2010 चा मार्च महिना आला आणि दीप दरवर्षीप्रमाणे आपल्या मोहिमेवर निघाली, परंतु यावर्षी आपले स्वप्न साकार होईल याची तिला थोडीही कल्पना नव्हती. दैनिक डॉनच्या मुखपृष्ठावर ही चकित करणारी बातमी झळकली अन् सारा लाहोर आनंदात न्हाऊन निघाला. वृत्तात म्हटले होते की, पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी लाहोर महापालिकेला शादमां चौक भगतसिंग यांच्या नावे करण्यात यावे, असा निर्देश दिला आहे. इतिहासातील सत्य स्वीकारले याबद्दल पाक सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे.
दरवर्षी 23 मार्च रोजी भारतीय उपखंडात भगतसिंग यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिश सरकारने लाहोर येथील सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली होती. या तीन युवकांच्या हौतात्म्याने सारा भारत शोकसागरात बुडाला होता. फाळणीनंतर लाहोरची सेंट्रल जेल अन्य स्थानी हलविण्यात आली. जेथे जेल होती तेथे एक चौक बनविण्यात आले. या चौकाला नाव दिले शादमां चौक. पाकिस्तानातील अनेक बुद्धीजीवींनी पाक सरकारच्या या कृतीची घोर निंदा केली. त्यांनी मागणी केली की, भगतसिंग हे "शहीदे आजम' होते. त्यांची भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी करता येणार नाही. त्यामुळे या चौकाला किमान भगतसिंग यांचे नाव दिले जावे, परंतु पाक सरकारने याची दखल घेतली नाही.
या घटनेमुळे सैयदा दीप नामक महिलेला मोठा धक्का बसला. तिने इन्स्टिट्यूट फॉर पीस अँड सेक्युलर स्टडीज नामक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या वतीने तिने भगतसिंग यांच्याप्रति आदर असलेल्या लोकांना आवाहन केले. मार्च महिन्याची सुरुवात होताच सैयदा दीप आपल्या साथीदारांसमवेत शादमां चौकात तळ ठोकायची. प्ले कार्ड आणि बॅनर घेऊन ही मंडळी आपल्या मागणीकडे लोकांचे लक्ष वेधत. शादमां चौकाचे नामकरण भगतसिंग चौक असे व्हावे ही त्यांची एकमेव मागणी होती. हजारो लोक तेथून जात. सारे या महिलेच्या धाडसाची आणि भगतसिंग यांच्याप्रति असलेल्या अभिमानाची प्रशंसा करीत.
यंदा पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी लाहोर महापालिकेला शादमां चौक भगतसिंग यांच्या नावे करण्यात यावे, असा निर्देश दिला आहे. ज्या लोकांनी आततायी ब्रिटिश सरकारशी दोन हात केले होते, त्या सर्वांचे नाव आणि कार्य यांचे स्मरण व्हावे यासाठी आता पाकमध्ये जनमत तयार होत आहे. या घटनेमुळे लाहोरात आता पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत झाला आहे. कोणी कल्पनाही करणार नाही असे लेख पाकच्या वृत्तपत्रांतून प्रकाशित होत आहेत. पाकमधील जागरुक लोक स्वातंत्र्याच्या इतिहासाची उजळणी करीत आहेत. भगतसिंग यांच्या निमित्ताने आता सर्वच हुतात्म्यांचे स्मरण करण्यात यावे असे त्यांना वाटत आहे.
दै. डॉनमध्ये ए.जी. नूरानी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. ज्या हुतात्म्यांना लोक आता विसरले आहेत, त्या सर्व पाकिस्तानच्या हुतात्म्यांवर प्रकाश टाकला गेला पाहिजे, असे नूरानी आपल्या लेखात म्हणतात. पाकिस्तान आणि पंजाबातील सरकारे नेहमीच राजकीय उठाठेवी करण्यात मग्न असतात, त्यांना इतिहासाशी काही देणे -घेेणे नसते, परंतु पंजाबी कॉंग्रेसचे अध्यक्ष फखरे जमा यांनी पाक सरकारकडे मागणी केली आहे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ज्या पंजाबी सुपुत्रांनी आपले सर्वस्व अर्पित केले, त्यांना इतिहासात स्थान देण्यात यावे. पंजाबच्या हुतात्म्यांचा इतिहास पुन्हा एकदा लिहिण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला माहीत नाही की, इंग्रजांशी झुंज देताना पंजाबच्या पुत्रांनी कशा प्रकारच्या योजना आखून यशस्वी केल्या.
