्तूंचे उत्पादन शेतात होते. त्यामुळे शेवटी या वस्तूंची खरेदी करावीच लागते. म्हणजे शेतीत जोवर धान्य पिकणार नाही तोवर माणसाचे पोट भरणार नाही. आजवर केवळ धान्याचीच टंचाई असायची, आता भाजीटंचाईचे संकटही येत आहे.
नेशनसह दै. जंग आणि साप्ताहिक नियतकालिक जहॉंनेही या मुद्द्यावर रान उठविले आहे. पाकिस्तानात खाण्याच्या सर्व वस्तू सहज उपलब्ध व्हायच्या. आता अचानक काय झाले? असे जहॉंने विचारले आहे. आता पाकिस्तानातली पिकं डोलताना का दिसत नाहीत? याचे खरे कारण आहे पाण्याची कमतरता. पाकिस्तानचा सुरुवातीपासूनच भारतावर आरोप आहे की, फाळणीच्या वेळी पाणीप्रश्नी भारताने पाकिस्तानवर अन्याय केला आहे. पाकिस्तानचे सिंधू जल आयुक्त जमात अली शाह यांनी जागतिक बॅंकेकडे किशनगंगा परियोजनेत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, परंतु पाक मिडीयाचे म्हणणे आहे की, पाकने खूप याआधीच शहाणे व्हायला हवे होते. नेशनने लिहिले आहे की, पाकिस्तान खूप आधीपासूनच सिंधू पाणीप्रश्नी भारताचा अन्याय सहन करीत आहे. पाकिस्तानात गव्हाचे संकट आले ते पाणी चोरीमुळेच, असेही नेशनने म्हटले आहे.
पाकिस्तानने कितीही आरोप केले तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. भारतातून ज्या नद्या पाकिस्तान आणि बांगलादेशात जातात, त्याचा अधिक लाभ त्या देशांनाच आहे. यात भारतावर अन्यायच झाला आहे. खरे तर काला बाग डॅम आणि फरक्का डॅममध्ये भारतीय नद्यांचेच पाणी वाहून जाते. या बंधाऱ्यांमुळे भारताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याचे बहुतांश पाणी पाकिस्तानलाच मिळते. यामुळे त्यांची शेती सुजलाम् सुफलाम् बनली आहे. भारतात अन्नधान्यांचे उत्पादन घटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बांधाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने केली गेलेली निर्मिती होय. याचे परिणाम आजही आपल्या भारताला भोगावे लागत आहेत.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील
No comments:
Post a Comment