भगतसिंग चौक असे नामकरण केल्यानंतर लाहोरात या घटनेवर काय प्रतिक्रिया उमटल्या, त्या विसरून चालणार नाही. भगतसिंग यांच्या नावाने एक चौक करणे पुरेसे नाही. ज्या तीन पंजाब पुत्रांनी इतिहास घडवलं आहे, त्यांच्यासाठी सरकार आणि जनतेने आणखी खूप काही करणे शेष आहे. पंजाबी कॉंग्रेसने म्हटले आहे की, केवळ पाकिस्तान सरकारनेच सर्व काही करावे असे नाही. भारताच्या स्वातंत्र्यात पंजाबचे काय योगदान आहे आणि कोणी कोणी आपले रक्त सांडून या देशाला मुक्त केले, यासंबंधात भारत सरकारनेही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. पंजाब कॉंग्रेसला वाटते की, हे काम दोन्ही देशांनी मिळून केले पाहिले.
पंजाब कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पंजाबच्या योगदानाविषयी आजवर विश्वासार्ह ठरेल असा इतिहासच लिहिला गेला नाही. फाळणीनंतर भारतानेही याकडे दुर्लक्षच केले आहे. फखरे जमा यांचे म्हणणे आहे की, भगतसिंग यांच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याची योग्य वेळ आली आहे. भारत प्रत्येक वेळी पाकिस्तानकडेच बोट दाखवितो, परंतु भारताने आत्मचिंतन करावे. भारताने आपल्या इतिहासात पाकिस्तानच्या पंजाबी स्वातंत्र्योद्ध्यांना योग्य स्थान दिले आहे काय? असा प्रश्न फखरे जमा यांनी केला आहे. पाकिस्तान सरकारने अनेक वर्षांपासून भगतसिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, हे खरे, पण भारतानेही अन्य हुतात्म्यांच्या बाबतीत दुर्लक्षच केले नाही काय? पंजाबी कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी प्रश्न केला आहे की, भारताने राय अहमद खान आणि दुल्ला भाटीसारख्या पंजाबी नायकांचे कोठे स्मारक उभे केले आहेत काय? या वीरांनी स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान दिले नाही काय?
भगतसिंग यांच्या हौतात्म्याचा दाखला देत फखरे जमा यांनी आठवण करून दिली आहे की, भगतसिंग यांचा बचाव करणारे केंद्रीय ऍसंब्लीतील सर्वात चांगले भाषण कायदे आजम मोहम्मद थली जिन्ना यांनी केले होते. भारत ही गोष्ट विसरला काय? भगतसिंग यांच्या हौतात्म्यानंतर दुसऱ्या दिवशी मौलाना जफर अली खान यांनी श्रद्धांजली सभेत सामूहिक प्रार्थनेचे नेतृत्व केले होते. लाहोर कटाच्या खटल्यासाठी गठित स्पेशल ट्रिब्युनलचे गठन करणाऱ्या अध्यादेशावर 19 जून 1930 रोजी जारी करण्यात आलेल्या लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनच्या अहवालावर डॉ. मोहम्मद इकबाल आणि अन्य दोन लोकांव्यतिरिक्त बरकत अली यांचे हस्ताक्षर होते. हे सारे कट्टर लीगवाले होते.
एक कट्टर मुस्लिम लीगवालाही भगतसिंग यांच्या हौतात्म्यावर अश्रू ढाळतो. ब्रिटिश सरकारच्या या कुकृत्याचा धिक्कार करतो. यावरून ध्यानात येऊ शकेल की, तत्कालीन पंजाब भगतसिंग यांच्या हौतात्म्याने किती दु:खी होता. पंजाबातील प्रत्येक नागरिक विद्रोहाच्या भाषेत ब्रिटिशांना आव्हान देत होता. भगतसिंगांच्या हौतात्म्याने सारा देश आणि सर्व राजकीय पक्ष स्तब्ध झाले होते. सर्वांच्या मनात ब्रिटिश सरकारविषयी घृणा होती. 23 मार्च 1931 च्या घटनेने सारा भारत हादरून गेला होता. कारण भगतसिंग आणि साथीदारांनी ब्रिटिशांच्या मर्मावर अखेरचा घाव घातला होता.
पंजाबी कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे की, भगतसिंग यांचा संबंध कोणाशी आहे... भारताशी की पाकिस्तानशी?
पंजाबी कॉंगे्रस आजदेखील भारत सरकारशी बोलणी करणार असेल आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाला भारत किंवा पाकिस्तानचा इतिहास असे पाहणार नसेल, इतिहासाकडे हिंदू किंवा मुस्लिम दृष्टिकोनातून पाहणार नाही, असे आश्वासन देणार असेल, तर भारताला काहीच अडचण नाही. भारत तर आजदेखील पाकिस्तानी संस्कृती भारतीयच असल्याचे मानतो.
मुस्लिम लीगच्या काळ्या कृत्यांना विसरून जुन्या काळात जायला भारत आजही उत्सुक आहे, परंतु प्रश्न असा आहे की, पंजाब कॉंग्रेसचे फखरे जमा ही गोष्ट पाकिस्तान सरकारच्या गळी उतरविण्यात यशस्वी होतील काय? 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा 150 वा वर्ष साजरा होणार होता, त्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पाक यात्रेच्या वेळी तत्कालीन पाक राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना म्हटले होते की, आपण दोन्ही देशांनी मिळून इतिहासाचे हे सुवर्ण क्षण स्मरण करूया. त्यावेळी मुशर्रफ हे अटलजींसमोर मौन राहिले, परंतु नंतर पत्रकारांशी वार्ता करताना म्हटले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी दिवसा स्वप्न पाहणे सोडून द्यावे. या टिप्पणीचा काय अर्थ होतो? यातून कोणत्या भावना व्यक्त होतात?
पंजाबी कॉंग्रेसने हे प्रकरण पुन्हा समोर आणले आहे, तर त्यांनी भारत सरकारशी बोलणी करावी. त्याआधी आपल्या स्वत:च्या सरकारचे मत जाणून घ्यावे अन्यथा धर्मांध मानसिकतेच्या लोकांकडून काहीही होणार नाही.
दै. डॉनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखावरून समाधान वाटते की, आजही पाकिस्तानच्या पंजाबात अशा संघटना आणि व्यक्ती आहेत की, जे आपल्या इतिहासातील वीरांना जिवंत ठेवू इच्छितात. भगतसिंगसारखे देशभक्त हे कोणत्याही एका देशाचे अथवा धर्माचे नसतात. असे वीर मानवजात ज्यासाठी हर क्षण संघर्ष करीत असते, त्या स्वातंत्र्याचे प्रतीक असतात. पाकिस्तान सरकारने भगतसिंग यांच्यासाठी जो मनाचा मोठेपणा दाखविला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. भगतसिंग चौकाच्या निमित्ताने पाक सरकार आणि तेथील कट्टरवाद्यांच्या हृदयात बदल होणार असेल तर प्रत्येक विचारी आणि राष्ट्रीय विचाराची व्यक्ती त्याचे स्वागतच करेल.
पंजाबी कॉंग्रेसने पंजाबी स्वतंत्रता सेनानींच्या अवहेलनेचे जे दु:ख मांडले आहे, ते योग्य माध्यमाने भारतात पोहोचविले तर भारत त्याचे स्वागतच करेल. कारण भारताची ही संस्कृतीच आहे.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील
Excellent information. Truly said... Bhagatsingh, sukhadev and rajguru cannot be divided as Indian or pakistani ... We must be proud of them.
ReplyDelete